शिक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर
शिक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर

शिक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर

sakal_logo
By

शिक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर

डॉ. राधाकृष्णन यांना १९५४ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. नेहमी अध्यापनात रमणाऱ्या शिक्षकाला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. आपल्या गुरूंच्या आयुष्यातील सर्वोच्च यशाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, आपल्या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ साजरा करावा असा हट्ट त्यांच्या विद्यार्थ्यांनी धरला. पण डॉ. राधाकृष्णन यासाठी तत्काळ तयार झाले नाहीत. १३ मे १९६२ रोजी त्यांची भारताच्या राष्ट्रपतिपदी नेमणूक केली. तेव्हा मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना आपला वाढदिन साजरा करण्याची संमती दिली. हा दिवस फक्त आपल्यापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आयुष्यभर झटणाऱ्या समस्त शिक्षकांसाठी समर्पित करण्यासाठी हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करावा असेही त्यांनी सुचवले. अशाप्रकारे १९६२ पासून आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून पूर्ण भारतभर साजरा केला जातो.
------------
५ सप्टेंबर दरवर्षी हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. याच दिवशी १८८८ मध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती अशी दोन सर्वोच्च पदे भूषवलेल्या सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. डॉ. राधाकृष्णन एक महान राजनीतिज्ञ होते. त्यांची भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्रात विशेष रुची होती. तत्त्वज्ञान हा त्यांचा अध्ययन आणि अध्यापनाचा मुख्य विषय राहिला होता. याद्वारे त्यांनी आयुष्यभर भारतीय संस्कृतीतील चिरंतन तत्त्‍वे जगभरात प्रसारित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आपल्या जीवनात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पडल्या असल्या तरी शिक्षकी पेशातच ते जास्त रमले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची विशेष ख्याती होती. त्यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो.
आज शिक्षक दिन साजरा होत असलेल्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शिक्षकांसमोर कोणती आव्हाने उभी ठाकली आहेत याचेही स्मरण करणे आवश्यक आहे. त्यातील महत्त्वाचे आव्हान म्हणजे शिक्षकांची समाजात मलीन होत चाललेली प्रतिमा हे सर्वात मोठे आव्हान आहे. याचा प्रत्यय अलीकडे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविषयी घेतलेल्या टोकाच्या भूमिका व मांडलेली मते यावरूनही येते. आमदार बंब यांची मते किती योग्य आहेत? हा भाग जरी संशोधनाचा असला तरी समाज माध्यमात त्यांच्या भूमिकेला मिळत असणारा पाठिंबा शिक्षकी पेशाविषयी समाजमनात असणारी भावना व्यक्त होते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी शिक्षकांनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आपण करीत असलेल्या कामाचा लेखाजोखा समाजासमोर विविध माध्यमातून ठेवला पाहिजे.
आजकाल ब्लॉगच्या माध्यमातून अनेक शिक्षक असा प्रयत्न करीत असले तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. अलीकडे टीईटीमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे मोठ्या प्रमाणात राळ उडालेली आहे. शिक्षक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या अनेक बातम्या वाचायला मिळत आहेत. राजकीय व्यक्ती, प्रशासकीय बाबू, त्यांचे हस्तक आणि नैतिक अधःपतन झालेले पात्रताधारक यांच्या अभद्र युतीमुळे यामुळे शिक्षकांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. आज शिक्षकांचे हरवत चाललेले समाजभान हा सुद्धा एक कळीचा मुद्दा म्हणून समोर येताना दिसत आहे.
