आनंद पर्व आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंद पर्व आजपासून
आनंद पर्व आजपासून

आनंद पर्व आजपासून

sakal_logo
By

46678 व 46673
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी अनेक कुटुंबांनी ‘मोरया’च्या जयघोषात ‘श्रीं’ची मूर्ती घरी आणली.
सायंकाळी ‘श्रीं’ची मूर्ती घरी आणणाऱ्या महिला.
(मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

वाढावा फोटो

46684
कोल्हापूर ः दिलबहार तालीम मंडळाची गणेशमूर्ती टाळ्यांच्या गजरात आणण्यात आली.

46682
कोल्हापूर ः उत्तरेश्वर पेठेतील श्री गणेश प्रासादिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या परिधान करीत गणेश आगमनाची मिरवणूक काढली.
(मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा )

‘तू सुखकर्ता’चा नाद घुमू लागला
किंवा
आनंदपर्व आजपासून

बाप्पांची घरोघरी होणार प्रतिष्ठापना; मंडळांच्या मिरवणुकांनी आसमंत उजळला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः दोन वर्षांनंतर पुन्हा ‘तूच सुखकर्ता’ हा नाद घुमू लागला असून, भव्य गणेश आगमन मिरवणुकांनीच यंदाच्या उत्सवाच्या भव्यतेची प्रचीती दिली आहे. पारंपरिक वाद्यांसह साउंड सिस्टिम आणि लेसर शोच्या झगमगाटात गणेश आगमन मिरवणुकांना प्रारंभ झाला असून, उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच आज अनेकांनी घरगुती मूर्ती आणण्यावरही भर दिला. सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांनी सायंकाळनंतर आसमंत उजळून टाकला. दरम्यान, उद्या (ता. ३१) घरोघरी बाप्पांची विधीवत प्रतिष्ठापना होऊन आनंदपर्वाला सुरुवात होईल.

सुखकर्ता बाप्पांचा हा चैतन्यसोहळा यंदा दहा दिवसांचा असून, कोणत्याही निर्बंधाशिवाय यंदा उत्सव होणार आहे. साहजिकच, पारंपरिक उत्साहाला उधाण आले आहे. शहरातील गंगावेश, पापाची तिकटी, शाहूपुरी, बापट कॅम्प आदी परिसरात गणेशमूर्ती नेण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल केला आहे. हे परिसर बॅरिकेड्‌स लावून वाहनांसाठी बंद केले आहेत. उद्या सकाळपासूनच घरोघरी बाप्पांचे आगमन होईल. यानिमित्त कोल्हापूरकर सहकुटुंब बाहेर पडणार असून, त्यानिमित्त अस्सल मराठमोळी संस्कृती अवतरणार आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपातील मानाच्या गणपतीच्या आगमनाचा सोहळा सायंकाळी सजला. श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे येथे सलग १३२ व्या वर्षी उत्सवाचे आयोजन केले आहे. पापाची तिकटी येथून सायंकाळी सातच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला. मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, एस. के. कुलकर्णी, नंदकुमार मराठे, तन्मय मेवेकरी, संजय बावडेकर आदींची उपस्थिती होती. करवीर नाद ढोल-ताशा पथकासह सुप्रभात बॅंडच्या निनादात मिरवणूक निघाली. जुना राजवाडा येथील खजिन्यावरील गणपतीचेही पारंपरिक लवाजम्यासह सायंकाळी आगमन झाले. सायंकाळी सहानंतर बहुतांश सार्वजनिक मंडळांनी मूर्ती आणण्यावर भर दिला. दिलबहार तालीम मंडळ, उत्तरेश्वर वाघाच्या तालमीसह बहुतांश मंडळांनी मूर्ती आणल्या. पूलगल्ली तालीम मंडळाच्या २१ फुटी मूर्तीचे अनावरण रात्री पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाले. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून, उद्या राजारामपुरीत होणाऱ्या आगमन मिरवणुकीवरही करडी नजर राहणार आहे.

खरेदीला उधाण
उत्सवाच्या पूर्वसंध्येला आज महाद्वार रोडसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले. रात्री उशिरापर्यंत खरेदीचाही उत्सव सुरू राहिला. गौराई व शंकरोबांचे मुखवटे आता बाजारात उपलब्ध झाले असून, गौराई आगमनाची बाजारपेठही सजू लागली आहे.

वाद्यपथकांची मांदियाळी
दोन वर्षे उत्सवात वाद्यपथकांवरही निर्बंध होते. मात्र, यंदा वाद्यपथकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, गंगावेश, पापाची तिकटी, शाहूपुरी, बापट कॅम्प आदी परिसरात बॅंड, बेंजोपथकासह ढोल-ताशा आणि हालगी-घुमकं पथकांनीही हजेरी लावली आहे.

महागणपती आजपासून दर्शनासाठी खुला
न्यू पॅलेसवरील गणपतीचे उद्या सकाळी अकराला पारंपरिक लवाजम्यासह आगमन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील २१ फुटी महागणपती यंदा पहिल्याच दिवशी दर्शनासाठी खुला होईल.

पावसाला न जुमानता...
एकीकडे गणेश आगमन मिरवणुका आणि खरेदीला उधाण आले असतानाच सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्याने काही क्षण तारांबळ उडाली. मात्र, पावसाला न जुमानता पुन्हा खरेदीसह आगमन मिरवणुका उत्साहात पुढे सुरू राहिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91976 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..