केएमटी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी आंदोलन
केएमटी आंदोलन

केएमटी आंदोलन

sakal_logo
By

केएमटी फोटो

तोट्यातील फेऱ्यांनाच द्यावा ‘ब्रेक’
-------------
केएमटी प्रशासनाकडून अभ्यास व्हावा; जादा उत्पन्न मिळवणे शक्य
उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः केएमटीच्या दिवसभरात ७०० च्या आसपास फेऱ्या होतात. काही मार्गांवर असा कालावधी असतो की, त्यावेळी इतर फेऱ्यांपेक्षा प्रवाशी संख्या घटते, त्यातून उत्पन्न कमी होते, त्या फेरीतील उत्पन्‍नापेक्षा खर्च जास्त होतो. इतर फेऱ्यांचे उत्पन्न जादा असूनही तोटाच दिसतो. त्यामुळे प्रशासनाकडून या मार्गांवरील अशा फेऱ्यांचा अभ्यास करून त्या रद्द करण्याची गरज आहे. कोणत्या मार्गावर गर्दीच्या वेळेत बसच्या किती फेऱ्या आवश्‍यक आहेत, हेही निश्‍चित करता येईल. त्यातून तोटा कमी करता येईल.
हद्दवाढ समितीच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर दोन महिन्यांपासून विविध माध्यमातून केएमटीचा लेखाजोखा मांडला जात आहे. ग्रामीण भागातून हद्दवाढीला विरोध होत आहे. मग त्यांना आपण सुविधा द्यायच्या का? हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यातून केएमटीचा विषय हाती घेतला आहे. दररोज आठ लाखांच्या आसपास उत्पन्न व खर्च १२ लाखांवर असे ढोबळ चित्र आहे. यातून २२ मार्ग तोट्यात असल्याचे समोर येते. मग ग्रामीणचे मार्ग बंद करा, अशी मागणी केली जात आहे. या तोट्यासाठी इतरही अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचा विषय आहे. ऑपरेशन विभागाचा. अनेक मार्गावर बस धावतात, त्यातील लोंबकळणारी गर्दी पाहिली की, हा मार्ग तोट्यात कसा? असा प्रश्‍न पडू शकतो. याच्या मुळात जायचे झाले तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोट्यातच असते हे सांगून जबाबदारी ढकलणाऱ्या प्रशासनाची बाजू समोर येते. ७० बस दिवसभरात जर ७०० फेऱ्या करत असेल तर सर्वच फेऱ्यांत प्रवाशी मिळतील, असे मेट्रोसारखे शहर नाही. यासाठी केएमटी प्रशासनाचा अभ्यास असायलाच हवा. आता बस कमी आहेत तर ज्या फेऱ्या कमी उत्पन्न देतात, त्या थांबवाव्यात हे वाहतूक व्यवस्थेला कोणी कशाला सांगायला हवे. त्यातून केवळ तोटा कमी होणार नसून आवश्‍यक वेळी बसच्या जादा फेऱ्या होतील व प्रवाशांची संख्या वाढत राहील. दिवसाच्या पाससारख्या सुविधेमुळे ग्रामीणमधील प्रवाशांना सवलतीत सेवा व शहरातील प्रवाशांना महागडी सेवा मिळते, हे नियोजन बरोबर नाहीच. जादा उत्पन्न मिळवायचे असल्यास पासचा दर वाढवल्यास आपोआप उत्पन्नही वाढेल व त्या प्रवाशांना इतर व्यवस्थेपेक्षा योग्य सवलतही मिळेल.
या कारणांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या सुविधा, डिझेल, स्पेअर पार्टचे वाढणारे दर हे खर्चास कारणीभूत आहेत. बसच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या असावी हे कागदावरील नियोजन असते; पण लोकप्रतिनिधी असल्यास ते नियोजन पाळले जाते का? याचा विचार व्हायला हवा.

दृष्टिक्षेपात केएमटी
*एकूण धावणाऱ्या बसेस - ७०
* रोजचा प्रवास - १३ ते १५ हजार किलोमीटर
* प्रवाशी - ३५ ते ४० हजार
* एकूण कर्मचारी - ६५०
* तोट्यातील मार्ग - २२
* रोजचे उत्पन्न - ८ लाख
* रोजचा तोटा - ४ लाखांच्या आसपास

म्हणून दर नियंत्रणात...
केएमटी नसल्यास प्रवाशांना वडापसारख्या सेवा मिळतील. पहिल्या टप्प्यात त्या केएमटीच्या दरात वाहतूक करतील; पण ज्यावेळी केएमटी बंद होईल, त्यावेळी त्यांना आपल्याशिवाय पर्याय नसल्याचे समजताच दर वाढवतील. नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल. ज्या मार्गावर केएमटी बंद झाल्यास जे केएमटीच्या पदरात पडणारे उत्पन्न दुसरीकडेच जाईल. तो तोटा होणारच आहे.

शहरांतर्गत प्रवासातून मिळणार किती
शहराच्या हद्दीत बस चालवायची झाल्यास बस कमी लागतील, चालक-वाहक कमी लागतील, इंधन खर्च कमी होईल, झीज कमी होईल हे सर्व बरोबरच आहे; पण ७ किलोमीटर परिघातून किती उत्पन्न मिळेल? याचा अभ्यास प्रशासनाने करायला हवा. त्यातून काय बरोबर, काय चूक? हे ठामपणे सांगता येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95477 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..