आवाज बंद म्हणजे बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवाज बंद म्हणजे बंद
आवाज बंद म्हणजे बंद

आवाज बंद म्हणजे बंद

sakal_logo
By

49267

मोरया, मोरया.. मोरया...

बाप्पांना भावपूर्ण निरोप; पारंपरिकसह सिस्टीमचा दणदणाट, लेसर शोच्या झगमगाट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः पारंपरिक वाद्यांसह सिस्टीमचा दणदणाट आणि लेसर शोच्या झगमगाटात शुक्रवारी विघ्नहर्त्या बाप्पाला कोल्हापूरकरांनी भावपूर्ण निरोप दिला. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी झेलत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव यानिमित्ताने सजला. सकाळी साडेआठला मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर दिवसभर पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाद्वार रोड मुख्य मिरवणूक मार्गांवरून मंडळांच्या मिरवणुका निघाल्या. मात्र, सायंकाळनंतर साऊंड आणि लेसर शोमुळे सारा मिरवणूक मार्ग दणाणून गेला. दरम्यान, परंपरेप्रमाणे सायंकाळी सात वाजता महालक्ष्मी भक्त मंडळाचा मानाचा गणपती महाद्वारातून मुख्य मिरवणूक मार्गावर आला. ब्रास बॅंडच्या निनादात मिरवणुकीने या मानाच्या गणपतीचे विसर्जन झाले.

हद्दवाढीची मागणी
करत मिरवणुकीला प्रारंभ
मंगळवार पेठेतील तुकाराम माळी गणेश मंडळाच्या मानाच्या गणेशमूर्तीचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजन झाले आणि मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. माजी मंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलिसप्रमुख शैलेंद्र बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, किसन कल्याणकर आदींच्या उपस्थितीत मिरवणूक सुरू झाली. बाप्पाची पालखी खांद्यावर घेऊन मान्यवर काही अंतर पायी चालले. त्यासोबत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती ‘बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’या असा गजर सुरू झाला. पालखीतील विराजमान श्री. गणेश त्यासोबत सजावट केलेल्या ट्रक्टरमध्ये ठेवलेली शोभेची मूर्ती त्यासोबत शिस्त पद्धतीने निघालेले कार्यकर्ते अशा दिमाखात मिरवणूक सुरू झाली. पाठोपाठ मंगळवारपेठेकडून आलेले गणेश मंडळ टेंबेरोडवरून तसेच बिंदू चौकाकडून आलेल्या मंडळांनी अजस्त्र ध्वनियंत्रणा लावल्या. त्यापाठोपाठ एकेक मंडळ मार्गस्थ होऊ लागले. गणेश मंडळ शांततेत व प्रसन्न वातवरणात मिरवणूक करतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, असा फलक घेऊन गणपती पाप्पाचा वेशभूषा करून एक कार्यकर्ता तुकाराम माळी मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाला. गणपती बाप्पाचा रथ म्हणून मोटार सायकलला उंदराची प्रतिकृती बनविली होती.

