विसर्जन मार्गावरील पोलिसांचे गणित चुकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन मार्गावरील पोलिसांचे गणित चुकले
विसर्जन मार्गावरील पोलिसांचे गणित चुकले

विसर्जन मार्गावरील पोलिसांचे गणित चुकले

sakal_logo
By

49235
पोलिसांचे गणित चुकले
---
विसर्जन मिरवणूक; रात्रभर कार्यकर्ते रस्त्यावरच ठाण मांडून
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः महाद्वार रोडवर गणेश मंडळ आले की पुढील एक तासात त्यांनी पापाची तिकटीपर्यंत गेले पाहिजे, असे पोलिसांचे नियोजन होते. मात्र, हे शक्य झाले नाही. रात्री मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाद्वार रोडवरच ठिय्या मारला. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच मध्यरात्री मिरवणूक ठप्प झाली. त्यामुळे मिरवणूक संपण्यास विलंब झाला. पोलिसांनी जे गणित मांडले ते चुकले, असेच म्हणावे लागेल.
विसर्जन मिरवणूक नेहमीच औत्सुक्याचा विषय असते. मिरवणूक निर्विघ्नपणे आणि वेळेत कशी संपेल, याचे चोख नियोजन पोलिस करतात. यंदा दोन वर्षांनंतर मिरवणूक होणार असल्याने पोलिसांनी नियोजन केले होते. सायंकाळी मिरवणूक मार्गात आलेले मंडळ एक तासात पापाची तिकटीला कसे जाईल, याबाबत आराखडा आखला होता. मध्यरात्री बाराला म्युझिक सिस्टिम बंद झाली की मंडळांना पुढे जाण्यास भाग पाडायचे आणि मिरवणूक निर्धारित वेळेत संपवायची, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, प्रत्यक्षात घडले वेगळेच. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ येथील मंडळांनी रात्री अंधार पडल्यावरच विसर्जन मिरवणूक मार्गात येण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी त्यांना मिरवणूक सुरू करण्याबाबत फारशी सक्ती केली नाही. त्यामुळे या मंडळांची मिरवणूक सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झाली. नंगीवली तालीम मंडळ, लेटेस्ट, अवचितपीर, पाटाकडील तालीम मंडळ यांनी मिरवणूक मार्गावर सायंकाळी उशिरा प्रवेश केला. मात्र, बालगोपाल तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ यांनी रात्री उशिरा महाद्वार रोडवर प्रवेश केला. मध्यरात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी म्युझिक सिस्टिम बंद केल्या. मात्र, मंडळांनी तिथेच ठिय्या मारण्याचे ठरविले. पोलिसांच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. रात्री मंडळांचे कार्यकर्ते रस्त्यावरच झोपले. पोलिसांनी त्यांना पुढे जाण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी ते ऐकले नाही. या वेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांत वाद झाला. त्यामुळे रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत मिरवणूक थांबली. सकाळी सहाला पुन्हा मिरवणूक सुरू झाली. मात्र, शेवटची गणेशमूर्ती विसर्जित होण्यास दुपारचे चार झाले. एकूण मंडळे आपले आवाहन ऐकतील आणि रात्री बारानंतर गतीने पुढे सरकतील, या धारणेवर पोलिसांनी आखलेले गणित चुकलेच.

गर्दीचे नियोजन नाही
विसर्जन मार्गावर एका बाजूने नागरिक जात असतात; तर दुसऱ्या बाजूने येत असतात. मात्र, यंदा दोन्ही बाजूंनी नागरिकांची ये-जा सुरू होती. त्यामुळे धावपळ झाली. तसेच, अरुंद जागेत जास्त नागरिक एकत्र आल्याने गोंधळ उडाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94967 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..