तू दुःखहर्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तू दुःखहर्ता
तू दुःखहर्ता

तू दुःखहर्ता

sakal_logo
By

तू दुःखहर्ता- लोगो

46622


तीन वर्षांच्या संघर्षानंतर यंदा आनंदाचे तोरण
मूर्तिकारांच्या घरचा गणेशोत्सव; शेवटच्या आठवड्यात साकारतो घरचा बाप्पा

संभाजी गंडमाळे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः गेली तीन-चार वर्षे आम्हा मूर्तिकारांसाठी आर्थिक कंबरडं मोडणारी ठरली, उत्सवावरील निर्बंध आणि त्यातच शासनाने घेतलेले ऐनवेळचे निर्णय यामुळे हजारो मूर्ती शिल्लक राहिल्या, या साऱ्या विघ्नांवर मात करण्याची ताकद आम्हाला बाप्पानेच दिली आणि यंदा आगाऊ बुकिंगची वेळ आली,
महिनाभर दिवस-रात्र राबणारे आम्हा मूर्तिकारांचे हात उद्या (गुरुवारी) रात्री आठ, नऊनंतर मूर्तीच्या जबाबदारीतून मुक्त होतील आणि मग त्यानंतर आमच्या घरच्या बाप्पाची आरास आणि त्याची प्रतिष्ठापना आम्ही मनोभावे करणार आहोत, ज्येष्ठ मूर्तिकार सर्जेराव निगवेकर संवाद साधत असतात आणि मूर्तिकारांच्या घरचा गणेशोत्सव, त्यांच्या व्यथा आणि संघर्षाचा पट उलगडतो.
मुळात कोल्हापूरचा विचार केला तर गणेशोत्सवानंतर महिनाभर विश्रांती घेऊन मूर्तिकार लगेचच दसऱ्याच्या मुहूर्तावर पुढील वर्षीच्या मूर्तिकामाला प्रारंभ करतात. शहरातील काही बॅंका या व्यवसायासाठी हंगामी कर्जे देतात आणि गणेश चतुर्थीनंतर मूर्तिकार या कर्जाची परतफेड करतात. कोरोना आणि महापूर असा दुहेरी सामना तीन वर्षे करावा लागला. त्यातच शासनाच्या ऐनवेळच्या चार फूट उंचीच्या निर्णयामुळे दोन वर्षांपूर्वी निम्म्याहून अधिक तयार मूर्ती शेडमध्येच शिल्लक राहिल्या. प्रत्येक मूर्तिकाराचे दीड लाखांपासून ते पंधरा लाखांपर्यंत तर सर्वांचे मिळून पंधरा ते अठरा कोटींपर्यंत आर्थिक नुकसान झाले, असेही श्री. निगवेकर सांगतात.
आमच्या कुटुंबांचाच विचार केला तर आम्ही सारे भाऊ गंगावेस, बापट कॅम्प परिसरात विभक्त असलो तरी कुटुंबाची म्हणून एकच मूर्तीची प्रतिष्ठापना गंगावेस येथील घरी होते आणि सारे भाऊ, मुले, सुना, नातवंडे असा २८ जणांचा गोतावळा आनंदोत्सवात न्हाऊन निघतो. समाजासाठी आम्ही सारे मूर्तिकार मूर्ती तयार करण्याची सेवा देत असलो तरी घरचे बाप्पा मात्र शेवटच्या आठवड्यातच आकाराला येतात. निगवेकर कुटुंबाचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण. पण, शहर आणि परिसरातील कुंभार, कातवरे, वडणगेकर, माजगावकर, पुरेकर, आरेकर, बावडेकर अशा साऱ्या मूर्तिकारांच्या घरचा बाप्पा आणि त्यांच्या एकूणच जगण्याची लढाई त्यांच्याशी संवादातून उलगडते.

व्यवसायाला विमा संरक्षण नाही...
दोन वर्षांपूर्वी तयार मूर्ती कुठे ठेवायच्या आणि त्याशिवाय उत्सवासाठी घेतलेल्या हंगामी कर्जाची परतफेड कशी करायची, हा प्रश्‍न सर्वांसमोर होता. आम्ही शासन दरबारी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो; पण उपयोग झाला नाही. मुळात आमच्या व्यवसायाला कोणत्याही प्रकारच्या विम्याचे संरक्षण नाही. त्यामुळे या आर्थिक संकटातून आता कुठे सावरत आहोत, असेही श्री. निगवेकर आवर्जून सांगतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91896 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..