विजयदुर्ग समुद्रात तेलगोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्ग समुद्रात तेलगोळे
विजयदुर्ग समुद्रात तेलगोळे

विजयदुर्ग समुद्रात तेलगोळे

sakal_logo
By

L51792
देवगड ः पार्थ जहाजातून तेलगळती सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

विजयदुर्ग समुद्रात तेलगोळे
---
पार्थ जहाज दुर्घटना; प्रशासनाकडून सुरक्षेसाठी पावले
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ ः ‘पार्थ'' या तेलवाहू जहाजाच्या अपघातानंतर विजयदुर्गसमोरील खोल समुद्रात सुमारे १८ सागरी मैल अंतरावर काही प्रमाणात तेलगोळे आढळून आले आहेत. प्रशासनाने किनारी भागात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील विजयदुर्ग ते देवगडसमोरील खोल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याच्या किनारपट्टी भागात सुरक्षितता म्हणून प्रशासनाने आज येथे बैठक घेतली. प्रांत वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला तटरक्षक दलाचे डेप्युटी कमांडर सचिन सिंह उपस्थित होते. या वेळी समुद्रात तेलगोळे आढळल्याची माहिती पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली.
विजयदुर्ग ते देवगडसमोरील खोल समुद्रात सुमारे ४० ते ४५ वाव अंतरावरील पाण्यात ‘पार्थ’ दुर्घटनाग्रस्त झाले. याबाबत रत्नागिरी तटरक्षक दलाने सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाला कळवून मच्छीमारांना मासेमारी करताना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले होते. आता या तेलवाहू जहाजातून तेलाची गळती सुरू झाली आहे. यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले. बैठकीला प्रभारी तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलिस निरीक्षक बगळे, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे उमेश स्वामी तसेच बंदर विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, वन विभाग, कस्टम विभाग यासह अन्य विभागांचे प्रतिनिधी यांच्यासह किनारपट्टी भागातील तलाठी आणि मंडल अधिकारी उपस्थित होते. या वेळी जहाजातील तेलगळतीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. यासाठी किनारपट्टी भागातील प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेलगळतीमुळे समुद्रात पसरणारे तेल वाऱ्याच्या वेगाबरोबरच देवगड-विजयदुर्ग किनारपट्टीसह वेंगुर्ले किंवा मालवण परिसरातही जाऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे केवळ तालुक्यातच नव्हे, तर सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात सुरक्षितता बाळगण्याची आवश्यकता या वेळी व्यक्त करण्यात आली.
विजयदुर्ग भागासमोरील समुद्रात सुमारे १८ सागरी मैल अंतरावर काही प्रमाणात तेलगोळे आढळून आले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हे तेलगोळे जहाजातील गळतीपासूनचे आहेत का, याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बगळे यांनी दिली. दरम्यान, मिठमुंबरी समुद्रकिनारी तटरक्षक दलाकडून स्थानिक प्रशासनाला प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. समुद्रातील तेलगळती किनाऱ्‍यापर्यंत पोचल्यास कोणती काळजी घ्यावी, तेलगोळे कसे हाताळावेत, त्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

आज तातडीची बैठक
दुर्घटनाग्रस्त जहाजातील तेलगळती किनाऱ्‍यावर पोचल्यास कोणती काळजी घ्यावी, यासाठी तालुक्याच्या किनारपट्टी भागातील सरपंच, ग्रामसेवक यांची उद्या (ता. २२) तातडीची बैठक घेऊन जागृती केली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोणती दक्षता घेतली जावी, याबाबत मार्गदर्शन केले जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98542 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..