प्रशासकांच्या आश्वासनाने आंदोलन टळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकांच्या आश्वासनाने आंदोलन टळले
प्रशासकांच्या आश्वासनाने आंदोलन टळले

प्रशासकांच्या आश्वासनाने आंदोलन टळले

sakal_logo
By

प्रशासकांच्या आश्‍वासनाने आंदोलन टळले
इचलकरंजी महापालिका; मक्तेदारांच्या २४ कोटींच्या थकीत बिलांचा प्रश्‍न
इचलकरंजी, ता. २६ ः महापालिकेकडून मक्तेदारांची सुमारे २४ कोटींची देयदेणी थकली आहेत. त्यामुळे मक्तेदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासक सुधाकर देशमुख यांनी याप्रश्‍नी येत्या आठ दिवसांत मार्ग काढण्याची हमी मक्तेदारांच्या शिष्टमंडळाला दिली. त्यामुळे तूर्तास मक्तेदाराचे आंदोलन टळले आहे. त्यामळे ऐन सणासुदीत विविध कामे ठप्प होण्याची भीती दूर झाल्याने महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाकडून सहाय्यक अनुदानापोटी पालिकेला दरमहा मोठा निधी मिळत होता. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन भागवले जात होते. उरलेल्या निधीतून अत्यावश्यक सेवेची बिले व विकासकामांवर खर्च केला जात होता. मात्र, सहाय्यक अनुदानात मोठी कपात केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन करणेही पालिकेला मुश्कील झाले होते. कपात केलेल्या थकीत सहाय्यक अनुदानाचा ९८ कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झाला. यातील प्राधान्याने कर्मचाऱ्यांची देणी अदा केली. उर्वरित २८ कोटींची रक्कम प्राधान्याने मक्तेदारांची बिले भागवण्यासाठी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र, त्याला आमदार प्रकाश आवाडे यांनी विरोध दर्शवला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलण्यासाठी या निधीचा वापर करावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. त्यामुळे मक्तेदारांची बिले देण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून बिले थकल्याने मक्तेदार हैराण झाले आहेत. तातडीने बिले मिळण्याची शक्यता धूसर होत चालल्याचे पाहून मक्तेदारांनी आज थेट खासदार धैर्यशील माने यांची कोल्हापुरात भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले; पण त्यांनीही पाणी प्रश्‍नाला प्राधान्य दिले. कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्यासाठी अमृत योजनेतून निधी आणण्याची हमी त्यांनी दिली. त्यानंतर मक्तेदारांची देणी दिली जातील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मक्तेदारांच्या शिष्टमंडळाने आज प्रशासक देशमुख यांची भेट घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला; पण त्यांनी सध्या सणासुदीचे दिवस असल्याने आंदोलन न करता याप्रश्‍नी येत्या आठ दिवसांत मार्ग काढण्याची हमी दिली. पाणी योजनेसाठी निधी प्राप्त झाल्यानंतर मक्तेदारांची देणी दिली जातील, असे त्यांनी सांगितल्यानंतर तूर्तात आंदोलन करण्याचा निर्णय मक्तेदारांनी स्थगित ठेवला. यामुळे महापालिका प्रशासनाला किंबहुना पाणीपुरवठा विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, या विभागाचे बहुतांशी कामकाज हे मक्तेदारांवरच अवलंबून आहे. बांधकाम विभागाकडूनही काही महत्त्वाची कामे सुरू आहेत. त्यावरही परिणाम होण्याची भीती होती.
----------

बिले २०१६ पासून थकीत
पालिकेकडे सुमारे १७५ मक्तेदारांची नोंदणी आहे. त्यापैकी सुमारे १०० मक्तेदार विविध विभागाकडे सक्रिय आहेत. यातील काही मक्तेदारांची २०१६ पासून बिले थकली आहेत. त्यामुळे अनेक मक्तेदारांची बिकट अवस्था झाली आहे. तब्बल २४ कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले मिळाली नाहीत, तर पुढील विकासकामे कशी करायची, असा प्रश्‍न मक्तेदारांसमोर निर्माण झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90783 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..