राजाराम बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम बातमी
राजाराम बातमी

राजाराम बातमी

sakal_logo
By

‘राजाराम’चे एक हजार ३४६ सभासद अपात्रच
---
महाडिक गटाला धक्का, सतेज पाटील गटाची सरशी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याचे कार्यक्षेत्राबाहेरील व बनावट एक हजार ३४६ सभासद अपात्र ठरविण्याचा प्रादेशिक साखर सहसंचालक व सहकारमंत्र्यांचा निर्णय आज उच्च न्यायालयाने कायम ठेवला. या निर्णयाने कारखान्यातील सत्तारूढ माजी आमदार महादेवराव महाडिक गटाला मोठा धक्का बसला असून, माजी मंत्री सतेज पाटील गटाची सरशी झाली आहे. या निर्णयाने कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला.
‘राजाराम’ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एक हजार ८९९ सभासदांच्या विरोधात कारखान्यातील विरोधी शाहू परिवर्तन आघाडीने हरकत घेतली होती. प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे यावर सुनावणी होऊन यातील ४८४ सभासद पात्र ठरविले होते. याशिवाय, दुबार व मृत मिळून ६९, तर बनावट १००८ व कार्यक्षेत्राबाहेरील ३३८ असे एक हजार ३४६ सभासद अपात्र ठरविण्यात आले होते. हा निर्णय १४ फेब्रुवारी २०२० ला देण्यात आला. या निर्णयाविरोधात सत्तारूढ गटाने तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपील केले होते; पण तेही फेटाळण्यात आल्यावर या निर्णयाविरोधात अपात्र सभासदांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयात दोन वर्षांपासून या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित होती. आज त्यावर न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने यापूर्वी प्रादेशिक साखर सहसंचालक व सहकारमंत्र्यांनी दिलेले आदेश कायम ठेवतानाच अपात्र सभासदांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. या प्रकरणी विरोधी परिवर्तन आघाडीतर्फे ॲड. रवी कदम, ॲड. पी. डी. दळवी व ॲड. केदार लाड यांनी काम पाहिले.
कारखान्यावर २८ वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. या विरोधात माजी मंत्री सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. गेल्या निवडणुकीत थोडक्या मतात श्री. पाटील यांचे पॅनेल पराभूत झाले. सध्या राज्यासह जिल्ह्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीविषयीही राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. या निर्णयाने सतेज पाटील गटाला मात्र उभारी मिळाली असून, महाडिक गट बॅकफूटवर गेला आहे.

कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे, यासाठी आम्ही लढा देत होतो. आजच्या निर्णयाने सभासदांना न्याय मिळाला. बाहेरच्या जिल्ह्यांतील सभासदांविरोधात स्थानिक सभासदांनी हा लढा उभारला होता, त्यालाही यश आले.
- सतेज पाटील, माजी मंत्री

न्यायव्यवस्थेचा पूर्ण सन्मान राखून सर्व कायदेशीर बाबी पडताळून पुढील कार्यवाहीची दिशा ठरवू.
- अमल महाडिक, माजी आमदार व कारखान्याचे संचालक

गाव* अपात्र सभासद
शिरोली* ४०२
मौजे वडगाव* ११९
लाटवडे* ३९
टोप* ७८
संभापूर* १३
हेरले* ३२
आळते* ७
भेंडवडे* ६२
लाटवडे* ३९
भादोले* ३३८
पेठवडगाव* १६९
तासगाव* २९
साखरी* ५८

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98764 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..