अभियंता दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियंता दिन
अभियंता दिन

अभियंता दिन

sakal_logo
By

भारतरत्न सर विश्‍वेश्‍वरय्या;
अभियंत्यांचे प्रेरणास्थान

लीड
महात्मा गांधींच्या नंतर जर मी कुणा श्रेष्ठ भारतीयासमोर नतमस्तक होईन, तर ते आहेत एम. विश्‍वेश्‍वरय्या अशा शब्दांत थोर समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी विश्‍वेश्‍वरय्या यांचा गौरव केला होता. भारतीय अभियंत्यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या विश्‍वेश्‍वरय्यांबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे आणि गौरवाचे स्थान आहे.

१५ सप्टेंबर १८६० रोजी कर्नाटकात चिकबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी गावात विश्‍वेश्‍वरय्या यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबल्लापूर, तर माध्यमिक शिक्षण बंगळूरमध्ये झाले. तेथीलच सेंट्रल कॉलेजमध्ये त्यांनी विशेष गुणवत्तेसह उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्याच्या सायन्स कॉलेजमधून ते सिव्‍हिल इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. लगेचच मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात सहायक अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
विश्‍वेश्‍वरय्या यांनी आपल्या कामाची चुणूक प्रत्येक ठिकाणी दाखविली. पुण्याजवळ खडकवासला येथे मुठा नदीवर विश्‍वेश्‍वरय्या यांनी धरण बांधले. धरणातील पाण्याची पातळी एका विशिष्ट उंचीपर्यंत येताच पाण्याच्या साह्याने आपोआप उघडणारे व बंद होणारे धरणाचे दरवाजे हे त्याचे खास वैशिष्ट्य होते. दगडी धरणाला त्यांनी प्रथमच कळसूत्री दरवाजाचा उपयोग केला. यामुळे धरणातील हजारो लिटर पाण्याचा अपव्यय टळला. तसेच प्रवरा नदीवर भंडारदरा धरण बांधून त्यांनी नगर जिल्ह्यातील अवर्षणप्रवण भागाला पाणी पुरविण्याची कायमची व्यवस्था केली.
त्याचबरोबर सरकारने सिंधू नदीचे पाणी सक्कर शहराला कसे पुरविता येईल, याची जबाबदारी विश्‍वेश्‍वरय्यांवर सोपविली. यासाठी सिंधू नदीच्या पात्रातच तिच्या काठाजवळ एक खोल विहीर खोदून विहिरीच्या तळापासून सिंधू नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. त्यामुळे विहिरीत शुद्ध पाणी साचू लागले. हेच शुद्ध पाणी डोंगरावरच्या जलशयात चढवून संपूर्ण शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा केला. यानंतर सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते १९०९ मध्ये म्हैसूर संस्थानात मुख्य अभियंता म्हणून रुजू झाले. सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक योजना राबवून म्हैसूर संस्थानचा नावलौकिक वाढवला. त्यांनी बांधलेले कावेरी नदीवरील कृष्णराजसागर धरण, भद्रावतीचा पोलाद कारखाना, बंगळूरचा विमान कारखाना, ओरिसातील महानदीवरील हिराकुड धरण या सर्व योजनांत त्यांनी प्रेरक म्हणून मोलाचे योगदान दिले.
विश्‍वेश्‍वरय्यांना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविले गेले. १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले. त्याचबरोबर लंडनमधील आंतरराष्ट्रीय स्थापत्य अभियांत्रिकी संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले. भारतातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डीएस्सी, एलएलडी, डी. लिट. अशा पदव्या देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना १०२ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांचे १२ एप्रिल १९६२ ला देहावसान झाले.
----

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96088 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..