तारखेच्या बदलाने सेवा संस्था कामाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारखेच्या बदलाने सेवा संस्था कामाला
तारखेच्या बदलाने सेवा संस्था कामाला

तारखेच्या बदलाने सेवा संस्था कामाला

sakal_logo
By

शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन लाभासाठी नव्याने याद्या
सरकारचा नवा नियम; तारखेच्या बदलाने सेवा संस्था लागल्या पुन्हा कामाला
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे; मात्र राज्यातील सरकार बदलल्यानंतर नियमातही बदल होत आहेत. शेतकऱ्यांची यादी देताना मागील सरकारच्या काळात सुलट असणारी तारीख नव्या सरकारने उलट करून मागितली आहे. त्यामुळे सेवा संस्था कामाला लागल्या आहेत. केवळ तारखेसाठी साऱ्या याद्या नव्याने तयार करून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे.
राज्याच्या सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आणली. थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले; मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळाले नव्हते. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होती. त्याचे पडसाद उमटू लागल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा केली; पण राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारने योजनेच्या अनेक निकषांत बदल केला आहे.
दरम्यान, जुन्या सरकारच्या काळात विकास सेवा संस्थांतून १-४-२०१८ अशा तारखेनुसार शेतकऱ्यांच्या याद्या दिल्या होत्या. त्यावेळी मागणीही तशीच होती; पण नव्या सरकारसोबत नवा नियम आला. ही तारीख उलट म्हणजे २०१८-४-१ अशी करण्याचे आदेश आले. त्यामुळे सेवा संस्थांना नव्या नियमानुसार तारीख बदलून याद्या तयार कराव्या लागत आहेत. नवी यादी पुन्हा लेखा परिक्षकांकडे तपासणी करून सादर करावी लागत आहे. त्यानंतर ती अपलोड केली जात आहे. यात सचिवांचा वेळ आणि संस्थांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. वास्तविक शासनाच्या सॉफ्टवेअरमध्ये एकाच वेळी तारीख बदलणे शक्य होते; पण तसे न करता साऱ्या संस्थांना कामाला लावल्याचे दिसून येत आहे.
----------------
चौकट
मागील पानावरून पुढे...
प्रथम भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. सेवा संस्थांना अनेकदा याद्या बदलण्याची वेळ आली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना काही प्रमाणात हीच परिस्थिती होती. आता प्रामाणिक शेतकऱ्यांना लाभ देतानाही फारशी वेगळी परिस्थिती नाही. सरकार कोणतेही असो, मागील पानावरून पुढे असाच हा कारभार म्हणावा लागेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91447 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..