१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

मर्मबंधातली ठेव ही...
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा वाढदिवस नुकताच झाला. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीसाठी गाणारे झाड लता-आशा रूपाने मंगेशकर परिवाराला लाभले. आशाताईंनी नाट्यगीते, भावगीते, भक्तिगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीते, देशभक्तिपर गीते, अभंग, ओव्या किती म्हणून सांगावे. गेली आठ दशके त्या लोकप्रिय आहेत. परदेशातही त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम रंगले. उठी श्रीरामा या गाण्यानं पहाट फुलत जाते. दिवसभर असंख्य गाणी कानावर पडतात. द्वंद्व गीतात त्यांनी महंमद रफी, सुधीर फडके, महेंद्र कपूर, किशोरकुमार यांच्यापासून अलीकडील सुरेश वाडकर, सुदेश भोसले यांच्यापर्यंत सर्वच कलाकरांबरोबर गीतगायन केले. ही गाणी म्हणजे सदैव भरलेला कलश आहे आणि आशाताई मर्मबंधातली ठेव आहे.
प्रा. प्रकाश कुलकर्णी, मिरज (जि. सांगली)

निसर्गाची साथ, सरकारचे हात!
यंदा सर्वत्र अपेक्षेप्रमाणे भरपूर पाऊस झाला. त्यामुळे निसर्ग फुलल्याने बळीराजा सुखावला. परिणामी, आता धनधान्याचा सुकाळ दिसून येईल. सरकारचे उत्कृष्ट पाणी नियोजन, नदी-तलावातील गाळ काढण्याचे धोरण कौतुकास्पद होते. जीएसटी वसुलीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पुन्हा १.४० कोटींचा टप्पा पार केला. परिणामी, सरकारची तिजोरी भरली. खासगी कंपन्यांनी भांडवली खर्च वाढवला, तरच विकासदर वाढेल. वाहनांच्या मागणीला गती आली, या सर्व विधायक बातम्या (‘सकाळ’ ः २ सप्टेंबर) वाचनात आल्या. आता खरी कसरत केंद्र सरकार व राज्य शासनाची आहे. जनता कित्येक वर्षे महागाईने होरपळत आहे. इंधन दरवाढ, गृहकर्जे व्याज दरवाढ, रस्त्यांची दुरवस्था हे सतत भेडसावणारे प्रश्‍न आहेत. आता तरी एक कोटी ४० लाख लोकांना सुखाचा घास मिळेल काय? भ्रष्टाचारमुक्त भारत होईल काय? असे प्रश्‍न आहेत. सतत आरोप-प्रत्यारोपांचा गोंधळ मिटविण्याची जबाबदारी सर्व राजकीय नेत्यांची आहे. फक्त निधीची खैरात न होता कामांची खैरात होणे हे सर्वांच्या हिताचे आहे. अच्छे दिन, स्वयंभू भारत दिसणे हे भावी पिढीसाठी आवश्‍यक आहे.
गजानन लोखंडे, कोल्हापूर

चित्रपटगृहांचे अस्तित्व टिकविण्याची गरज
मध्यंतरीच्या काळात बोटावर मोजण्याइतपत प्रेक्षकांमुळे मराठी चित्रपटांना, चित्रपटसृष्टीला अवकळा प्राप्त झाली होती. तथापि, आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन विषय, मराठी चित्रपटसृष्टीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांचे प्रयत्न अशातच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे हिंदी, इंग्रजी, तेलगू, तमीळ, कन्नड भाषांतील चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांना सर्वभाषिक प्रेक्षकांकडून लोकाश्रय मिळू लागला आहे. शहरी व ग्रामीण भागात एकपडदा चित्रपटगृहे सध्या इतिहासजमा होत आहेत. ती जागा आता ‘मल्टिप्लेक्स’ने घेतलेली आहे. एकेकाळी खिशाला परवडेल अशा दरात एकपडदा चित्रपटगृहे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असत. काळाच्या ओघात या गोष्टी घडत असल्या, तरी राज्य सरकार व मराठी चित्रपट महामंडळाने इतिहासजमा होत असलेल्या सुस्थितीतील चित्रपटगृहांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. अशा चित्रपटगृहांचे सर्वांच्या समन्वयातून अस्तित्व टिकवून सरकारने आपल्या कर्तव्यतत्परतेचा प्रत्यय आणून द्यावा, असे सुचवावेसे वाटते.
बाळासाहेब खोत, सांगलीवाडी (जि. सांगली)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97371 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..