जलसंस्कृतीच्या खुणा जपायला हव्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलसंस्कृतीच्या खुणा जपायला हव्यात
जलसंस्कृतीच्या खुणा जपायला हव्यात

जलसंस्कृतीच्या खुणा जपायला हव्यात

sakal_logo
By

50905, 50905
मुमेवाडी (ता. आजरा) : येथील गावतळे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

जलसंस्कृतीच्या खुणा
जपायला हव्यात
गडहिंग्लज, चंदगड, आजऱ्यात तलावांचे अस्तित्व; पर्यायी स्त्रोत म्हणून व्हावा वापर

पाण्याची टंचाई हा जगभर चिंतेचा विषय झाला आहे. कमी होत जाणारे वापरायोग्य पाण्याचे साठे, दरवर्षी देशभर विस्कळीत झालेले पाऊसमान, खालवणारी पाण्याची पातळी आणि वाढती पाण्याची गरज अशा परिस्थितीमध्ये पाण्याचे प्राचीन साठे त्यांची पूर्वी असलेली व्यवस्था, पाण्याच्या नियोजनाच्या परंपरागत पद्धती यांचे स्मरण करणे आणि आपले विस्मृतीत गेलेले सामुदायिक शहाणपण पुन्हा व्यवहारात आणून जलसंस्कृतीच्या पाऊलखुणा जपणे सध्या आवश्‍यक ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर गावोगावी अस्तित्वात असलेल्या तलावांचे पुनरुज्जीवन करून संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. आजही गडहिंग्लज, चंदगड, आजरा या उपविभागात अशा तलावांचे अस्तित्व पहायला मिळते. एक पर्यायी जलस्त्रोत म्हणून या तलावातील पाण्याचा वापर करणे शक्य आहे. यासाठी गरज आहे ती पुढाकार घेऊन ठोस कृती आराखडा तयार करण्याची.
- रणजित कालेकर, आजरा
---------------------तलाव म्हणजे काय? सामान्यतः जमिनीच्या खोलगट भागात नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या झालेल्या जलाशयास काठ, पाळ, शिल्पे इत्यादीच्या बांधकामाने वास्तुदृष्टीने जे आकर्षक स्वरूप दिले जाते त्याला तलाव असे म्हटले जाते. तलाव हे आकारमानाने सामान्यतः सरोवरापेक्षा लहान व विहिरीपेक्षा मोठे असतात. तलावाला ताल, तळे, तालाब, तडाग, पुष्करणी, वापी, वापिका अशी भिन्न-भिन्न नावे आहेत.

तलावांची निर्मिती
भारतात प्राचीन काळापासून तलावांची निर्मिती केली जात आहे. भौगोलिक प्रदेशानुसार असणारी पाण्याची गरज लक्षात घेता आपल्या पूर्वसुरींनी हे तलाव बांधले. आजही तलावांची निर्मिती केली जात आहे. देशात अनेक राजे रजवाडेंच्या काळात तलाव हे त्यांचा राजधर्म पाळण्यासाठी कर्तव्य करण्यासाठी तलाव उभारले गेले. अनेक खासगी व्यक्तींनी स्वखर्चातून तलाव बांधून लोकार्पण केले. त्यामागची प्रेरणा ही मानवतेची आणि सांस्कृतिक नात्याची होती.

तलावांचे प्रकार
भुवनदेवकृत अपराजितपृच्छा (१२ वे १३ वे शतक) या ग्रंथात तलावांचे सहा प्रकार सांगितले गेले आहेत. १) अर्धचंद्राकृती आकाराचे सर २) गोलाकार महासर ३) चौकोनी असलेले भद्रक ४) भद्रक एकमेकांना जोडून बनलेले ते सुभद्र ५) ज्या तलावात बगळे उतरतात ते परिघ ६) दोन परिघ एकमेकांना जोडलेले ते युग्मपरिघ या शिवाय पन्नास हातांचे ज्‍येष्ठ. त्याच्या अर्ध (पंचवीस हाताचे) मध्यम व एक चतुर्थांश (बारा हाताचे) ते कनिष्ठ असेही प्रकार या ग्रंथात सांगितले आहेत.

