३ हजार गणेशमुर्ती कुंभारांकडे परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३ हजार गणेशमुर्ती कुंभारांकडे परत
३ हजार गणेशमुर्ती कुंभारांकडे परत

३ हजार गणेशमुर्ती कुंभारांकडे परत

sakal_logo
By

48485

पाच हजार मूर्ती कुंभारांना परत
---
पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव; पुरोगामी जिल्ह्याचे आणखी एक आश्‍वासक पाऊल
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ६ : दरवर्षी गणेशोत्‍सव साजरा करणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. एका बाजूला मूर्तींची मागणी वाढत असली, तरी गणेशोत्स‍वानंतर विसर्जनाचाही प्रश्‍‍न निर्माण होत आहे. मात्र, यावरही कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करून तोडगा काढला. नागरिकांनी आपल्याकडील मूर्ती कुंभारांनाच परत करून पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवासाठी आणखी एक आश्‍‍वासक पाऊल टाकले आहे. जिल्‍ह्यात सुमारे चार हजार ८४६ मूर्ती कुंभारांना परत केल्या आहेत.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करून पर्यावरण जपण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. अनेक वर्षांच्या प्रबोधनाने पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवाची चळवळ शहरासह खेड्यापाड्यात पोचली. सुरुवातीला मूर्ती, निर्माल्य दान करण्यापासून सुरू झालेली ही चळवळ आता कुंभारांकडे मूर्ती परत करण्यापर्यंत पोचली आहे. अलीकडे विसर्जनाचा प्रश्‍‍न निर्माण झाला. विसर्जित करण्यात आलेल्या मूर्तींची पुढे विटंबना होऊ नये, विसर्जनामुळे प्रदूषण होऊ नये आदी बाबींचा विचार करून जिल्‍ह्यातील नागरिकांनी मूर्ती कुंभारांनाच परत करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे सर्व स्‍तरांतून स्‍वागत होत आहे.

पर्यावरणपूरक उत्सव
एकूण ग्रामपंचायती- एक हजार २५
घरातच विसर्जन- तीन हजार ४१३
धातूंच्या मूर्तींची प्रतिष्‍ठापना- ९८
एकूण मूर्ती- दोन लाख ७१ हजार ४४९
पर्यावरणपूरक विसर्जन- दोन लाख ६६ हजार ६०३
निर्माल्य संकलन- पाच लाख ३१ हजार ३८८ किलो

तालुका कुंभारांकडे दिलेल्या मूर्ती
भुदरगड ८२०
गडहिंग्‍लज १०८३
गगनबावडा ४४६
हातकणंगले १५३१
करवीर २१०
राधानगरी ६४१
शाहूवाडी ११५
एकूण ४८४६


शहरात शाडू पुन्हा कुंभारांकडे
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला कोल्हापूरकरांनी यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचाच भाग म्हणून आता पर्यावरणपूरक विसर्जनानंतर संकलित झालेली शाडू कुंभारांकडे सुपूर्द केली जाणार आहे. शाडूतूनच पुढील वर्षीच्या मूर्ती साकारल्या जातील. वैयक्तिक पातळीवर अनेक जण घरीच विसर्जित केलेल्या मूर्तींची शाडू कुंभारांकडे जमा करतात. पण, आता सार्वजनिक पातळीवरही हा उपक्रम व्यापक होऊ लागला आहे.
शिवाजी पेठेतील सरदार तालीमने गेली अनेक वर्षे हा उपक्रम सुरू ठेवला. १५० ते २०० हून अधिक मूर्ती तालमीसमोर ठेवलेल्या विसर्जन कुंडात विसर्जित होतात. त्यातील निम्म्याहून अधिक मूर्ती शाडूच्या असतात. त्या स्वतंत्र कुंडात विसर्जित होतात. या सर्व मूर्ती विरघळल्या असून, बॅरलभर शाडू तयार होते आणि ती कुंभारांना वितरित केली जाते. इंडियन मार्शल आर्ट थांग ता असोसिएशनबरोबरच ब्रह्मेश्वर पार्क परिसरातील मंडळांनीही आता या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

‘निसर्गमित्र''चा असाही पुढाकार
निसर्गमित्र संस्थेकडे प्रत्येक वर्षी अडीच हजार शाडूच्या मूर्तींसाठी बुकिंग होते. त्यापैकी बाराशे ते तेराशे मूर्ती घरीच विसर्जित करून ही शाडू पुन्हा संस्थेकडे जमा केली जाते. संस्था ही माती प्रत्येक वर्षी कुंभारांना परत करते. त्याच्याही पुढे जाऊन आता मूर्ती नेताना आणि शाडू परत देताना नैसर्गिक रंगनिर्मितीसाठी आवश्यक विविध बियांसह इतर साहित्य संस्थेतर्फे मोफत दिले जाऊ लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93969 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..