बाराला बंद म्हणजे बंद...
रात्री बारा वाजता सिस्टीमचा आवाज बंद म्हणजे बंद, असा घेतलेला पवित्रा पोलिसांनी करून दाखविला. रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत मिरवणूक मार्गावर सिस्टीम वाजली नाही. काही मंडळांनी सिस्टीम बंद केल्यानंतर ढोल-ताशांचे पथक आणून मिरवणुकीत जल्लोष करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे सुमारे पंचाहत्तरहून अधिक मंडळांनी आहे, त्या ठिकाणीच मूर्ती ठेवून पहाटे सहा वाजता येण्याचा निर्णय घेतला.
शासन आणि न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री बारानंतर सिस्टीम बंद केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी मंडळांच्या बैठकीतून दिली होती. त्यानुसार रात्री बारा वाजता आवाज बंद होणार, हे निश्‍चित झाले होते. मुख्य मिरवणूक मार्गावरील महाद्वार रोडवर येण्यासाठी अनेक मंडळांनी सायंकाळ होण्याची वाट पाहिली. पोलिसांनी मुख्य मिरवणूक मार्गावर जाण्यासाठी दिलेल्या सूचनाही त्यांनी पाळल्या नाहीत. अखेर रात्री बारा वाजता खुद्द पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गंगावेस येथे मंडळासमोरील सिस्टीम बंद करायला लावली आणि तेथून पटापट महाद्वार रोडच नव्हे तर पर्यायी असलेले ताराबाई रोड, न्यू महाद्वार, बिंदू चौक, खासबाग, उमा टॉकीज या मार्गावरील सिस्टीम बंद झाली. श्री. बलकवडे आणि उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह पोलिसांचे पथक मिरवणूक मार्गावरून फिरत राहिले आणि मिरवणूक साडेबारापर्यंत शांत झाली. सिस्टीम नको पारंपरिक वाद्य चालते, हे कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी ढोल-ताशांची पथके आणण्यास सुरवात केली.
------------
रस्त्यावरच अंथरूण
मंडळाचे कार्यकर्ते थेट प्लास्टिक कागद रस्त्यावर अंथरूण झोपी गेले. काही कार्यकर्ते मूर्ती तेथेच ठेवून घरी गेले. सर्वांनी पहाटे सहानंतर पुन्हा सिस्टीम लावूनच मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही पुढे नेणे पोलिसांना शक्य झाले नाही. तेथे पोलिसांचे प्रयत्न फसले. लाखो रुपये खर्चून आणलेली सिस्टीम न वाजल्याचा राग कार्यकर्त्यांनी मिरवणूक रेंगाळत ठेवून काढला.


ताराबाई रोडवर रात्री उशिरापर्यंत जैसे थे
ताराबाई रोडवरील मंडळांसाठी मिरवणुकीची जागा चिठ्ठ्या टाकून निश्चित झाली होती, तरीही आदल्या दिवशीच मंडळांचे ट्रॅक्टर ताराबाई रोडवर आणले होते.
क्रम चुकल्याने तशी तक्रार मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली. योग्य क्रम लावल्यानंतर एका मागोमाग लेसर शो, साऊंड सिस्टीम व त्यामागे गणेश मूर्ती होत्या. सकाळी मिरवणूक झाल्यानंतर मित्रप्रेम, दयावान, रंकाळवेस, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, क्रांती बॉईजच्या मिरवणुका होत्या. पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी महाडिक चौकात बॅरिकेड्स लावले होते. मिरवणूक सायंकाळी सहाच्या सुमारास ताराबाई रोडवरून महाद्वार रोडवर नेण्यासाठी मंडळे उत्सुक होती. मिरवणूक रेंगाळल्याने मात्र या मार्गावरील मंडळे रात्री एकाच जागी होती. कार्यकर्ते हिंदी व मराठी गीतांवर नृत्य करत होते. रात्री उशिरा या मार्गावरील मंडळे मुख्य मार्गावर आली.

कांदेकर मंचच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या
रात्री एकच्या सुमारास उमेश कांदेकर मंचची मिरवणूक न्यू गुजरी कॉर्नर येथे आली. साऊंड सिस्टीम पोलिसांनी बंद केल्याने कार्यकर्ते नाराज होते. त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारून शिंदे सरकारविरोधात घोषणा दिल्या. साऊंड सिस्टीमला विरोध कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ''उदं ग उदं आई,'' ''अंबाबाईच्या नावानं चांगभलं,'' अशा घोषणा दिल्या. अखेर येथे पोलिस यंत्रणा धावली. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. केवळ गणेशाची आरती लावण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यास परवानगी मिळताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पोलिसांना सहकार्य करत आरतीच्या ठेक्यावर कार्यकर्ते पापाची तिकटीच्या दिशेने मार्गस्थ झाले.

