फरास विशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फरास विशेष
फरास विशेष

फरास विशेष

sakal_logo
By

फोटो

बिन आवाजाचा बॉम्ब आणि बाबू फरास

निवास चौगले : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः साधारणपणे १९९९-२००० चा काळ, महापालिकेवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीची एकहाती सत्ता. १९९२ पासून महापालिकेवर या आघाडीच्या रूपाने श्री. महाडिक यांचेच वर्चस्व. या वर्चस्वला शह देण्याचे काम करणारे माजी महापौर म्हणजे बाबू हारूण फरास. श्री. फरास यांनी केलेली ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फोडला ही घोषणा प्रचंड गाजली होती. श्री. महाडिक यांच्या आघाडीला धक्का देऊन श्री. फरास यांनी त्यावेळी राज्याचे राजकारणाचे लक्ष वेधले होते. आज श्री. फरास यांचे निधन झाले आणि या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
महापालिकेवर १९९२ पासून श्री. महाडिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता. जिंकणाऱ्या उमेदवाराला रसद पुरवायची आणि विजयी उमेदवाराला आघाडीत आणायचे हे त्यावेळी महाडिक यांच्या राजकारणाचे सूत्र. महाडिकांचा महापौर झाला एवढ्यापुरताच महाडिक यांचा महापालिकेच्या राजकारणातील वावर.
महापौर, उपमहापौर निवडीसाठी ताराराणी चौकातील शासकीय विश्रामगृहावर त्यावेळी नगरसेवकांची बैठक व्हायची म्हणून आघाडीलाही ‘ताराराणी’ यांचे नांव.
बैठकीत महाडिक दोन्ही उमेदवारांची नांवे जाहीर करायचे आणि तेथून अर्ज भरायला नगरसेवक यायचे. प्रत्यक्ष निवडीदिवशी श्री. महाडिक यांच्या गाडीतूनच हे दोन उमेदवार महापालिकेत यायचे, त्यांना सोडायचे.
सुरुवातीला १९९८ ला श्री. फरास यांच्या पुढाकारानेच शिवाजी कवाळे यांनी बंड केले आणि महापौर निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. कांचन महापौर झाल्या.
या बंडातून आघाडी धडा घेईल असे वाटले होते; पण त्यानंतर १९९९ मध्ये श्री. फरास स्वतः श्री. महाडिक यांच्याविरोधात जाऊन महापौर झाले.
मुस्लिम समाजाचे ते पहिले महापौर ठरले. तत्पूर्वी, झालेल्या घडामोडीत उद्या महापालिकेत ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटणार असे जाहीर केले आणि ते सत्य करूनही दाखवले. सौ. कवाळे यांनी मायादेवी भंडारे यांना तर श्री. फरास यांनी नंदकुमार वळंजू यांचा पराभव केला होता.
आघाडीच्या वाहनांतून आलेले नगरसेवक निवडीसाठी जिन्यातून जाताना कसे फुटले, त्यांना किती पैसे दिले?, प्रत्यक्ष पैसे दिले की रकमेच्या चिठ्ठ्या नगरसेवकांना दिल्या याचे किस्से आजही रंगवून सांगितले जातात. श्री. फरास यांच्या निधनाने या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.
............
कोळसा विकून उदरनिर्वाह
त्या काळात वीटभट्ट्या आणि इतर कारणांसाठी कोळशाची गरज असायची. गल्लोगल्ली जाऊन ओरडून कोळसा विकण्याचा श्री. फरास व त्यांचे वडील हारूण फरास यांचा व्यवसाय. प्रतिकूल परिस्थितीत श्री. फरास हे त्यावेळच्या महापालिकेच्या निवडणुकीत सलग तीनवेळा विजयी झाले. दुसऱ्या टर्ममध्ये ते महापौर झाले तेही श्री. महाडिक यांच्याविरोधात जाऊन. शिक्षण समिती सदस्य, पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
................
घरातून दोन महापौर
श्री. फरास यांचे वडील हारूण फरास शेतकरी कामगार पक्षाचे नेते, त्या काळात पक्षाचा बुलंद आवाज अशी त्यांची ओळख. ते नगरसेवक, उपनगराध्यक्ष झाले होते. त्यानंतर १९९९ ते २००० पर्यंत एक वर्षासाठी स्वतः बाबू फरास महापौर झाले. त्यानंतर ९ डिसेंबर २०१६ ला त्यांच्या पत्नी हसीना याही महापौर झाल्या. मावळत्या सभागृहात श्री. फरास यांचे चिरंजीव आदिल नगरसेवक होते. त्यांनीही स्थायी समितीचे सभापतिपद भूषवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97469 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..