मुलांना मोफत अभ्यासवर्ग घेणारी शामली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांना मोफत अभ्यासवर्ग घेणारी शामली
मुलांना मोफत अभ्यासवर्ग घेणारी शामली

मुलांना मोफत अभ्यासवर्ग घेणारी शामली

sakal_logo
By

51750

भावाच्या स्वप्नपूर्तीसाठी बहिणीचा ध्यास
मुलांना करतेय अभ्यासाचे मार्गदर्शन अन् लाईफ कोचिंगचे धडेही

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः मोरेवाडी परिसरातील तानाजी व माधवी पोवार यांचे चौकोनी सुखवस्तू कुटुंब. चिरंजिव सरोज आणि कन्या शामली ही त्यांची दोन्ही मुले हुशार आणि चुणचुणीत. सरोजचे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय. अधिकारी बनल्यानंतर आपल्यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करायचे, असेही त्याचे स्वप्न होते. मात्र, ध्येयाच्या जवळ पोचला असतानाच त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याची दोन्ही स्वप्ने दुभंगली. या धक्क्याने बहीण शामली खचली नाही तर त्याचे स्वप्न पूर्ण करायचे, या ध्येयाने विचार करू लागली. शामलीने अभियांत्रिकीतून पदवी घेतली होती. लाईफ कोचिंगचेही धडे घेतले होते. याच जोरावर तिने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत भावाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली.
तीन वर्षांपूर्वी शामलीचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले होते. परदेशात जाऊन पुढील शिक्षण घेण्याचा तिचा मानस होता. यादृष्टीने तिने इंटरनॅशनल इंग्लिश लॅंग्वेज टेस्टिंग परीक्षाही दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिला एम. एस. करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडमधील नामांकित विद्यापीठाकडून प्रवेशाचे पत्रही मिळाले होते. मात्र, भावाच्या निधनानंतर तिने स्वतःचे ध्येय बाजूला ठेवले आणि भावाच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करू लागली. त्याचवेळी जगावर कोरोनाचे संकट आले आणि सर्व जगच लॉकडाउन झाले. यामध्ये शाळा, महाविद्यालयेही बंद झाली. चार भिंतीच्या आत वर्षाहून अधिक काळ राहिलेल्या मुलांना पुन्हा शाळेत पाठवणे आणि त्यांचा अभ्यास पुन्हा सुरू करणे, हे फार मोठे आव्हान पालक आणि शिक्षकांसमोर उभे होते. अशा वेळी मदत झाली ती शामलीने लिहिलेल्या ‘अभ्यास आणि मी’ या पुस्तकाची. लॉकडाउन काळातच तिने हे पुस्तक लिहिले होते. यामध्ये जी मुले शाळेपासून दुरावली होती त्यांना पुन्हा शाळेची गोडी लागावी, याची सोप्या भाषेत माहिती देणारे हे पुस्तक शाळा, महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही मार्गदर्शक ठरले. यासोबतच विविध शाळांमध्ये जात तिने मुलांना अभ्यासावर लक्ष कसे केंद्रित करावे आणि ध्यानधारणा अभ्यासात कशी उपयुक्त ठरते, याचे प्रात्यक्षिकही द्यायला सुरू केले. आजपर्यंत तिने २५ हून अधिक शाळांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना याचे धडे दिले आहेत.
-
चौकट
वयाच्या विसाव्या वर्षी शिवचरित्राचे लेखन
शामलीने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्‍वाचे पैलू उलगडणारे ‘कहाणी स्वराज्याची’ या पुस्तकाचे लेखन केले. यंदा या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. शिवजयंतीला यू ट्यूब चॅनेल सुरू करून या चॅनेलद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओही प्रदर्शित केले आहेत.
--
कोट
करिअर घडवताना मुलांना वेगवेगळ्या संघर्षांना सामोरे जावे लागते. त्यांचा हा संघर्षाचा मार्ग सोपा व्हावा, यासाठी भाऊ सरोजने प्रयत्न केले होते. तेच प्रयत्न मी सध्या करत आहे. त्यासाठी मी विशेष प्रशिक्षणही घेतले आहे. त्यामाध्यमातून लाईफ कोचिंगचे धडेही विद्यार्थ्यांना मी देते.
- शामली पोवार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98371 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..