मास्कची मज्जा
जागोजागी रंगीबेरंगी अन्‌ चित्रविचित्र मास्क विक्रीसाठी ठेवले होते. लहान मुलांबरोबर युवक-युवतींनी ही असे मास्क खरेदी केले. या मास्कमध्ये फँटम, पिशाच्च, भुते, जोकर, मानवी कवटी, प्राण्यांचे आकार होते. हे मास्क १०० ते २०० रुपयांपर्यंत होते.


नारळ स्वीकारण्यावर बहिष्कार
सिस्टीम बंद झाल्यानंतर काही मंडळांच्या मूर्ती महाद्वार, गंगावेसमार्गावरून पुढे जात होते. तेव्हा तेथे लावलेल्या स्‍वागत कक्षातून मंडळाच्या अध्यक्षांनी नारळ-पान सुपारी घेण्यासाठी आमंत्रित केले जात होते, मात्र त्यांनी नारळ न स्वीकारण्याची भूमिका घेतली.

स्वागत कक्षात अधिकारी सज्ज
महापालिका आणि पोलिस यांचा एकत्रच असा स्वागत कक्ष पापाची तिकटी येथे होता. मध्यरात्री तेथे पोलिस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे, करवीर प्रांताधिकारी प्रशांत नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भांमरे, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.

महिलांनी ओढली ट्रॉली
उत्तरेश्वर पेठेतील गणेश प्रासादिक मंडळाच्या गणपती मूर्ती असणारी ट्रॉली महिलांनी ओढली. या मंडळाच्या महिलांनी गणेशाचा जयघोष करत मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

नौदलाच्या नव्या ध्वजाचा फलक
उद्यमनगर येथील शांतिदूत कला-क्रीडा सांस्कृतिक मंडळाने मिरवणुकीत नौदलाच्या नव्या ध्वजाचा फलक आणला होता. आजपर्यंत जेवढे नौदलाचे ध्वज
आहेत ते फलकातून मांडले. नौदलाच्या नव्या ध्वजावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची आकृतीही येथे मांडली होती.

महिलांचा लेझीमवर ताल
मंगळवार पेठेतील शांतिदूत कला-क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या गणपतीसमोर महिलांनी लेझीमवर ताल धरला. लेझीमचे तालबद्ध सादरीकरण त्यांनी केले.

महाद्वार रोडवर स्वागत मंडप
महाद्वार रोड हा मिरवणुकीचा मुख्य मार्ग आहे. येथे विविध समाजिक संस्था संघटना स्वागत मंडप उभे करतात. या वर्षी महाद्वार रोडवर शिवसेना, हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, जिल्हा सराफ संघ यांनी स्वागत मंडप उभारले होते. पुरोहीत सेवा संस्थेने स्टॉल उभारून सर्व भाविकांना मोफत पाणी वाटप केले.

धोकादायक इमारतीवर फलक
महाद्वार रोडवरील जुन्या आणि पडझड झालेल्या इमारतींवर धोकादायक इमारत असे फलक महापालिकेने लावले होते. इथे सिस्टीमचा आवाज कमी करा, असे लिहिले होते.

दुपारी महाद्वाररोड शांत
मिरवणुकीचा मुख्य मार्ग असणाऱ्या महाद्वार रोडवर दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत अपवाद वगळता गर्दी नव्हती. ऐन मिरवणुकीत महाद्वार रोज शांत होता. या कालावधीत मित्रप्रेम मंडळ वगळता कोणतेच मंडळ गेले नाही.


