शहापूर खाणीतच विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर खाणीतच विसर्जन
शहापूर खाणीतच विसर्जन

शहापूर खाणीतच विसर्जन

sakal_logo
By

48174
48175

-------------------
इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये ‘बाप्पां’ना निरोप
भाविकांकडून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास साथ; शहापूर खाणीत क्रेन, बोटींची व्यवस्था
इचलकरंजी, ता. ५ ः इचलकरंजीसह हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात आज घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन केले. भाविकांनी आज ‘बाप्पां’ना निरोप दिला. इचलकरंजीमध्ये शहापूर खाणीसह महापालिकेने ७२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती. अनेक नागरिकांनी घरीच पर्यावरणपूरक गणपती विसर्जनास प्राधान्य दिले.
शहापूर खाणीमध्ये पर्यावरणपूरक घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करीत भाविकांनी सजगता दाखवली. सुमारे तीन हजार गणेशमूर्तींचे या ठिकाणी विधिवत विसर्जन केले. सुमारे एक टन निर्माल्य जमा झाले. मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रेनची सोय केली होती, तर लहान मूर्ती दोन बोटीच्या माध्यमातून विसर्जित केल्या. यामुळे पर्यापूरक गणेशमूर्ती विसर्जनाला येथे चांगले बळ मिळाले.
प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन करण्याबाबत आवाहन केले होते. त्याला शहापूर खाण येथे मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी दोन क्रेन सज्ज ठेवल्या होत्या. दोन यांत्रिक बोटींच्या माध्यमातून गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येत होते. त्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली होती. काठावर गणेशमूर्ती ठेवण्यासाठी टेबलांची सुविधा उपलब्ध केली होती. तेथे भाविकांकडून आरती करण्यात येत होती. विसर्जनासाठी शहापूर पोलिसांची यंत्रणा मदतकार्यात होती. या शिवाय आयजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय पथकही तैनात होते. सकाळपासूनच येथे भाविक स्वयंस्फूर्तीने येत होते. काठावरच निर्माल्य जमा करण्यात येत होते. येथे रात्री प्रखर विद्युत दिव्यांची सोय केली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरूच होते. विसर्जनावेळी महिलांसह लहान मुलांचाही सहभाग होता. महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख, उपायुक्त प्रदीप ठेंगल, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उप अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी भेट देऊन पाहणी केली. यांत्रिक बोटीतून सफर करीत विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला.
------
प्रशासनाचे प्रयत्न सार्थकी
महापालिका प्रशासनाने काही दिवसांपासून खाणीवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा गतिमान केली होती. त्यामुळे आज पर्यावरणपूरक घरगुती गणेशमूर्ती विसर्जनामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी, प्रशासनाचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले.
--------------
शहापूर खाण विसर्जन दृष्टिक्षेप
(सायंकाळी सहा वाजेपर्यंत)
गणेशमूर्ती विसर्जन - २१८८
निर्माल्य जमा - १ टन
---------
कुरुंदवाड परिसर
कुरुंदवाड ः शहर व परिसरातील सर्वच गावांतील घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन केले. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या आवाहनानुसार मूर्ती व निर्माल्य दानला नागरिकांतून प्रतिसाद मिळाला. पालिकेतर्फे शहरात सन्मित्र चौक, पालिका चौक, शिवतीर्थ चौक व सन्मित्र चौक आदी ठिकाणी गणेश विसर्जन कुंड, काहिली व निर्माल्य कुंडाची व्यवस्था केली होती. तेथे मूर्ती विसर्जित करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. श्रींची मूर्ती दान करून काही भक्तांनी ‘पंचगंगा बचावासाठी’ खारीचा वाटा उचलला. निर्माल्य कुंभात एकत्रित दान करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा ‍केला.
विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला होता. दान केलेल्या गणेशमूर्ती पालिकेच्या वतीने एकत्र करून सरकारी विहिरीत विसर्जनाची व्यवस्था केली होती.
------------
शिरोळ परिसर
शिरोळ ः येथे बाप्पांचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. अनेकांनी घरगुती बाप्पांचे, तसेच गौरींचे काहिलीमध्ये विसर्जन केले. शिरोळ तालुक्यामध्ये सर्वप्रथम पर्यावरणपूरक गौरी-गणपती विसर्जनाची प्रथा शिरोळमधून सुरू केली होती. कै. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी पर्यावरणपूरक गौरी-गणपती विसर्जन करण्यासाठी प्रबोधन करून दत्त साखर कारखान्यातर्फे कृत्रिम काहिली उपलब्ध करून दिल्या होत्या.
सोमवारी शिरोळ नगर परिषदेतर्फे पंचगंगा नदीकाठी, तसेच उपनगरातील काही ठिकाणी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यासाठी काहिली उपलब्ध करून दिल्या होत्या. उद्योगपती दयानंद जाधव यांनीही यादवनगर परिसरात पर्यावरणपूरक गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यासाठी सुविधा उपलब्ध केली होती.
नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष सौ. कमलाबाई शिंदे, नगर परिषदेचे मुख्य लिपिक संदीप चुडमुंगे, सचिन सावंत आदींनी सहभाग नोंदवला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93748 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..