महापालिकेला द्यावी लागणार तीन कोटीवर भरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेला द्यावी लागणार तीन कोटीवर भरपाई
महापालिकेला द्यावी लागणार तीन कोटीवर भरपाई

महापालिकेला द्यावी लागणार तीन कोटीवर भरपाई

sakal_logo
By

महापालिकेला भरावे लागणार तीन कोटी
सुभाष स्टोअर प्रदूषणप्रश्‍नी राष्ट्रीय हरित लवादाचा अंतिम निर्णय

कोल्हापूर, ता. २२ ः परवानगी न घेता चालवलेल्या सुभाष स्टोअरमधील सांडपाण्याने झालेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणासाठी महापालिकेला तीन कोटीच्या आसपास रक्कम भरावी लागणार आहे. २०१६ ते डिसेंबर २०२१ पर्यंत दोन कोटी २८ लाखांची रक्कम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्‍चित केली आहे. ती अंतिम करत मंडळाकडून स्टोअरची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत भरपाई वसूल करावी असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्याची माहिती ॲड. ओमकार वांगीकर यांनी ‘सकाळ’ ला दिली. याशिवाय परवानगी घेतली नसल्याबद्दल ३० लाखांचा वेगळा दंडही भरावा लागणार आहे. ही सारी रक्कम पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीच वापरावी असेही म्हटले आहे.
महापालिकेच्या वाहनांची दुरूस्ती देखभालीसाठी सुभाष स्टोअर सुरू केले. त्याची सुरूवात १९७२ च्या आसपास झाली तरी त्यावेळी त्याचे कामकाज कमी होते. त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही. त्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याने पंचगंगा नदीचे प्रदूषण झाल्याची याचिका तानाजी रूईकर यांनी लवादाकडे दाखल केली होती. त्याची आज अंतिम सुनावणी होऊन युक्तिवाद पूर्ण झाला. तसेच लवादाने निर्णयही दिल्याचे रूईकर यांचे वकील ॲड. वांगीकर यांनी सांगितले.
वेळोवेळी झालेल्या सुनावणीनंतर लवादाने काही आदेश मंडळाला दिले होते. सुभाष स्टोअरमधून केव्हापासून प्रदूषण झाले. त्यानुसार भरपाईची रक्कम निश्‍चित करण्यास सांगितले होते. २९१६ मध्ये पर्यावरण कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून डिसेंबर २१ पर्यंतची मंडळाने रक्कम काढली. त्यानुसार गेल्या महिन्यात मंडळाने दोन कोटी २८ लाख रूपयांची भरपाई भरावी असे पत्र महापालिकेला दिले होते. याशिवाय १९८२ पासून परवानगी न घेता स्टोअर सुरू केल्याबद्दल ३० लाखांचा दंडही होता. याबाबत आज झालेल्या सुनावणीत चर्चा झाली. मंडळाने निश्‍चित केलेली रक्कम लवादाने अंतिम केली. महापालिकेने २०२२ मध्ये परवानगी मागितली आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ पासून जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत भरपाईची रक्कम निश्‍चित करावी व ती सर्व रक्कम वसून करावी, असेही आदेश लवादाने दिल्याचे ॲड. वांगीकर यांनी सांगितले. मंडळाने ज्या कालावधीसाठी २ कोटी २८ लाखाची रक्कम निश्‍चित केली. त्यानुसार डिसेंबर २०२१ पासून जोपर्यंत परवानगी मिळत नाही, त्या कालावधीपर्यंतची रक्कम वाढणार आहे. ही सारी रक्कम तीन कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेच्या पर्यावरण अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

चौकट
महापालिकेने मागवले होते मार्गदर्शन
मंडळाने २ कोटी २८ लाखांची रक्कम निश्‍चित केल्यानंतर महापालिकेने ही आकडेवारी कोणत्या आधारे निश्‍चित केली याचे मार्गदर्शन मंडळाकडून मागवले होते. आत्ता तिथे केले जात असलेले काम व पूर्वीच्या कामात फरक होता असे महापालिकेचे मत होते. मंडळाने दिलेली आकडेवारी लवादाने अंतिम केल्याने त्याबाबतचा विचार लवादाने केला नसल्याचे दिसते.

चौकट
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी वापरा
महापालिकेला भरावी लागणारी रक्कम पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठीच वापरावी अशी विनंती ॲड. वांगीकर यांनी लवादासमोर केली. त्यानुसार लवादानेही तसे आदेश दिले असल्याचे वांगीकर यांनी सांगितले. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी आणखी काही उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98882 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..