साहित्य, संगीत व कला निर्मितीला प्रोत्साहन
प्राचीन काळापासून या तलावांनी साहित्य, संगीत, कला, लोकगीत निर्मितीमध्ये हातभार लावला आहे. अनेक कविता, लोकगीतांचे येथे निर्मिली गेली आहेत. अनेक कथा व आख्यायिकांचा जन्म देणारे तलाव या देशात अस्तित्वात आहेत. त्यामुळे साहित्य, संगीत निर्मितीमध्ये तलावांचे महत्त्‍वाचे स्थान आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.....होते कुरुप वेडे पिलू तयात एक, तळ्याकाठी गाती लाटा... लाटामध्ये उभे झाड यांसह अनेक कवितांना जन्म तलावांनी दिला आहे.

आधुनिक नगररचेनेत विशेष स्थान
तलाव हे त्या गावचे आकर्षक ठिकाण म्हणजे शोभास्थळ असते. त्यामुळे याला आधुनिक नगररचेनेत विशेष स्थान प्राप्त झाले आहे. शहरातील तलावांचा वापर विविध कारणांसाठी केला जात आहे. तलावांकाठी बागा, स्नान गृहे, घाट उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर संरक्षण भिंत, माहिती दर्शक फलक, धबधबा, पुतळा, लहान मुलांसाठी खेळ आणि तळ्या काठावरील बैठक व्यवस्था आबाल वृद्धांना आनंद देणारी ठरते. त्यामुळे हे एक विरंगुळा केंद्र बनली आहे. त्याचबरोबर गावातील विविध उत्सव व धार्मिक समारंभात तळ्याकाठावर केली जाणारी विद्युत रोषणाई व कारंजे हे आकर्षणचा भाग असताता. ते पर्यटनाचेही ठिकाण झाले आहे. कोल्हापुरातील रंकाळा या याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. इचलकरंजी येथे आता अशी तळी प्रेक्षणीय स्थळे करण्याचा निर्णय झाला आहे.

भुजलपातळी वाढवण्यासाठी मदत
जमिनीत पाणी मुरवण्याच्या जागा म्हणून प्राचीन काळापासून तलावाचा वापर होत होता. तलावामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. तलावांमध्ये साठलेल्या पाण्यामुळे शेतातील विहिरींना पाझर फुटत होता. त्यामुळे भुजलपातळी वाढवण्यासाठी तलावांचा मोठा उपयोग होत आला आहे.

तलावातील जैवविविधता
तलावामध्ये आढळणाऱ्या कमळ, केंदाळ, लव्हाळे, बेशरम व शेवाळ त्याचबरोबर विविध प्रकारच्या पाणवनस्पती आहेत. करकोचा, पाणकोंबड्यांच्या विविध प्रजाती, चिखले, बगळे, पाणकावळे, बदक, चित्रबलाक, धनवर बदक यांसह पाणसापच्या विविध जाती, बेडूक व माशांच्या जाती, खेकडे, कासव, गोगलगायी यांसह विविध जलचर प्राणी तलावावर अवलंबून असतात. तळ्या काठावर असलेली वड, पिंपळ यासारखी झाडे व या झाडांवर बसणारे पक्षी अशी विस्तृत व परस्परावलंबी परिसंस्था तलावाभोवती आढळते. एखादी परिसंस्था तयार व्हायला शेकडो वर्ष लागतात. त्यामुळे प्राचीन तलावामध्ये मोठी परिसंस्था असते. तलावातील अन्नसाखळी एकमेकांवर अवलंबून असते.

अतिक्रमण-केंदाळाचा विळखा
सध्या असे तलाव दुर्लक्षित झाले आहेत. हे तलाव पाण वनस्पती व केंदाळाच्या विळख्यात सापडले आहेत. तसेच तलावाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणेसुद्धा झालेली पहायला मिळत आहेत. तलावात वर्षांनुवर्ष साचलेला गाळ यामुळे तलावात पाणीसाठा कमी झाला आहे. त्याचबरोबर प्लास्टिकसह विविध टाकावू साहित्य टाकण्याचे तलाव ठिकाण झाल्यामुळे हे तलाव प्रदूषणाने बाधित झाले आहेत. बहुतांश तलावांची हीच स्थिती आहे.

दुष्काळ निवारण्यासाठी तलाव निर्मिती
देशात दुष्काळाची परिस्थिती अनेकदा तयार झाली व होत आहे. दुष्काळ निवारण्यासाठी प्राचीन काळापासून विविध उपाय योजनांचा अवलंब करण्यात आला. यामध्ये तलावांची निर्मिती करण्यात आली. याची उदाहरणे देशभरात अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. १९७२ च्या दुष्काळात गडहिंग्लज उपविभागात तलाव खोदण्यात आले. निंगुडगे येथे उभारण्यात आलेला तलाव हा या काळातील होय. याचा उपयोग आजही गावांसाठी होत आहे.

