सदस्य नियुक्तीबाबत संघर्षाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदस्य नियुक्तीबाबत संघर्षाची शक्यता
सदस्य नियुक्तीबाबत संघर्षाची शक्यता

सदस्य नियुक्तीबाबत संघर्षाची शक्यता

sakal_logo
By

सदस्य नियुक्तीबाबत संघर्षाची शक्यता
संजय गांधी निराधार योजना समिती; घटक पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३१ ः राज्यातील सत्तांतरानंतर स्थानिक पातळीवरील अनेक महत्वाचे सत्ताबदल होत आहेत. यामध्ये आता नवीन संजय गांधी निराधार योजना समिती लवकरच अस्तित्वात येणार आहे. या समितीवर नियुक्तीसाठी अनेक कार्यकर्त्यांना वेध लागले आहेत. या समितीवर आमदार प्रकाश आवाडे यांचे वर्चस्व राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर राज्यातील सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेना शिंदे गट यांना समाधानकारक प्रतिनिधीत्व न मिळाल्यास संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच या समितीच्या निवडीबाबत उत्सुकता लागली आहे.
सुमारे अडीच वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली. कालांतराने शहर पातळीवरील संजय गांधी निराधार योजना समिती अस्तित्वात आली. यामध्ये काँग्रेसचे प्राबल्य राहिले. समितीचे अध्यक्ष म्हणून राहूल खंजीरे कार्यरत राहीले. समितीवर काँग्रेसच्या सहा जणांना, शिवसेना व राष्ट्रवादी यांना प्रत्येकी दोन अशा दहा जणांना संधी दिली होती. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर ही समिती बरखास्त झाल्याचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या नविन लाभार्थ्यांच्या मेळाव्यानंतर स्पष्ट झाले आहे. थेट पोस्टातून अनुदान वितरीत करण्याचा उपक्रम आता येथून सुरु होत आहे. त्याचा श्रेयवादही रंगला. नविन समिती अस्तित्वात येणार असून त्याचे अध्यक्ष कोण असणार याचे स्पष्ट संकेतही आमदार आवाडे यांनी दिले. अद्याप याबाबत शासनाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र नजिकच्या काळात याबाबतचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नविन समितीचे कामकाज पुढील काही दिवसात सुरु होईल, असे दिसत आहे.
या समितीवर नियुक्ती होण्यासाठी आतापासूनच नावे चर्चेत येत आहेत. यातील नेमकी कोणाला संधी मिळणार हे नेत्यांच्या मर्जीवरच ठरणार आहे. तथापि, या समितीवर राज्यात सत्तेत असलेल्या घटक पक्षांना समाधानकारक प्रतिनिधीत्व मिळणार काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. समितीवर आमदार आवाडे यांचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट आहे. ते भाजपचे सहयोगी आमदार आहेत. त्यामुळे समितीमध्ये भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना संधी दिला जाणार काय, याबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे. अद्याप भाजप व आवाडे यांच्यात समेट झालेला नाही. त्यामुळे सदस्य निवडताना मोठी कसरत होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे किती सदस्य समितीमध्ये असणार, याकडेही लक्ष असणार आहे.
---------------
फॉर्म्युल्याकडे लक्ष
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर समितीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार आघाडीतील घटक पक्षांना या समितीवर संधी दिली. आता भाजप - शिवसेना शिंदे गट सत्तेत आहे. आमदार आवाडे हे अपक्ष आहेत. ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे समिती सदस्यांचा फॉर्म्युला कसा असणार यावरच समिती सदस्यांची नियुक्ती असणार आहे. त्यामुळे शासनाकडून कधी फॉर्म्युला जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92199 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..