इचलकरंजीला मिळणार दूधगंगेचे पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीला मिळणार दूधगंगेचे पाणी
इचलकरंजीला मिळणार दूधगंगेचे पाणी

इचलकरंजीला मिळणार दूधगंगेचे पाणी

sakal_logo
By

47146 - इचलकरंजी महापालिका

इचलकरंजीला मिळणार दूधगंगेचे पाणी
सुळकूड पाणी योजनेला केंद्राची मंजुरी; शहरवासीयांना मोठा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १ ः इचलकरंजी शहरासाठी महत्त्‍वकांक्षी असलेल्या सुळकूड (दूधगंगा) नळ पाणी योजनेला केंद्र शासनाने अमृत- दोनमधून मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती राज्य शासनाने आज महापालिका प्रशासनाला दिली. या योजनेचा प्रस्तावित खर्च १५६ कोटी ६९ लाख इतका आहे. आता तांत्रिक मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या योजनेसाठी पहिल्या टप्प्यातील निधी मिळणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात योजनेच्या प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होणार आहे.
इचलकरंजी शहरासाठी सध्या कृष्णा आणि पंचगंगा योजना कार्यान्वित आहेत. यातील कृष्णा योजना गळकी आहे. त्यामुळे योजनेचे सक्षमीकरण सुरू आहे. पंचगंगा योजनेची क्षमता कमी असून संकटकालीन पर्याय आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता मागणीपेक्षा तब्बल ३२ टक्के पाणी कमी उपलब्ध होते. त्यामुळे शहरात सातत्याने टंचाईचा प्रश्न उद्‍भवत असतो. त्यामुळे शहरासाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्चाची वारणा नळपाणी योजना तत्कालीन भाजप-शिवसेना शासन कालावधीत मंजूर करण्यात आली होती; मात्र या योजनेला वारणा नदीकाठ परिसरातून विरोध झाला. परिणामी, ही योजना खूप प्रयत्नानंतरही बारगळली.
या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून किफायतशीर अशी सुळकूड उद्‍भव केंद्र धरून दूधगंगा योजनेच्या प्रस्तावाला तत्कालीन महाविकास आघाडी शासनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्‍वतः मंजुरी दिली होती. त्यानुसार महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला होता. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या अमृत -दोन योजनेतून सादर केला होता. त्याला केंद्र शासनाने मंजुरी दिल्याचे राज्य शासनाला कळविले आहे. त्यानुसार १५६ कोटी ६९ लाख रुपये खर्चाच्या योजनेस मंजुरी मिळाल्याचे महापालिकेला कळविण्यात आले. याबाबतची माहिती प्रशासक सुधाकर देशमुख यांनी दिली.

तांत्रिक मंजुरीनंतर गती
दूधगंगा योजनेच्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोल्हापूर, सांगली व पुणे विभागीय कार्यालयाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. आता प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. पुढील काही दिवसांत या प्रस्तावाला अंतिम तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विठ्ठल चोपडे यांचा पाठपुरावा
दूधगंगा योजनेसाठी तत्कालीन पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी सतत पाठपुरावा केला. डीपीआर तयार करण्यापासून ते जॅकवेलसाठी जागा निश्चित करणे, धरणातील पाणी आरक्षित करणे आदी बाबींवर यशस्वी काम केले. त्यांनी मंत्रालय पातळीवरही सतत पाठपुरावा ठेवला होता. त्यांना पाणी पुरवठा विभागातील सुभाष देशपांडे, बाजी कांबळे यांचे सहकार्य मिळाले.

असा होणार निधी उपलब्ध
अमृत - दोन योजनेतून मंजुरी
केंद्र व राज्याचा हिस्सा - ६७ टक्के
महापालिकेचा हिस्सा - ३३ टक्के
केंद्र व राज्य शासनाचा निधी - सुमारे १०४ कोटी
महापालिकेचे निधी- ५२ कोटी
शासनाकडून लवकरच पहिला हप्ता साधारणपणे ४० कोटी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92566 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..