लम्पीचा संसर्ग नाही, पण खबरदारी हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पीचा संसर्ग नाही, पण खबरदारी हवी
लम्पीचा संसर्ग नाही, पण खबरदारी हवी

लम्पीचा संसर्ग नाही, पण खबरदारी हवी

sakal_logo
By

लम्पीचा संसर्ग नाही,
पण खबरदारी हवी
गडहिंग्लज तालुका; पशुपालकांनी जनावरांची काळजी घेण्याची आवश्यकता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : लम्पी स्किन नावाच्या जनावरांच्या आजाराने जिल्ह्यात प्रवेश केला आहे. जनावरांना होणारा हा आजार संसर्गजन्य आहे. गडहिंग्लज तालुक्यात पाऊण लाख पशुधन आहे. तालुक्यातील एकाही जनावराला अद्याप लम्पी स्किनचा संसर्ग झालेला नाही; पण जनावरांना हा आजार होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. पशुपालकांनी त्याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
माणूस असो वा जनावर, दोघांचेही आरोग्य महत्त्वाचे; पण अलीकडच्या काळात नव्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाने दोन वर्षे हैराण केले. आता कोरोनासारख्याच संसर्गजन्य असणाऱ्या लम्पी स्किन आजाराने जनावरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. गडहिंग्लज तालुक्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. ५३ हजार ७५६ म्हैसवर्गाचा, तर १८ हजार ८०९ गायवर्गाचा समावेश आहे. दुग्ध व्यवसायावर अर्थकारण अवलंबून असल्याने पशुपालकांची काळजी वाढविली आहे.
गडहिंग्लज तालुक्यात लम्पी स्किनचा संसर्ग झालेला नसला तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. संसर्ग टाळण्यासाठी जनावरांचे बाजार बंद केले आहेत; पण व्यापाऱ्यांनीही आपल्या स्तरावर होणारी खरेदी-विक्री थांबविणे आवश्यक आहे. याबाबत पशुपालकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. या आजारात मृत्यूदर अवघा चार ते पाच टक्के आहे; पण प्रतिकारशक्ती कमी असलेल्या जनावरांना अधिक धोका आहे. त्यामुळे जनावरांचे पोषण चांगले ठेवणे व प्रतिकारशक्ती वाढविण्यावर पशुपालकांनी भर देण्याची गरज आहे.

चौकट
लम्पी स्किनची लक्षणे...
- जनावरांना ताप येतो.
- शरीरावर दोन ते तीन सेंटिमीटर व्यासाच्या गाठी येतात.
- नाकातून स्त्राव बाहेर पडतो.
- जनावरांचे खाणे कमी होते. त्यामुळे दूध उत्पादन घटते.
- लसीका ग्रंथीला सूज येते.
- डोळ्यांतून, नाकातून घाण येते.
- तोंडात जखमा होतात.
- पायाला सूज आल्याने जनावर लंगडते.

या करा उपाययोजना...
- गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.
- डास होऊ नयेत यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवावी.
- गोठ्यात कडूलिंबाच्या पाल्याची धुरी करावी.
- जनावराला लक्षण वाटल्यास तत्काळ दवाखान्याशी संपर्क साधावा.

लसीकरणाला विलंबाची शक्यता
शासनासह गोकुळ दूध संघाने जनावरांच्या लम्पी स्किन प्रतिबंधात्मक लसीकरणाची घोषणा केली आहे; पण जिल्ह्यातील पशुधनाच्या तुलनेत उपलब्ध लस कमी आहे. त्यामुळे संसर्ग झालेल्या हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. संसर्गित जनावराच्या पाच किलोमीटर परिसरात तातडीने लसीकरण करण्याचे निर्देश आहेत. याचा विचार केला तर गडहिंग्लज तालुक्यात लसीकरणाला विलंब होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96064 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..