बहिरेवाडी येथे तलावातील पाण्याचा वापर
तलावाचा पर्यायी स्त्रोत म्हणून चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. सध्या गावोगावी पाण्याच्या योजना झाल्यामुळे तलावांचा वापर कमी झाला आहे. परिणामी तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही गावात तलावांचा वापर चांगल्या प्रकारे होत आहे. बहिरेवाडीमध्ये तलावाच्याकडेला संरक्षण भिंत बांधून जतन केले आहे. जनावरांच्या पाण्यासाठी व कपडे धुण्यासाठी धोबीघाट यासह अन्य कारण्यासाठी वापर केला जात आहे.
----------------
तालुकावार तलावांची संख्या- आजरा
पेरणोली, भादवणवाडी, बहिरेवाडी, उत्तूर, चिमणे, मुमेवाडी, भादवण, निंगुडगे, वाटंगी, श्रृंगारवाडी, मेढेवाडी, सरोळी, मलिग्रे, वडकशिवाले, आजरा
- गडहिंग्लज
पाझर तलाव - कडगाव क्रमांक १, खमलेहट्टी, वडरगे, शेंद्री, सांबरे, हनीमनाळ १ व २, हसुरचंपू १ व २, बड्याची वाडी, चन्नेकुप्पी, महागाव, कानडेवाडी, कुंभकाहळ, नंदनवाड १ व २, हलकर्णी व मनवाड.
गाव तळी - अर्जुनवाडी, इदरगुच्ची, कडलगे, तनवडी, नेसरी (क), बसरगे, मासेवाडी, मुगळी, आमरोळी व शिंदेवाडी
- चंदगड तालुक्यामध्ये ८२ गावांमध्ये गावतळी आहेत.
------------------
तलावाचा उपयोग - गावाला पाणीपुरवठा
- मंदिराला लाभते सुंदरता
- धार्मिक कार्य
- अग्निशमन म्हणून वापर
- शेतीला पाणीपुरवठा
- जनावरांना पाण्याची सोय
- धोबीघाट यांसह अनेक कारणांसाठी प्राचीन काळापासून
- आधुनिक नगररचेनत तलावाचे महत्त्‍व
-------------------
अस्तित्व धोक्यात येण्याची कारणे
- मानवी हस्तक्षेप
- प्रदूषण
- पर्यावरणी बदल
- जागतिक तापमान वाढ
- ओद्योगिक विकासकामांची वाढ
- जनजागृतीचा अभाव
--------------------

कोट
तलावामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. तलावांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. २०१६-१७ मध्ये गडहिंग्लज उपविभागातील पावसाचे प्रमाण निम्यावर आले होते. या काळात तलाव पुनर्भरणाची चळवळ हाती घेतली. ओढे, नाले वळवून हे पाणी तलावाचे पुनर्भरण करण्यात आले. जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली.
- प्रा. सुनील शिंत्रे, अध्यक्ष आजरा साखर कारखाना
--------------
पाणी फाउंडेशनच्या धर्तीवर तलावांच्या संवर्धनासाठी सामूहिक कृती करण्याची गरज आहे. तलावांचे पुनर्भरण झाले, तर जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढेल. शेती सिंचनाला मदत होईल. त्यामुळे प्रत्येक गावातील तलावामधील गाळ उपसा करून तलावांचे जतन व संवर्धन करण्याची गरज आहे.
- वसंत तारळेकर, माजी सरपंच चिमणे, पाणी चळवळीचे कार्यकर्ते
-------------
मंदिर परिसरात असणाऱ्या तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. तलावांच्या काठावर वड, पिंपळ यासारख्या झांडाची लागवड करून पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास तयार होऊ शकतो. त्यातून तळ्याकाठची जैविक परिसंस्था मजबूत करता येणे शक्य आहे. प्रेक्षणीयस्थळ म्हणून व समाजातील विविध घटकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून तलावांचा परिसर उपयोगी ठरू शकतो.
- डॉ. गुरुनाथ पाटील, पर्यावरण प्रेमीी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97161 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..