माथाडी कामगारांचे ओझे कधी कमी होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथाडी कामगारांचे ओझे कधी कमी होणार?
माथाडी कामगारांचे ओझे कधी कमी होणार?

माथाडी कामगारांचे ओझे कधी कमी होणार?

sakal_logo
By

माथाडी कामगारांचे ओझे कधी कमी होणार?
---
२३ वर्षांनंतरही प्रश्न ‘जैसे थे’; आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतोय
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ ः शहरात सोमवार (ता. १९)पासून माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने सर्व काम ठप्प झाले आहे. मात्र, तीन दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाबाबत अद्यापही ५० किलो वजन गाठीसंदर्भात सकारात्मक चर्चा न झाल्याने कामगारांच्या आरोग्याबाबत देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २८ ऑक्टोबर १९९९ ला परिपत्रक काढून गाठींचे वजन ५० किलो असणे बंधनकारक केले. मात्र, २३ वर्षांनंतरही या नियमांचे पालन होत नाही. कारवाईची तरतूद नसल्याने हा नियम सर्रास पायदळी तुडविताना दिसत आहे. यात कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न अनुत्तरितच आहे.
इचलकरंजीत वस्त्रोद्योगाचे प्रमाण अधिक असल्याने शहराची वस्त्रनगरी म्हणून देशभर ओळख आहे. त्यामुळे शहरातून रोज हजारो टन धान्य, सूत व कापडाच्या गाठींची वाहतूक होत असते. वाहनांमध्ये धान्य, सूत व कापड गाठी उचलणे, वाहनांमध्ये चढविणे, उतरविणे, रचून ठेवणे आदी कामे माथाडी कामगारांकडून केली जातात. परिणामी, हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक ओझे अनेक वर्षे वाहत राहिल्याने या कामगारांना शारीरिक समस्या उद्‍भवतात. गाठी भरणे, उतरविणे यासाठी मोठे कष्ट लागतात. त्यातून निर्माण होणारी शरीराची दुखणी कमी होण्यासाठी हे कामगार व्यसनाचा आधार घेताना दिसतात. हा आधार कधी व्यसन बनून कामगारांचे कुटुंब उद्‌ध्वस्त करते, हे त्यांनाही समजत नाही. अशा अनेक माथाडी कामगारांच्या कुटुंबांची वाताहत झाल्याचेही दिसते. मात्र, या कामगारांच्या खांद्यावरील ओझे कमी करण्याची तसदी घेताना कोणी दिसत नाही.
शहरात नोंदीत माथाडी कामगारांची संख्या ४५० असली, तरी हे काम करणाऱ्‍या नागरिकांची संख्या सुमारे दोन हजारांहून अधिक आहे. कामगारांची संख्या मोठी असताना त्यांच्या आरोग्याबाबत शासनाचे निर्देश असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. योग्यवेळी आरोग्य तपासणी व शारीरिक क्षमतेचीही तपासणी होत नाही. परिणामी, उदरनिर्वाहासाठी राबणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यांच्या शरीराची झीज होत जाते. वयाची चाळिशी गाठल्यानंतर सांध्यांचे दुखणे डोके वर काढते. त्यानंतर ओझी उचलण्याचे काम होत नसल्याने मुलांचे शिक्षण अर्ध्यावर सोडून त्यांना ओझ्याखाली जुंपवावे लागते.
----
बैठका दिखाव्यापुरत्याच
हमालांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी काही कामगार संघटना अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. संघटनेच्या दबावामुळे अधिकाऱ्‍यांच्या व नेत्यांच्या उपस्थितीत अनेकदा बैठका घेतल्या. त्यात ७० किलो गाठीची मर्यादा असावी, असा एकमताने निर्णयही झाला. मात्र, प्रत्यक्षात गाठींचे वजन ९० ते ११० किलो असल्याने माथाडी कामगारांचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
-----
गाठींचे ओझे कमी करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठका
६ जानेवारी २००३ * ९० किलो निर्णय
७ मे २०१२ * ७५ ते ८० किलो निर्णय
२२ फेब्रुवारी २०२० * ७० ते ७५ किलो निर्णय
--
गाठीच्या वजनाबाबत तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता. मात्र, या प्रश्नी ठोस निर्णय झाला नाही. २०२१ मध्ये ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गाठी पकडून त्यांच्यावर फौजदारी तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत कायद्यात तरतूद नसल्याने कारवाई करण्यास मर्यादा पडल्या.
- एस. बी. पुरीबुवा, माथाडी निरीक्षक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98372 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..