केसरी ढोल पथकाचे प्रेरणादायी योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरी ढोल पथकाचे प्रेरणादायी योगदान
केसरी ढोल पथकाचे प्रेरणादायी योगदान

केसरी ढोल पथकाचे प्रेरणादायी योगदान

sakal_logo
By

48737
-------------
केसरी ढोल पथकाचे प्रेरणादायी योगदान
उत्पन्नातील चाळीस टक्के रक्कम समाजहितासाठी; विद्यार्थ्यांना मदत
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ७ ः वेस्टर्न वाद्यांमध्ये पारंपरिक वाद्यांचे महत्त्व कायम ठेवण्यात मोठे योगदान ढोल, ताशा, हालगी या पथकांचे आहे. कोणत्याही मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकाशिवाय रंगत येत नाही. ढोलांची झिंग, ताशांचा तर्रर्र आवाज हा आजही आबालवृद्धांना ठेका धरण्यास भाग पडतो. इचलकरंजी शहरातील केसरी ढोल पथकाने पारंपरिक वाद्यांचे महत्त्व अबाधित राखत समाजहिताचा भार उचलला आहे. सात वर्षांपासून मिळणाऱ्‍या उत्पन्नामधील सुमारे चाळीस टक्के रक्कम समाजहितासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे या पथकाने समजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शालेय वस्तूंचे वाटप करणे, शिक्षणात आधुनिक यंत्राचा वापर करून शिक्षण सुलभ व्हावे यासाठी प्रोजेक्टर व अन्य साहित्य भेट देणे, अनाथ मुलांना आर्थिक मदत तसेच त्यांच्या सहलीचे आयोजन करणे, दुर्गम भागामधील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून शैक्षणिक प्रवाहात आणून संबंधित साहित्य उपलब्ध करून देणे, शाळांना कॉम्प्युटर सेट भेट देणे यांसह अन्य मार्गांमधून सामाजिक कार्य करण्यास केसरी ढोल पथक सात वर्षांपासून अग्रेसर आहे. या सामाजिक कार्यासाठी हे पथक वर्षभरातून मिळणाऱ्‍या उत्पन्नामधील ठराविक भाग राखीव ठेवते. अन्य रक्कम केवळ साहित्याची दुरुस्ती, प्रवास खर्च भागवण्यासाठी ठेवली जाते.
पथकाची स्थापना २०१५ मध्ये आशुतोष नागवेकर व भूषण फडके यांनी केली. ते प्रथम पुणे येथील प्रसिद्ध असलेल्या रमणबाग पथकामध्ये सहभागी होते. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पथक नसल्याचे समजताच त्यांनी मित्रांना एकत्रित करीत त्यांना प्रशिक्षण देऊन निर्मिती केली. सुरुवातीपासूनच पथकाचे प्रमुख उद्दिष्ट हे समाजहिताचे असल्याने विविध उपक्रम राबवण्यात येतात. सध्या पथकामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक, विद्यार्थी असे २१० मुले, मुली सभासद आहेत.
-------
पुन्हा जोमाने सामाजिक कार्य करू
२०१९ मधील महापूर, तसेच २०२०-२१ ही दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधात गेली. या तीन वर्षांचा मोठा परिणाम वादकांच्या उत्पन्नावर झाला आहे. पथकामध्ये सरासरी ८५ हून अधिक ढोल आहेत. तीन वर्षे ढोल वापरात नसल्याने ढोलची चामडी, दोरी खराब झाली आहे. त्यामुळे पथकामधील अधिकतर साहित्याची दुरुस्ती करावी लागली आहे. त्यामुळे तीन वर्षांमध्ये सामाजिक कार्य करताना मर्यादा आल्या होत्या. सध्या पथकांची मागणी वाढल्याने पुन्हा जोमाने सामाजिक कार्य करीत राहू, असे आशुतोष नागवेकर यांनी सांगितले.
-----------
उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी
आजचा विद्यार्थी हा उद्याचा देशाचा नागरिक आहे. त्याला योग्य प्रकारे शिक्षण मिळाल्यास तो उद्याचा उज्ज्वल भारत घडवू शकतो. अनेक वेळा परिस्थितीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अशक्य असते; परंतु समाजातील दानशूर व्यक्तींमुळे ते शक्य होते. इचलकरंजीतील केसरी ढोल पथकही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94244 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..