गणेशोत्सवातील वनस्पती आणि त्याचे महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवातील वनस्पती आणि त्याचे महत्त्व
गणेशोत्सवातील वनस्पती आणि त्याचे महत्त्व

गणेशोत्सवातील वनस्पती आणि त्याचे महत्त्व

sakal_logo
By

फोटो

गणेशपूजनातील २१ पत्रींचे आरोग्य महत्त्व

लीड
गणेशोत्सवाला धार्मिक महत्त्व आहे. शिवाय, हा उत्सव निसर्गाच्या नवलाईचाही परिचय करून देतो. गणेशोत्सवात उपयोगात येणाऱ्या वनस्पती, भाज्या, फुले आणि फळे याचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व समजावून घेतले पाहिजे. या वेळी उपयोगात येणारी २१ वृक्षांची पाने पूजेसाठी वापरली जातात. या वनस्पतींचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व.... (कंसात शास्त्रीय नाव दिले आहे.)

१. अगस्ती (हादगा) (सायनॉडॉन बॅक्टीलॉन) ः
अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने. प्राचीन ग्रंथांत नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असते. जीवनसत्त्वाचे वनस्पतीचे रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांत ४५ हजार यूजी- एवढ्या प्रमाणात असते.

२. अर्जुन (टर्मिनालिया अर्जुना) ः
अर्जुनपत्रे असेही नाव प्रचलित आहे. अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. ‘अर्जुनारिष्ट’ हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनात मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.

३. आघाडा (ॲचरॅयस एस्पेरा) ः
अपामार्ग म्हणजे आघाडा. आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर विशेष उपयुक्त असे आहेत. त्वचारोगावरही आघाडा उपयुक्त असतो.

४. कण्हेर (निरीयन इंडिकम) ः
करवीर म्हणजे कण्हेर. हिचा उपयोग तारतम्याने करावा लागतो. कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते. त्यामुळे कण्हेरीचा वापर औषध म्हणून करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

५. केवडा (पेंडानस टेक्टोरिस) ः
केवड्याच्या फुलाच्या रसात तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीत किंवा इतर शिरारोगांत केवड्याचा लेप लावला जातो.

६. जाईची पाने (जास्मिनम ऑरक्युलॅटम) ः
जातिपत्रे अर्थात जाईची पाने व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

७. डाळिंब (प्युनिका ग्रँटम) ः
दाडिमपत्रे अर्थात डाळिंबाची पाने चवीला आंबट असूनही पित्तशामक असतात. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. याच्या मुळाची साल ही कृमिघ्न आहे. विशेषतः टेपवर्मचा (चपट्या कृमी) त्रास यामुळे नाहीसा होतो. दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण उपलब्ध आहेत. लहान मुलांना होणाऱ्या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.

८. डोरली (सोलॅनम इंडिकम) ः
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने. डोरलीसारखे रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडात घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

९. तुळस (ऑसिमस सॅटम) ः
तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे ती सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर घरात तुळस असायलाच हवी. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

१०. दूर्वा (सायनॉडॉन बॅक्टीलॉन) ः
दूर्वा ही वनस्पती गणपतीला आवर्जून अर्पण केली जाते. गणपती हे तेज (ऊर्जा) तत्त्वप्रधान दैवत आहे. दूर्वा याचेच प्रतीक मानले जाते. शरीरातील उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींत दूर्वा हे एक मुख्य औषध आहे.

११. देवदार (पाइनस देवदारा) ः
देवदार ही एक औषधी वनस्पती आहे. चरकसंहितेत रोगांवरील औषधी प्रयोगांत देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेही म्हटले जाते.

१२. धोत्रा (धतुरा स्ट्रॅमोनियम) ः
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने. हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु, धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेत वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो. यासाठी धोत्र्याच्या पानाचा कोणताही वापर करताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा.

१३. पिंपळ (फायकस रीलीजीओसा) ः
अश्वत्थ पत्रे असेही पिंपळाच्या पानांना म्हटले जाते. पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे, ज्याचे संदर्भ ऋग्वेदातही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून दिली आहे.

१४. बेल (एजल मॅर्मीलॉस) ः
बेलाची ओळख बिल्व अशीही आहे. ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा आदी बाजारात उपलब्ध आहेत. बेलाची पाने शंकराच्या पिंडीवर वाहिली जातात.

१५. बोर (झिझिपस जुजुबा) ः
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने. बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास ते लाभदायक आहे. सारखी खा-खा होण्याच्या आजारावर हे चूर्ण उपयुक्त आहे. बोराच्या पानांची चटणी तांदळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

१६. मरवा (ऑरिजिनम मॅर्गोना) ः
मरवा याला मरुपत्र असेही नाव आहे. मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. हार्मोन्स हे शरीराच्या सर्वच कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अंतस्राव ग्रंथी तयार करणाऱ्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पीयूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

१७. चमेली (जॅस्मिन ग्रँडीक्लोरम) ः
चमेलीची पाने प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे. आयुर्वेदात चमेलीच्या पानांचा उल्लेख गुणकारी असा आहे.

१८. माका (इक्लिप्टा एल्बा) ः
भृंगराजपत्र म्हणजे माक्याची पाने. माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ‘केश्य गुणधर्म’. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो. माक्याचे तेल डोकेदुखीवरही गुणकारी आहे.

१९. रुई (कॅलोट्रॉपिस प्रॉस्पेरा) ः
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

२०. शंखपुष्पी (इव्हॉलव्हिलस ॲत्सीनॉइडर्स) ः
विष्णुक्रान्ता असेही शंखपुष्पीचे नाव आहे. ही वनस्पती बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध आहे. शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

२१. शमी (प्रोसोपीस स्पायसीजीरा) ः
शमी हा शब्द ‘शमयति रोगान् इति’ म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे. विविध रोगांवरील औषधात शमीचा उपयोग केला जातो.

गणेशोत्सवात विधीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वनस्पती आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला की याच कालावधीत यातील काही वनस्पतींना बहर येतो. या निमित्त आपण निसर्गाच्या जवळ जातो. आपल्याकडे काही धार्मिक चालीरीतींचा संदर्भ हा आरोग्य आणि ऋतुमानानुसार होणाऱ्या निसर्गातील बदलाशी जोडला गेला आहे.
- डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92495 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..