‘शिक्षण’ ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. त्यामुळे शिक्षकाच्या विचार-वर्तनाचा परिणाम हा समाजावर होत असतो याची जाणीव शिक्षकाने नेहमी बाळगणे आवश्यक आहे. शिक्षकाचे चारित्र्य विद्यार्थ्याला व समजाला दिशा देणारे असावे, ही धारणा समाजामध्ये घट्ट रुतून बसली आहे. त्यामुळे कामाच्या नियमित वेळेत तर व्यावसायिक नैतिकता बाळगणे आवश्यक आहेच; पण समाजात वावरत असतानाही आपण मूल्यसंवर्धन करण्याऱ्या एका महत्त्वाच्या सामाजिक संस्थेचा घटक आहोत याचे भान नेहमी बाळगणे आवश्यक आहे.
मुख्याध्यापकाने पाणी पिल्याने मारहाण केल्याने विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू, जातीय अभिनिवेशातून होणारी मारहाण, शिक्षेचे अघोरी प्रकार, किशोरवयीन मुलींचे होणारे विनयभंग, राजकीय क्षेत्रात शिक्षकांचा वाढलेला अवाजवी वावर व त्यामुळे मूळ कार्यावर होणारा परिणाम असे अनेक प्रकार विविध माध्यमातून समाजासमोर वारंवार येत असल्यामुळे शिक्षकांचे सामाजिक व वैयक्तिक चारित्र्य मलीन होत चालले आहे. त्यासाठी शिक्षकाने समाजासमोर आदर्श चारित्र्याचे उदाहरण आपल्या वर्तनातून ठेवणे हाच उपाय आहे. शिक्षकांचेही असंख्य प्रश्न आज आ वासून उभे आहेत. विद्यार्थी संख्येपेक्षा शिक्षकांची पदे अतिरिक्त आहेत असे एक आमदार जाहीरपणे सांगत असेल; तरी आजही हजारो शाळा एकशिक्षकी आहेत.
आज घडीला राज्यात ३१ हजार शिक्षक संवर्गातील पदे रिक्त आहेत अशी शासनाने जाहीर केलेली आकडेवारी आहे. या ठिकाणी एकाच शिक्षकाला शिपायापासून मुख्याध्यापकांपर्यंतची सर्व प्रशासकीय कामे आणि अध्यापन करावे लागेत याकडे समाज आणि शासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. घटनेला अभिप्रेत असलेल्या कल्याणकारी राज्यात शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देण्याची जबाबदारी शासनाची असताना शिक्षक भरती व्हावी यासाठी रस्त्यावर उतरून शासनाबरोबर संघर्ष करावा लागणे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. शिक्षक भरतीच्या प्रश्नांवर समाजाने उठाव केल्याची घटनाही कधी ऐकिवात नाही. भरती हा प्रश्न फक्त शिक्षकाच्या पगाराशी संबंधित नसून तो आपल्या हक्कांशी संबंधित आहे ही बाब समाजानेही समजून घेतली पाहिजे.
गेल्या २० वर्षांपासून ‘विनानुदानित शाळा, महाविद्यालये’ अशा मथळ्याखाली कार्यरत असणारा शिक्षक, प्राध्यापक अत्यंत दयनीय अवस्थेत मार्गक्रमण करीत आहे. काही शिक्षक तर कधीतरी आपण कायम होऊ या आशेवर तटपुंज्या पगारावर अथवा पगाराविना निवृत्त झाल्याच्या घटना घडत असताना शासन या बाबींकडे गंभीरपणे बघत नसेल व समाज या प्रश्नात हस्तक्षेप करीत नसेल तर शिक्षकांविषयी हा निव्वळ कृतघ्नपणा आहे. याच प्रश्नाबरोबर तासिका तत्त्‍वावरील प्राध्यापकांच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे.
२०१२ पासून पूर्ण क्षमेतेने प्राध्यापक भरती झालेली नसल्यामुळे आज हजारो उच्चशिक्षित अल्प मानधनात अध्यापन करीत आहेत. या अल्प मानधनात दैनंदिन खर्च चालवणेही प्राध्यापकांना कठीण झाले आहे. कोरोनात उपचाराला पैसा नाही म्हणून काहींना जीव गमवावा लागला आहे. ‘शिक्षकांची सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयाच्या अनुषंगाने चर्चा ही हिमनगाच्या टोकासारखी आहे. या टोकाच्या तळाशी अजून अनेक प्रश्न आणि समस्या असलेल्या पहावयास मिळतील. विस्तारभयास्तव सर्वांवर चर्चा करणे अशक्य आहे. तरीही या शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज, शासन या प्रत्येक घटकाने आपल्या कर्तव्याचे योग्य प्रकारे निर्वाहन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.

प्रा. सौरभ पाटणकर,
मराठी विभाग,
नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँण्ड कॉमर्स, इचलकरंजी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93330 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..