मुंबई विमानसेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विमानसेवा
मुंबई विमानसेवा

मुंबई विमानसेवा

sakal_logo
By

फोटो- ४७५३६

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा
दसऱ्यापासून सुरू होणार
---
चंद्रकांत पाटील; सकाळच्या सत्रात मिळणार स्लॉट
सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. ३ ः अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा दसऱ्यापासून (ता. ५ ऑक्‍टोबरपासून) सुरू होत आहे. सकाळच्या सत्रात मुंबई विमानतळावरून यासाठी स्लॉट उपलब्ध करून देण्याची ग्वाही विमानतळ प्राधिकरणाने दिल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
केंद्रीय नागरी वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमातळावर विमातनतळ विकासाबाबत बैठक झाली. बैठकीतील निर्णयाची माहिती श्री. पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांना दिली. बैठकीला खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक कार्यकारी संचालक जे. टी. राधाकृष्णन, कार्यकारी संचालक (दिल्ली) जी. प्रभाकरन, विमानतळ संचालक कमल कटारिया आदी उपस्थित होते.
कोल्हापूर ते मुंबई आणि कोल्हापूर- बंगळूर विमानसेवा तसेच मुंबईची सेवा सकाळी देण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री शिंदे यांनी मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवून घेतले होते. कारण, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी स्लॉट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अदानी व्यवस्थापनाकडून ५ ऑक्टोबरपासून सकाळचा स्लॉट देण्याची तयारी दाखवली आहे. सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापुरातून मुंबईला विमान जाईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर-बंगळूर विमानसेवाही सुरू होईल. अकासा आणि स्टार एअरलाईन्सने सकाळी जाण्यासाठी आणि सायंकाळी येण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार अदानी ग्रुपने त्याला परवानगी दिल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. गोव्यालाही कनेक्टिव्हिटी असावी, यासाठी मागणी केल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे लवकरच मुंबई, बंगळूर आणि गोवा या विमानसेवा सुरू होतील, अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.
आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा सुरू राहील. अकासा आणि स्टार एअरलाईन्सने १५ दिवसांत विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही दिल्याचे श्री. महाडिक म्हणाले. दोन स्लॉट मिळाल्यास दोन्ही कंपन्यांकडून विमानसेवा सुरू होतील. स्टार एअरलाईन्सला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यावरूनही बैठकीत चर्चा झाल्याचे महाडिक म्हणाले. मात्र, केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या अजेंड्यात कोणताही उल्लेख नसल्याने त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलेले नाही. मात्र, या संदर्भात आपल्या कार्यालयाकडून माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठे विमान उतरले धावपट्टीवर
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, की ज्योतिरादित्य ज्या विशेष विमानाने कोल्हापूरच्या धावपट्टीवर उतरले, ते सर्वांत मोठे विमान आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे.

मार्चअखेर टर्मिनलचे काम पूर्ण करा ः ज्योतिरादित्य
कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्चअखेर पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय मंत्री शिंदे यांनी दिले. कोल्हापूर राज्यात महत्त्वाचे शहर आहे. कोल्हापूरची प्रगती आणि विकास जलद गतीने होण्यासाठी कोल्हापूरमधून विविध राज्यांना जोडणाऱ्या विमानसेवा अधिक प्रमाणात सुरू होणे आवश्यक आहे. या दृष्टीने विमानतळ विस्तारीकरणाची कामे दर्जेदार व जलदगतीने होणे गरजेचे आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या ६४ एकर भूसंपादनाची प्रक्रिया जलद पूर्ण करा. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एचटी लाईनचे शिफ्टिंग, टर्मिनल बिल्डिंगचे डिझाईन करताना ग्रीन बिल्डिंग होण्यावर भर, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणे, विमानतळ विस्तारीकरणांतर्गत नेर्ली- तामगाव रोडचे शिफ्टिंग ही कामे गतीने पूर्ण होण्यासाठी प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93067 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..