गोकुळमधील टॅंकर बंद झाले म्हणूनच विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळमधील टॅंकर बंद झाले म्हणूनच विरोध
गोकुळमधील टॅंकर बंद झाले म्हणूनच विरोध

गोकुळमधील टॅंकर बंद झाले म्हणूनच विरोध

sakal_logo
By

टॅंकर बंद झाले म्हणूनच विरोध
आमदार सतेज पाटील; गोकुळमधून भाड्यापोटी ४०० कोटी मिळवल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : शिरोली येथील व्यंकटेश्‍वरा गुडस्‌ मुव्हर्सच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना वर्षाला १५ ते २० कोटी रुपये बिल मिळत होते. ‘गोकुळ’च्या माध्यमातून वीस वर्षांत त्यांनी टँकरच्या भाड्यापोटी सुमारे ४०० कोटी मिळविले आहेत. ‘गोकुळ’मधील महाडिक यांचे टॅंकर बंद झाल्यामुळेच विरोध केला जात आहे. विरोध नसता तर ते आमच्यासोबत व्यासपीठावर बसले असते, असाही टोला श्री. पाटील यांनी लगावला. ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेनंतर श्री. पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळमध्ये विरोधकांची सत्ता होती. त्यावेळी १ ऑक्‍टोबर २०१८ ला झालेली वार्षिक सभा केवळ तीन मिनिटे चालली आणि आजची सभा सव्वातास चालवली; पण विरोधकांना प्रश्‍नांपेक्षा गोंधळ घालायचा होता म्हणूनच ते आले होते. विरोधकांनी एकाच पत्रावर अनेक प्रश्‍न वेगवेगळ्या संस्थांच्या नावाने दिले आहेत. ‘गोकुळ’ने याची उत्तरे तयार केली. त्याचे वाचनही केले. नियमानुसार अध्यक्षांचे प्रास्ताविक झाल्यानंतर विषयांचे वाचन होते. विषयानंतर ज्यांनी आधी प्रश्‍न दिले आहेत, त्याची उत्तरे सांगितले जातात. त्यानंतर आयत्यावेळचे विषय घेतले जातात. यामध्ये एका संस्थेने ‘गोकुळ’मध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे टॅंकर किती होते. त्याला किती रुपये दिले व त्यांनी ‘गोकुळ’वर दावा केला त्यांच्यावर कारवाई करणार का? असे प्रश्‍न विचारले होते. असा प्रश्‍न ज्या वेळी आला. त्यावेळी विरोधकांना या प्रश्‍नाचे उत्तर ऐकण्याची मानसिकता नव्हती.’

ते अज्ञानी...
मतांसाठी ४०० दूध संस्था कागदोपत्री सुरू केल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला होता. यावर ज्यांनी आरोप केला ते अज्ञानी आहेत. या संस्था सहकार कायद्यानुसार मंजूर होतात. त्याची सुनावणी होते. त्याची कायद्यानुसार खातरजमा करून मंजुरी दिली जाते, असाही टोला श्री. पाटील यांनी महाडिक यांना लगावला.

यामुळे महाडिक यांना राग
‘गोकुळ’च्या सभेत २५ ते ४० विरोधक होते. ते फक्त टॅंकर बंद झाले म्हणून आले होते. महाडिक यांच्या जावयाची एजन्सी बंद झाली. फलटणचे चुलत सासऱ्यांची एजन्सी बंद झाली. एवढ्याच कारणासाठी ते विरोध करायला आले होते. कदाचित, हे सुरू राहिले असते तर ते व्यासपीठावर आमच्यासोबतच बसले असते, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


विरोधकांना पहिल्यापासून सभा चालू द्यायची नव्हती. ४०-५० लोकांना सभा चालवू द्यायची नव्हती. स्पीकर घेऊन कोण सभेला येतं का? आम्ही सर्व प्रश्‍नांची उत्तरे देत होतो. पण त्या शेवटपर्यंत थांबल्या नाहीत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला म्हणतात; पण इतिहासात पहिल्यांदा सव्वातास सभा चालली आहे. दरम्यान, सभेच्या नियोजनानुसार कामकाज झाले पाहिजे की मध्येच प्रश्‍न उत्तरे घेतली पाहिजेत, असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91643 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..