क्षणचित्रे..
*सकाळी दहा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आदींच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
*दुपारपर्यंत छोट्या मंडळांचा सहभाग, सायंकाळनंतर विद्युत रोषणाई व मोठ्या आवाजाची सिस्टीम असलेली मंडळे रस्त्यावर
*सायंकाळनंतर लोकांची पावले मिरवणूक मार्गाकडे, रात्री आठनंतर मिरवणुकीला रंगत, विद्युत रोषणाई, लेझर लाईटने मिरवणूक मार्ग उजळला
* मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, ताराबाई रोडवरून मुख्य मार्गावर प्रवेश करण्यासाठी मंडळांच्या मोठ्या रांगा, विशेषतः मोठ्या आवाजाच्या मंडळाचा समावेश, नियोजनाअभावी दोन तासांहून अधिक काळ महाद्वार रोड रिकामा
*इराणी खणीवर विसर्जनाची चोख व्यवस्था, पंचगंगा नदीकडे जाणारे रस्ते पोलिसांनी केले बंद, पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी मंडळाचेही चांगले सहकार्य
*महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह यंत्रणा रात्रभर इराणी खणीवर तैनात, आज दुपारर्यंत विसर्जनात महापालिकेची यंत्रणा कार्यरत
*सह्याद्रीचे शिलेदार सेवा प्रतिष्ठान यांनी हातात किल्ले संवर्धनचे फलक हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. किल्ल्यांचे संवर्धन करा. किल्ले म्हणजे पराक्रमाची गाथा आहे. त्यांचे रक्षण करा, असे फलक आकर्षक ठरले.
...........

मिरजकर तिकटीला
पुढे जाण्यावरून वाद
आकर्षक लाईट इफेक्टस्‌, साऊंट सिस्टीम व वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकणारे कार्यकर्ते, असा माहोल मिरजकर तिकटीमार्गे मुख्य मिरवणूक मार्गावर जाणाऱ्या मंडळांसमोर होता. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत तिथून केवळ ११ मंडळे बिनखांबी गणेश मंदिरच्या मार्गावर गेली. त्यामुळे सकाळी दहा वाजता लागलेली रांग शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जैसे थे होती. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन पोलिसांच्या नियोजनावर राग व्यक्त केला. या परिसरात दिवसभर कार्यकर्त्यांत वाद, किरकोळ हाणामारी, एकमेकांना आव्हान देण्याचे प्रकार झाले.

मुख्य मिरवणूक मार्गावर जाण्यासाठी मिरजकर तिकटी हा एक एंट्री पॉईंट आहे. तिथून मंगळवार पेठ, शाहू मैदान या दोन रस्त्यांवर मंडळे आली होती. शाहू मैदान, टेंबे रोड, शाहू स्टेडियममार्गे सावित्रीबाई फुले रुग्णालयापर्यंत मंडळांची रांग लागली होती. काहींनी तर मध्यरात्रीच जागा पकडण्यासाठी सिस्टीमचा ट्रॅक्टर रस्त्यावर लावून ठेवला होता. मंगळवार पेठेत तर लेटेस्ट तरुण मंडळापर्यंत व दुसरीकडे कोळेकर तिकटीपासून राम गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मंडळांची रांग होती.
या सर्व मंडळांसमोर साऊंड सिस्टीम, लाईट इफेक्टची तसेच जनरेटरची ट्रॉली होती. लाईट इफेक्टमुळे मिरवणूक मार्गावर सायंकाळनंतर जाऊ, असे सर्वांचे नियोजन होतेय; पण सकाळी मिरजकर तिकटी येथे येण्यासाठी मंगळवार पेठेतून नंगीवली तालीम मंडळ, दूध कट्ट्याजवळील रस्त्यावरून पाटाकडील तालीम मंडळ, शाहू मैदानकडून दिलबहार तालीम मंडळ, तर भवानी मंडपकडून बालगोपाल तालीम मंडळ प्रथम होते. मंगळवार पेठेतून लेटेस्ट, नंगीवली, पीटीएम गेल्यानंतर महालक्ष्मीनगरच्या मंडळाने आत जाण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध झाला. दिलबहार मंडळाच्या विनायक फाळके, सचिन पाटील यांनी पोलिसांशी वाद घालून शाहू मैदानकडील मंडळे सोडण्याचा आग्रह धरला. त्यामुळे दिलबहारची मूर्ती पुढे आली. त्यानंतर ‘नंगीवली’, ‘पीटीएम’, ‘बालगोपाल’, ‘दिलबहार’, महालक्ष्मीनगर, कलकल ग्रुप, ‘जुना बुधवार’, ‘बजापराव माने’, ‘सणगर गल्ली’, महाराणा प्रताप चौक तरुण मंडळ हीच मंडळे पहाटेपर्यंत मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर या रस्त्यावर होती. केवळ सिस्टीम व लाईट हेच येथील मंडळांचे आकर्षण होते. शाहू मैदान तसेच मंगळवार पेठेतून आलेल्या मंडळांचे कार्यकर्ते वैतागले. दिवसभरात पुढे जातो म्हणणाऱ्या मंडळांना सोडले नाही. प्रॅक्टिस क्लब पहाटे मिरजकर तिकटीवर आला.

