मंगलमय आनंदी बाप्पा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगलमय आनंदी बाप्पा...
मंगलमय आनंदी बाप्पा...

मंगलमय आनंदी बाप्पा...

sakal_logo
By

46908
-

त्यांचा ‘डोळस’ अन् ऊर्जादायी आनंदोत्सव!
सुतार दाम्पत्य स्पर्शानेच करते पूजा, आरती आणि आरासही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः त्यांनी आजपर्यंत बाप्पांना पाहिलेले नाही. मुकूट आहे की नाही हे स्पर्शानेच पाहतात. मूर्ती कोणत्या आसनावर रुढ आहे हे इतरांना विचारतात; मात्र तरीही रोज पूजा करतात. निरंजन, कापूर लावण्यासही चुकत नाहीत. आरतीही करतात. आरास करण्यातही पुढे असतात. स्वतःला बाप्पा दिसत नाही; पण त्यांची ऊर्जा आम्हाला आनंदी करते, म्हणूनच गेली पंधरा वर्षे आम्ही अंध असूनही गणेशोत्सव थाटात करतो. अंधशाळेतून निवृत्त झालेले शिक्षक दाम्पत्य वैभवी आणि वसंत सुतार सांगत होते.

गणेशोत्सव आनंद देतो म्हणजे नेमके काय करतो, हे वसंत सुतार यांच्याकडे पाहिले की, दिसून येते. त्यांची पत्नी वैभवीही त्याच शाळेत शिक्षिका होत्या. घरातील स्वयंपाकापासून ते स्वच्छतेपर्यंत सर्व ते दोघेच करतात. पूर्वी गंगावेसमध्ये राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी सानेगुरुजी वसाहतीतील ज्ञानेश्‍वर नगरात स्वतःचे घर घेतले. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. ते दोघेही डोळस आहेत. मुलगी प्रज्ञा माध्यमिक, तर मुलगा ओंकार प्राथमिक शाळेत असताना त्यांनी नवीन घरी गणेशोत्सव साजरा करण्याचा आग्रह धरला. तेव्हा मुले लहान असतानाच त्यांनी स्पर्शज्ञानाने मूर्ती पसंत केली आणि तेव्हापासून त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा होतो.
आरास करण्यासाठी कागद कटिंग, पेस्टींग करण्यात त्यांना मुलगा ओंकारने हातभार लावला. आज सकाळी मुलासह दाम्पत्य मूर्ती आणण्यासाठी चालत गेले. तेथून आल्यानंतर वैभवी यांनी स्पर्शज्ञानाने दुर्गा निवडून त्यांच्या पेंड्याही बांधल्या. दिव्याच्या वाती त्यांनी स्वतः करून निरंजनही लावले. स्पर्शानेच अंदाज घेत मूर्तीला हळद-कुंकूही लावले. त्यानंतर आरती सुरू झाली. यामध्ये गणेशाच्या आरतीसोबतच पाठ असलेले अथर्वशिर्ष, गणेश स्तोत्र, स्‍वामी समर्थांची आरतीही त्यांनी म्हटली. समोर मूर्ती कशी आहे, रंग कसा आहे याची माहिती नाही; पण त्यावरील श्रद्धा हे सर्व करून घेत असल्याचेही त्यांची भावना आहे.

चौकट
पर्यावरणपूरक उत्सव
पहिल्या दिवसापासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव करतो. मूर्ती शाडूचीच असते. आरासही कागदीच असते. विसर्जनही घरातील कुंडातच करून त्याचे पाणी आणि चिखल झाडाच्या कुंड्यांना घातले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव करणे, कमी आवाजात पारंपरिक वाद्यांतून आनंद घेणे हे सर्वांनीच केले तर प्रबोधनाची गरज लागणार नाही, असे सुतार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92176 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..