स्वेच्छेने १६ अर्ज, आता चौकशीचे हत्यार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वेच्छेने १६ अर्ज, आता चौकशीचे हत्यार
स्वेच्छेने १६ अर्ज, आता चौकशीचे हत्यार

स्वेच्छेने १६ अर्ज, आता चौकशीचे हत्यार

sakal_logo
By

स्वेच्छेने १६ अर्ज, आता चौकशीचे हत्यार
गडहिंग्लज तालुका; स्वस्त अन्नधान्य समर्पणासाठी मुदत वाढविली
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : ज्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, त्या कुटुंबांना स्वत:हून स्वस्त अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यानुसार तालुक्यातून महसूलच्या पुरवठा विभागाकडे केवळ १६ स्वेच्छेचे अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, योजनेतून बाहेर पडण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत वाढविल्याचे सांगण्यात येत आहे. या मुदतीनंतर आता महसूलकडून गावपातळीवर स्थानिक चौकशीचे हत्यार उपसण्याची शक्यता आहे.
अन्नधान्य सुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त धान्य वितरणाचा कोटा निश्‍चित केला आहे. या लाभासाठी शहरी भागातील लाभार्थींना ५९, तर ग्रामीण लाभार्थींना ४५ हजार वार्षिक उत्पन्नाची अट आहे. निश्‍चित कोटाइतकाच धान्य पुरवठा होत असल्याने गरजू असूनही त्यांना धान्य देणे सुरक्षा कायद्याने बंधने आली आहेत. परिणामी अनेक गरजू या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. दरम्यान, गरजूंना धान्य मिळावे म्हणून वर्षभरापूर्वी तहसीलदार दिनेश पारगे यांनी तालुक्यात धान्य समर्पण योजना राबविली. या मोहिमेतून ११ हजार युनिटचे धान्य उपलब्ध झाले आहे. हे धान्य गरजूंना देण्याच्या हेतूने ग्रामपंचायतींकडून गरजूंची यादी मागविली; मात्र अजून अशी यादी मिळालेली नाही.
गेल्या महिन्यात पुरवठा विभागाच्या आयुक्तांनी वार्षिक उत्पन्न वाढलेल्या लाभार्थींनी स्वत:हून धान्य समर्पण करून योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. ३१ ऑगस्टअखेर त्याची मुदत होती. तहसीलदार पारगे यांनी गतवर्षीच राबवलेल्या या योजनेचे काम चांगल्या पद्धतीने झाले आहे. आताच्या योजनेतून केवळ १६ अर्जांद्वारे संबंधित कुटुंबांनी स्वत:हून बाहेर पडण्याचे ठरवले आहे. दरम्यान, अर्ज देण्यासाठी आणखीन मुदत वाढवून ती १५ सप्टेबरपर्यंत केल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी पुरवठा विभागाकडून या उपक्रमाचा प्रसार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. दुकानदारांना दर्शनी भागात तसा फलक लावण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे स्वत:हून बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणखीन वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुदतीनंतर महसूल विभागाकडून स्थानिक चौकशी करून उत्पन्न वाढलेल्यांची नावे योजनेतून कमी केली जाणार आहेत. त्याची तयारीही आतापासूनच प्रशासनाकडून सुरू झाल्याचे समजते.

चौकट..
बाजारभावानुसार वसुली
तपासणीत उत्पन्न वाढल्याचे लक्षात आल्यास आयुक्तांनी संबंधित कुटुंबाला यापूर्वी पुरवठा केलेल्या धान्याची रक्कम बाजारभावाच्या किमतीने वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी उत्पन्न वाढलेल्या लाभार्थींनी आताच स्वत:हून योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93637 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..