खादी ग्रामोद्योगचे कार्यकारी मंडळ बरखास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खादी ग्रामोद्योगचे कार्यकारी मंडळ बरखास्त
खादी ग्रामोद्योगचे कार्यकारी मंडळ बरखास्त

खादी ग्रामोद्योगचे कार्यकारी मंडळ बरखास्त

sakal_logo
By

खादी ग्रामोद्योगचे कार्यकारी मंडळ बरखास्त
धर्मादाय उपायुक्तांची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यभार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः रुईकर कॉलनी परिसरातील सुमारे पाच एकर मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा आरोप झालेल्या जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाचे कार्यकारी मंडळ आज बरखास्त करण्यात आले. धर्मादाय उपायुक्त प्र. म. चौधरी यांनी या संदर्भातील आदेश काढले.
दरम्यान, संस्थेचा कार्यभार जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पहावा, २००० पासून आजपर्यंतची कार्यकारिणी बेकायदेशीर असल्याचे श्री. चौधरी यांनी आदेशात म्हटले आहे. यापूर्वी संस्थेच्या घटनेत कार्यकारी मंडळाने केलेले सर्व बदल नामंजूर केले आहेत. यापुढे संस्थेविषयी महत्त्वाचे निर्णय घेताना जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी धर्मादाय उपायुक्तांची पूर्वपरवानगी घेण्याची सूचना आदेशात केली आहे.
महात्मा गांधींच्या विचाराने चाललेल्या या संस्थेची कोट्यवधी रुपयांची रुईकर कॉलनी येथे असलेली जागा बिल्‍डरला विकसन करून दिली होती. यावरून संस्थेच्या कारभारावर अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या अनुषंगाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्वतःच (सो-मोटो) संस्थेची चौकशी केली होती, त्यात अनेक गंभीर बाबी आढळून आल्या. संस्थेत सध्या एकही कायदेशीर सभासद नाही, संस्थेचे दैनंदिन व्यवहार पाहण्यासाठी घटनेत तरतूद नाही, राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून संस्था निर्माण झाल्याने संस्थेचे काम राष्‍ट्रहितासाठी निरंतर आवश्‍यक असल्याचे मत हा निकाल देताना श्री. चौधरी यांनी नमूद केले आहे.
श्री. चौधरी यांनी नमूद केले आहे, की रुईकर कॉलनीतील जागा १९५७ मध्ये खरेदी केली; पण गेल्या ५० वर्षांत ही मिळकत संस्थेच्या नावांवर करून घेण्याचे कष्ट संस्थेने घेतलेले नाही. उलट जागा विक्रीस काढली आहे. रायसन आणि कंपनीबरोबर यासाठी करार झाला, त्यापोटी दोन कोटी २३ लाख रुपये मिळणार होते. यापैकी विकसन करारादिवशी २३ लाख रुपये सुंदर देसाई व मारूती चौगले यांनी घेतले. ज्यादिवशी या दोघांनी पैसे घेतले त्याचदिवशी संबंधित मिळकतीचे वटमुखत्यार पत्र कंपनीच्या विश्‍वस्तांच्या नावे रजिस्टर केले, विश्‍वस्तांची ही कृती बेकायदेशीर असल्याचा ठपका या निकालात ठेवण्यात आला आहे.

रक्कम स्वतः वापरली
सुंदर देसाई यांनी कऱ्हाडच्या सोनिया बिल्डर्सकडून स्वीकारलेले अडीच लाख, चार लाखांच्या धनादेशाची रक्कम, तसेच मारुती चौगले यांनी रायसन कंपनीकडून स्वीकारलेली १५ लाख रक्कम संस्थेकडे जमा न करता स्वतः वापरल्याचा ठपकाही या २१ पानी निकालपत्रात ठेवण्यात आला आहे. यातील मारुती चौगले यांचे निधन झाले आहे.

नंतर भूमिका स्पष्ट करू
निकालाची प्रत हातात मिळाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष सुंदर देसाई व उपाध्यक्ष प्रकाश चौगुले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

महात्मा गांधीजींच्या विचारांचा विजय
अनेक दिवस महात्मा गांधींच्या विचारांची ही संस्था टिकावी, ती विकली जाऊ नये, यासाठी विविध पातळ्यांवर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबरच हा गांधी विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया याबाबत लढा उभारणाऱ्या गांधी विचार मंचचे अभिषेक मिठारी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96205 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..