व्यापारी-जिल्हाधिकारी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी-जिल्हाधिकारी बैठक
व्यापारी-जिल्हाधिकारी बैठक

व्यापारी-जिल्हाधिकारी बैठक

sakal_logo
By

51464

शिवाजी चौक-नगारखाना
दुचाकीला प्रवेश शक्य

जिल्हाधिकारी रेखावार; ‘स्पॉट व्हिजिट’नंतर ठोस निर्णय, व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन, ‘पेड ई-पास’ आता ‘ऑफलाईन’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार शिवाजी चौकातून नगारखान्यापर्यंत केवळ दुचाकीसाठी रस्त्याची डावी बाजू खुली करता येईल. मात्र, तीन आणि चारचाकींसाठी बंदीच असेल. ई-पास रद्द केला असून, तो ‘पेड’ पास मंदिराबाहेर कार्यालयातच ‘ऑफलाईन’ उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी आज व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांसह देवस्थानचे पदाधिकारी आणि व्यापारी यांची ‘स्पॉट व्हिजिट’ व्हावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्यानुसार लवकरच ही भेट होणार आहे.

व्यावसायिक म्हणतात....
गेली दोन-तीन वर्षे महापूर, कोविड अशा कारणामुळे सणासुदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. महाद्वार, गुजरी, शिवाजी चौक, बाजारगेट अशा ठिकाणी बॅरिकेडस् लावले जातात. परिणामी, नवरात्रीत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लाखो भाविक येऊनही त्याचा उपयोग व्यावसायिकांसाठी होत नाही. तीन-चार वर्षांपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा अंदाज असल्यामुळे व्यापाऱ्यांनी साहित्य दुप्पट भरले आहे. त्यामुळे महाद्वारवर बॅरिकेडस् लावून दुचाकी बंद करू नये, अशी मागणी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक व्यावसायिक किरण नकाते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. भवानी मंडपातून दर्शन रांग घ्यावी, त्यामुळे शिवाजी चौकातून नगारखान्यापर्यंतच्या व्यापाऱ्यांना फटका बसणार नाही, अशीही विनंती त्यांनी केली. तसेच सराफ कट्ट्यावर जाण्यासाठी भाऊसिंगजी रोडवरील उड्डाण पूलही गतवर्षी केला होता. मात्र, यावर्षी तोही नको अशीही भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.


जिल्हाधिकारी रेखावार म्हणतात.....
‘कोविड’पूर्वी ज्या पद्धतीने नवरात्री उत्सवात नियोजन असेल त्याच पद्धतीने याहीवर्षी नियोजन केले जाईल. शिवाजी चौकातून नगारखान्यापर्यंत रस्त्याच्या उजव्या-डाव्या बाजूला दहा फुटांचा शामियाना असेल, रस्त्यावर गालिचा असेल. तेथे दर्शन रांग असणार नाही. दर्शन रांग भवानी मंडपापर्यंत असेल. भाविकांची अधिक गर्दी झाल्यास त्यांची रांगा शिवाजी पुतळ्याकडे वळविली जाईल. दरम्यान, तेथे रांग असणार नाही. शिवाजी चौकातून नगारखान्याकडे जाणारा रस्ता दुचाकी वाहनांसाठी खुला ठेवता येईल. मात्र, तीनचाकी-चारचाकीसाठी प्रवेश बंदच ठेवावा लागेल. महाद्वाररोडवरही कोविडपूर्वी जी स्थिती होती त्याच पद्धतीने नियोजन असेल. पोलिस अधीक्षकांकडून याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले भाजपचे महानगरजिल्‍हाध्यक्ष राहुल चिकोडी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजय जाधव, महाद्वार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक किरण नकाते, कार्याध्यक्ष जयंत गोयाणी, सराफ संघाचे अध्यक्ष जारेश राठोड, मनोज बहिरशेट, बन्सी चिपडे, यांच्यासह व्यापाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
--------
चौकट
करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरातील पेड-ई-पास रद्द करा, अशी मागणी भाजपचे अशोक देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याला बाजारीकरण येऊ नये, अशी मागणीही केली. यावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की मंत्री, आमदार, खासदारांना वेळेत दर्शन देणे आवश्‍यक आहे. ते जनकार्यासाठी वेळ देत असतात. मात्र, इतर स्वयंघोषित ‘व्हीआयपीं’चा त्रास या पेड पासमुळे कमी होणार आहे. दर्शन रांगेतच्या तुलनेत दिवसाला हजार व्यक्ती ही संख्या नगण्य आहे. तसेच, यामुळे देवस्थानच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे, असेही नाही. त्यामुळे मुख्य दर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी खूपवेळ लागेल असाही भाग नाही. ‘पेड-ई पास’ आता ‘ऑफलाईन’ मंदिरा बाहेरच राहणार आहे. याबाबत मी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींशी बोललो आहे. त्यांचीही याला मान्यता आहे.
-----------------------
निर्णय असे
‘स्पॉट व्हिजिट’ देऊन पुढील निर्णय दोन दिवसांत
भाऊसिंगजी रोडवर दुचाकीला प्रवेश शक्य
तीनचाकी-चारचाकीसह अन्य वाहनांना प्रवेश बंदच
शिवाजी चौक ते नगारखाना भाऊसिंगजी रोडवर उजव्या बाजूला दहा फुटांचा शामियाना
दर्शन रांगेसाठी शेतकरी संघाची इमारत घेतली तर सर्वच प्रश्‍न निकाली यावर चर्चा
शेतकरी संघाची इमारत घेण्यासाठी व्यापारी पुढाकार घेणार, निवेदन देणार
‘दिवसाला केवळ हजारच ‘पेड पास’ (प्रती माणसी दोनशे रुपये) दिले जाणार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97985 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..