कागलच्या कारभारी कंत्राटदाराचा ''उद्योग'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागलच्या कारभारी कंत्राटदाराचा ''उद्योग''
कागलच्या कारभारी कंत्राटदाराचा ''उद्योग''

कागलच्या कारभारी कंत्राटदाराचा ''उद्योग''

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

कागलच्या कारभारी कंत्राटदारांची ‘चर्चा’
अधिकाऱ्यांच्या आयडीचा परस्‍पर वापर; बांधकाम विभागातील प्रकाराने खळबळ
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : गडहिंग्‍लज तालुक्यात बांधकामकडून केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी सहायक लेखाधिकाऱ्यांच्या आयडीचा परस्‍पर वापर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये ज्या कंत्राटदारांच्या नावे कामे आहेत त्या पाच कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदारांनी कागल येथील दोन कारभारी कंत्राटदारांना पोट ठेका दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी कारभाऱ्यांकडून प्रयत्‍न सुरू आहेत. अधिकाऱ्यांवर दबावही टाकला जात आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास कारभारी कंत्राटदाराशी संबंधित अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.
ाबांधकाम विभागात इ-एमबी ऑनलाईन प्रणाली सुरू आहे. मोजमाप पुस्‍तिकाही कागदी स्‍वरुपात न येता थेट संगणकीकृत येते. जेथे काम सुरू आहे तेथील कनिष्‍ठ अभियंत्यांकडून ऑनलाईन एम.बी. लिहिण्यात येते. उपअभियंत्यांकडून जिल्‍हा परिषदेकडे ती पाठवली जाते. बांधकाम विभागातील प्रकल्‍प शाखेतील अभियंत्यांकडून ही एम.बी. तपासून सहाय‍यक लेखाधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. सहायक लेखाधिकारी आर्थिक बाबी तपासून कार्यकारी अभियंत्यांकडे ही ऑनलाईन एम. बी. पाठवतात. मात्र गडहिंग्‍लज येथील पाच कामांची एम.बी. प्रकल्‍प शाखेतून सहायक लेखाधिकाऱ्यांच्या लॉगीनमधून काही कंत्राटदारांनी थेट कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवली. एम. बी. कार्यकारी अभियंत्यांकडे गेल्यानंतर सहायक लेखाधिकाऱ्यांना मेसेज आला. मात्र आपल्या ऐवजी दुसऱ्याच कोणाकडून एम.बी. पुढे पाठवल्याचे निदर्शनास आले.
सहा‍यक लेखाधिकाऱ्यांनी जेवढ्या एम.बी. परस्‍पर गेल्या त्या कंत्राटदारांकडे चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्यांनी दोन पोटठेकेदारांची नावे पुढे केली. या पोटठेकेदारांनी आता हे प्रकरण दडपडण्याचा प्रयत्‍न चालवला आहे. ज्यांच्या नावे कामे मंजूर आहेत त्यांचा माफीनामा घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणला जात आहे.

कारभारी सांगेल त्याला काम
कारभारी कंत्राटदार सांगेल त्या ठेकेदाराला काम देण्याची प्रथा आहे. असे झाले नाहीतर विरोध करणाऱ्या कंत्राटदाराला त्रास दिला जातो. आगावू कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे. कामांची बिले तत्‍काळ काढली जातात. इतरांना धारेवर धरणारा बांधकाम विभाग, वित्त विभागही कारभाऱ्यांच्या या कंत्राटदारांच्या वाट्याला जात नाही. वरिष्‍ठ अधिकारी, कर्मचारीही त्यांच्या त्रासाला कंटाळले आहेत. यामुळे कंत्राटदारांची दहशत मोडून काढण्याची आयती संधी बांधकाम विभागास मिळाली आहे.

सहायक लेखाधिकाऱ्यांच्या लॉगीनचा परस्‍पर वापर झाला आहे. या प्रकरणी पाच कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. ज्यांच्या संगणक व मोबाईलवरून हा प्रकार झाला आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. कामात पोटठेकेदार होता का, याची माहितीही घेतली जात आहे.
- सचिन सांगावकर, कार्यकारी अभियंता बांधकाम

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96588 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..