दणाणून गेलेला परिसर झाला शांत
बारा वाजता पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टीम बंद करायला लावल्या. ज्यांच्याकडे ताशा, ढोल होते, त्यांनाही बंद करायला लावले. किमान पारंपरिक वाद्य वाजवू द्या, अशी मंडळांची मागणी होती; पण पोलिसांनी ‘दिवसभर आम्ही तुम्हाला सहकार्य केले. आता आम्हाला करा’ असे सांगितल्याने अनेक मंडळांचा नाईलाज झाला होता. त्यामुळे दुपारपासून दणाणून गेलेला परिसर शांत झाला होता. ‘जुना बुधवार’च्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियोजन नसल्याने लाखो रुपये खर्च करून आणलेल्या सिस्टीम बंद ठेवाव्या लागल्या. जी मंडळे तयार होती, त्यांना पुढे सोडले असते तर त्यांची मिरवणूक संपली असती, असेही सांगितले.

राजर्षी शाहू मिरवणुकीत अवतरले
लेटेस्ट तरुण मंडळाने यावर्षी राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त २५० कार्यकर्ते राजर्षी शाहूंची टोपी, संस्थानकालीन झेंडा, एकसारखे चप्पल, पारंपरिक वेशभूषा करून होते. भुयेवाडी येथील धनगरी ढोल, गोलीवडे येथील झांजपथकही होते. याशिवाय राधानगरी धरण, रेल्वे, अस्वल-वाघाशी झुंज, कुस्ती, साठमारी असा शाहू महाराजांचा चित्ररूपी चरित्ररथही सहभागी होता. एकसारखी वेशभूषा, झेंडे यामुळे मिरवणूक मार्गावर राजर्षी शाहूंची मिरवणूक अवतरल्याचे भासत होते. या मिरवणुकीचे उद्‌घाटन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले.

पीटीएमचा सिंह
मिरवणुकीत कायम वेगळेपण जपणाऱ्या पीटीएमने यंदा बसलेल्या सिंहाची भव्य प्रतिकृती आणली होती. त्याच्या डोक्यावर ‘किंग ऑफ कोल्हापूर’ असा मुकुट होता. तसेच बाजूला किंग ऑफ फुटबॉल असेही ठळक दाखवले होते. याबरोबरच पिवळे-निळे झेंडे व आकर्षक लाईट, लेसर शो यामुळे वातावरण वेगळेच बनले होते.


महापालिकेचे आभार; खड्ड्यांमुळे मोडले कंबरडे
खासबाग परिसरातील प्रिन्स क्लबने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत बाळ गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित केली. छोटी पूजेची शाडूची गणेश मूर्ती पालखीतून युवक आणि युवतींनी घंटा आणि टाळ्यांच्या निनादात ‘नको ध्वनी प्रदूषण, नको पाणी प्रदूषण, नको वायू प्रदूषण’ असा फलक घेऊन मिरवणूक काढली. तसेच लहान बालकांनी गणपती आणि उंदराचे वेश परिधान केले होते. उंदीर मामांसोबत कपड्यांचे गाठोडे घेऊन हाता-पायाला बॅंडेज, प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत गणपती बाप्पा चालत होते. ‘महापालिकेचे आभार, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे माझे कंबरडे मोडले’ असे भाष्य गणपती बाप्पा करीत असल्याचे फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते.

पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत
मुख्यमंत्री, गृह मंत्र्यांना मेल
गणेश विसर्जन मिरवणूक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे रेंगाळली. सकाळपासून सायंकाळपर्यंत महाद्वार रोडवर मिरजकर तिकटीकडून एकही मंडळ पोहोचलेले नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी विनाकारण मिरजकर तिकटी चौकात मंडळांना अडवून ठेवले. चौकाचौकांतील पोलिस अधिकाऱ्यांत समन्वय नाही. विनाकारण मंडळांना उशिरा पाठवल्याने मिरवणूक संपण्यास मोठा कालावधी लागला. या भूमिकेमुळे गणेश मंडळे, नागरिकांना वेठीस धरले गेले. महाद्वार रोड आणि चौकातील सीसीटीव्ही कॅमेरा पाहिले तर मिरवणूक रेंगाळली आहे, हे निदर्शनास येईल. याबाबत चौकशी करून मिरवणूक रेंगाळत ठेवणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, अशी विनंती कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, लहुजी शिंदे, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, विनोद डुणुंग, महादेवराव जाधव, प्रमोद पुंगावकर यांनी मेलद्वारे केली.
.............................................
महाद्वार रोडवर बेधुंद तरुणाईचा जल्लोष
ढोल-ताशा पथकांचा कडकडाट, धनगरी ढोलाचा ठेका आणि लेझीम पथकांचा नादमय पदन्यास अशी मनोहारी विसर्जन मिरवणूक महाद्वार रोडवर सकाळी पाहायला मिळाली, तर संध्याकाळी साउंड सिस्टीमचा दणदणाट आणि लेझर शोमध्ये न्हाउन बेफान होऊन नाचणारी तरुणाई या मार्गावर दिसत होती.
सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाद्वार रोडवरून पारंपरिक वाद्यांच्या तालावर मूर्तींची मिरवणूक निघाली. आकर्षक वेशभूषा करून पुरुष आणि महिला बाप्पांना निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. सकाळी मिरवणूक विविध ढोल-ताशा पथकांनी विविध रचना सादर करून रंगवली.
मित्रप्रेम मंडळाने बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नणदी गावातील धनगरी ढोल पथक आणले होते. छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीत सहभाग घेतला.
दरम्यान, खरी कॉर्नर, कोल्हापूर हायस्कूलसमोरील रस्ता, गांधी मैदान परिसर येथे शिवाजी पेठेतील मंडळांच्या म्युझिक सिस्टीम जोडण्याचे काम सुरू होते. याच ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने वाहने आणि पादचाऱ्यांनाही वाट बदलून जावे लागले. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिनखांबी गणेश मंदिर रिक्षा स्टॉप येथे शिवाजी पेठेतील मंडळांनी सिस्टीम, गणेश मूर्ती रांगेने उभ्या केल्या. फिरंगाई तालीम मंडळ, अवचीतपीर तालीम मंडळ आणि त्याच्या मागे वेताळ तालीम मंडळ व खंडोबा तालीम मंडळ होते. संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. सायंकाळी सहा वाजल्यानंतर बिनखांबी गणेश मंदिराच्या बाजूने आणि खरी कॉर्नरवरून एक एक मंडळ महाद्वार रोडवर प्रवेश करत होते. फिरंगाई तालीम मंडळाने पहिल्यांदा मिरवणूक मार्गावर संध्याकाळी प्रवेश केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94808 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..