ई-पीक नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीक नोंदणी
ई-पीक नोंदणी

ई-पीक नोंदणी

sakal_logo
By

शेतकऱ्‍यांच्या मदतीला धावली तरुणाई
गडहिंग्लज तालुका : ई-पीक नोंदीची पालखी टेक्नोसेव्ही तरुणांच्या खांद्यावर
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : सातबारा पत्रकी पीक पाणी नोंदीसाठी पारंपारिक पद्धत झिडकारुन महसूल विभागाने ऑनलाईनची कास धरली आहे. ही टेक्नोसेव्ही पद्धत मोबाईलचे अज्ञान असलेल्या बहुतांशी शेतकऱ्‍यांना अडचणीची ठरत असल्याने महसूलने गावागावांतील तरुणाईला प्रशिक्षित करून त्यांना शेतकऱ्‍यांच्या मदतीसाठी सज्ज ठेवले आहे. यामुळे ई-पीक अ‍ॅपद्वारे पीक पेरा नोंदीची कार्यवाही गतीने होण्यासह शेतकऱ्‍यांना मदतही होत आहे.
पीकपाणी नोंदणीत पारदर्शकपणा आणण्यासाठी ऑनलाईनची अंमलबजावणी शासनाने सुरू केली आहे. परिणामी मोबाईलचे अज्ञान असणाऱ्‍या बहुतांशी शेतकऱ्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे पहिल्या वर्षी या पद्धतीला प्रतिसादही कमी मिळाला. यंदा तसे होऊ नये आणि शंभर टक्केचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तहसीलदार दिनेश पारगे यांनी यामध्ये लोकसहभाग घेण्याचे ठरवले. गावागावांतील टेक्नोसेव्ही तरुणाईला या मोहिमेत सहभागी करून घेत महसूलने त्यांना प्रशिक्षित केले आहे. अधिकारी-कर्मचारी महाविद्यालयांमध्ये जावून तरुणांना ई-पिकांची माहिती देत आहेत. याचा परिणाम सकारात्मक होत असून प्रत्येक गावातील क्षेत्रानुसार सरासरी पाच ते दहा तरुण या कामात लागले आहेत.
सध्या तालुक्यातील ८९ गावांमध्ये ५०० ते ७०० तरुण शेतकऱ्‍यांना सोबत घेऊन बांधावर जात ई-पीक नोंदीची पालखी खांद्यावर घेतली आहे. त्यासाठी सर्कल, तलाठी, ग्रामसेवकांचेही सहकार्य मिळत आहे. ई-पीक अ‍ॅपमध्ये गटनिहाय खरीप व रब्बी हंगामातील पीक पाण्याची नोंद सुरू आहे. प्रत्येक गावच्या व्हॉटस अ‍ॅपवर संबंधित प्रशिक्षित तरुण संदेशाद्वारे शेतकऱ्‍यांना जागृत करीत आहेत. आज गावातील कोणत्या भागातील शिवारात जाणार आहे, याची माहिती रोज शेतकऱ्यांना दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्‍यांचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे. अधिकाधिक लक्षांक पूर्ण करण्यासाठी गावागावांत शेतकऱ्‍यांपर्यंत ई-पीक नोंदणीचा प्रसार करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांपासून विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्‍यांना आवाहन केले आहे. घंटागाडी, संस्कार वाहिनीद्वारेही ई-पीक नोंदणीचा प्रसार सुरु आहे.
----------------
* ई-पीक नोंदणी कशासाठी ?
पीक पाहणीच्या नोंदी पीक कर्ज वाटपासह नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्‍या पीक नुकसानीच्या आणि पीक विम्याच्या अचूक भरपाईसाठीही उपयुक्त ठरते. म्हणूनच पीक पेऱ्‍याची नोंद अत्यावश्यक मानली आहे. यामुळे शेतकऱ्‍यांनी या नोंदणीकडे दुर्लक्ष न करता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

* दृष्‍टिक्षेपात ई-पीक नोंदणी
- एकूण खातेदार शेतकरी : ९८ हजार ६३६
- सुलभ ई-पीक नोंदीसाठी पाडलेले भौगोलिक गट : ७४१
- पाच दिवसांत झालेली नोंदणी : ५०९२
- ई-पीक नोंदीमध्ये सक्रिय तरुणांना मिळणार सन्मानपत्र

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90707 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..