केएमटी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी बंद
केएमटी बंद

केएमटी बंद

sakal_logo
By

49591
कोल्हापूर ः केएमटीच्या यंत्रशाळेत सोमवारी दुपारपर्यंत थांबून असलेल्या बस.

49588
कोल्हापूर : हद्दवाढ कृती समितीने भरपावसात केएमटीच्या यंत्रशाळेसमोर ठिय्या धरून सर्व बस रोखल्या. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी दुपारी बारा वाजता आंदोलकांना निर्णय दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले. (मोहन मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा)

केएमटी बस सात तास रोखल्या
हद्दवाढ कृती समितीचे भरपावसात आंदोलन; ग्रामीणचे दोन मार्ग बंद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ग्रामीणमधील तोट्यातील सर्वच मार्ग बंद करावेत, या मागणीसाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने आज पहाटे पाचपासून केएमटीच्या बुद्ध गार्डनमधील यंत्रशाळेसमोर भरपावसात सात तास ठिय्या मारून बस रोखल्या. महापालिका प्रशासनाचा निषेध करत एकही बस बाहेर जाऊ दिली नाही. त्यामुळे केएमटीवर अवलंबून प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. दोन टप्प्यातील चर्चेअंती प्रशासनाने मुडशिंगी व येवती-चुये दोन मार्ग आज तातडीने बंद केले. दहा दिवसांत उत्पन्न-खर्चाचे विश्‍लेषण करून पुढील मार्गांबाबत समितीसोबत निर्णय घेऊ, असे सांगितल्यावर दुपारी बारा वाजता आंदोलन थांबले.
ग्रामीणमधील सेवेसाठी बांधील नसताना २४ मार्गांपैकी २२ ग्रामीणमधील आहेत. ते सर्व तोट्यात आहेत. हा तोटा भरून काढण्यासाठी महापालिका त्यांना दीड कोटींचे अनुदान देते. आठ दिवसांपूर्वी समितीने इशारा दिल्याने दोन मार्ग बंद केले; पण सर्व मार्ग बंद करा, अशी मागणी असल्याने आज सर्व बस रोखण्याचे नियोजन केले. पहाटे साडेचार वाजता कार्यकर्ते वाद्याच्या गजरात यंत्रशाळेसमोर जमले. राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिलाही सहभागी होत्या. ‘२२ तोट्यातील मार्ग बंद झालेच पाहिजेत’, ‘प्रशासन झोपले आहे का’, ‘आता नाही तर कधीच नाही’, ‘प्रशासनाचा धिक्कार असो’ अशा घोषणा व फलक दाखवत गेटसमोर थांबले.
सातपर्यंत कुणीच अधिकारी आले नसल्याने पाऊस सुरू असतानाही प्लास्टिकचा कागद अंथरुण छत्र्या, रेनकोट घेऊन आंदोलकांनी ठिय्या मारला. अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी, पी. एन. गुरव त्यानंतर आले. अभ्यास करून टप्प्याटप्प्याने मार्ग बंद करणार आहोत, असे सांगू लागल्यानंतर आतापर्यंत काय केले? निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार, असे सांगत अतिरिक्त आयुक्त किंवा प्रशासकांना बोलवा, असे सांगितले. अकरा वाजता अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आले. त्यांनी पुढील काही मार्ग बंद करण्यासाठी पंधरा दिवस द्या, असे सांगितले; पण आंदोलक आज कोणतेही दोन मार्ग बंद करा व आठ दिवसांत पुढील नियोजन द्या, यावर ठाम राहिले. त्यामुळे देसाई तिथून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. पुन्हा गवळी, गुरव यांच्याशी चर्चा केली व मुडशिंगी, येवती मार्ग बंद करतो. आठ दिवसांत अभ्यास करून पुढील निर्णय समितीसोबत बसून घेऊ, असे सांगितले. यावर आंदोलकांनी आणखी दोन दिवस घ्या, पण २२ तारखेला सर्व आंदोलक सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या सभागृहात जमणार. तिथे निर्णय द्यावा, असे सांगत १२ वाजता आंदोलन मागे घेतले.
आंदोलनात अशोक भंडारे, प्रसाद जाधव, राजू जाधव, बाबा महाडिक, काका पाटील, पद्‌मावती पाटील, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, सुवर्णा मिठारी, लता जगताप, सुधा सरनाईक, पूजा पाटील, रेश्‍मा पोवार, विद्या पोवार, छाया जाधव, रिक्षा चालक सहभागी झाले होते.

शहरातच फिरवल्या बस
आंदोलनानंतर दुपारी एकपासून यंत्रशाळेतून बस बाहेर पडल्या. आंदोलकांच्या मागणीनुसार शहराच्या हद्दीतच बस फिरवल्या. दुपारी एकपर्यंत काहीच उत्पन्न मिळाले नव्हते. दुपारनंतरही ग्रामीणमधील मार्गावर बस सोडल्या नाहीत.

‘राजकीय दवाबामुळे मार्ग बंद होत नाहीत’
आंदोलनादरम्यान ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, किशोर घाटगे, बाबा पार्टे, सुभाष जाधव, सुभाष देसाई, सतीशचंद्र कांबळे आदींनी भाषणे करून महापालिका व केएमटी प्रशासनाचे वाभाडे काढले. अधिकाऱ्यांना येथे यायला लाज वाटते का? तोट्यातील मार्ग असताना राजकीय दबावामुळे अडीच महिन्यांपासून ते बंद करण्यात प्रशासन कचरत आहे. आम्ही कर दिलेले पैसे ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी दिले जात असतील तर ते थांबवा. शहरात प्रवास करणाऱ्याला जादा पैसे व ग्रामीणमध्ये कमी पैशात प्रवास हा कोणता न्याय आहे. एखाद्या मार्गावर ट्रकच्या फेऱ्या तोट्यात चालत असतील, तर ट्रकमालक दोन महिन्यानंतर त्या बंदच करतो. इथे तर कित्येक वर्षे तोटा आहे, असे सांगितले..

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95368 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..