पाणी पुरवठा होणार सक्षम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी पुरवठा होणार सक्षम
पाणी पुरवठा होणार सक्षम

पाणी पुरवठा होणार सक्षम

sakal_logo
By

पाणीपुरवठा होणार सक्षम
इचलकरंजीतील वाढीव भागासाठी नवीन योजना : ७८ कोटी प्रस्तावित खर्च; ५ नवे जलकुंभ उभारणार

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १९ ः शहराचा भौगोलिक विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा ताण पाणीपुरवठ्यावर होत आहे. शहराच्या वाढीव हद्दीत पाणीपुरवठा करताना महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे. सुमारे ७८ कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे. यामध्ये प्राधान्याने शहराच्या वाढीव भागातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. तर आवश्यकतेनुसार शहरातील अंतर्गत भागातही काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. साधारणपणे शहरातील सर्वांना समान पाणी मिळण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. शासनाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव मार्गी लागणार आहे.
उद्योगनगरी असल्याने शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. अपवाद वगळता शहराच्या सर्वच बाजूला नागरी वस्ती वाढत चालली आहे. नजीकचा ग्रामीण भाग आता शहराच्या अगदी समीप आला आहे. वाढीव भागात नागरी सुविधा पुरवणे स्थानिक प्रशासनाचे म्हणजे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यानुसार रस्ता, पाणी, दिवाबत्ती यांची सोय करावी लागते. त्यानुसार कार्यवाही केली जाते. पण विशेष करुन पाणीपुरवठ्यावर ताण पडत चालला आहे. मुळात शहराला दररोज ५४ एमएलडी इतक्या पाण्याची दररोज गरज आहे. प्रत्यक्षात ४० एमएलएलडी इतके पाणी उपलब्ध होत असते. त्यामुळे कधी दोन तर कधी तीन दिवस आड पाणी मिळते. त्यातच कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागल्यास शहरातील अनेक भागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच भागात समान व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नवा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेतून हा प्रस्ताव सादर केला आहे. सुमारे ७८ कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे. यामध्ये वाढीव भागातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम कशी होईल, यावर भर दिला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील काही यंत्रणा कालबाह्य झाली आहे. त्याचे नूतनीकरण करणे, गावभाग परिसरात जुन्या जलवाहिन्या आहेत. त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकणे, वाढीव भागात दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी किमान पाच जलकुंभांची उभारणी करणे, नविन पंपिंग मशिनरी बसवणे आदी कामांचा यामध्ये प्राधान्याने समावेश केला आहे.
-------
शहराचा वाढीव परिसर असा
कबनूरमधील इंदिरा कॉलनी व यशवंत कॉलनी परिसर, चंदूर रोड, शहापूर परिसरातील सावली सोसायटी, तोरणानगर, तारदाळ लगतचा परिसर, मुजावर पट्टी, पी. बा. पाटील मळा आदी.
------
वॉटर व एनर्जी ऑडिटची तरतूद
शहरातील पाणीपुरवठा एकसारखा होण्यासाठी या योजनेतून वॉटर व एनर्जी ऑडिट करून घेण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे पाणीपुरवठ्यामधील तांत्रिक त्रुटी समोर येणार आहेत. त्याद्वारे आवश्यक त्या उपाययोजना करणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---------
२५ कोटींचा स्वतंत्र प्रस्ताव
कृष्णा योजनेची सुमारे ६ किमीची जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. ती बदलण्यात येणार आहे. त्यासाठी २५ कोटींचा स्वतंत्र प्रस्ताव तयार केला आहे. तीन टप्प्यातील जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. यामध्ये इचलकरंजी शहर, शिरढोण परिसर व मजरेवाडी परिसर असे हे तीन टप्पे आहेत.
-----
नळाला मीटर बसवणार
शहरातील पाण्याचा योग्य व पूरेपूर वापर होण्यासाठी नळाला मीटर बसवण्याची चर्चा सातत्याने होत आहे. आता अत्याधुनिक असे मीटर बसवण्याचा ५८ कोटींचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार केला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97792 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..