प्रतिभावंत फुटबॉलपटूंच्या विकासाला ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिभावंत फुटबॉलपटूंच्या विकासाला ब्रेक
प्रतिभावंत फुटबॉलपटूंच्या विकासाला ब्रेक

प्रतिभावंत फुटबॉलपटूंच्या विकासाला ब्रेक

sakal_logo
By

गुणवंत फुटबॉलपटूंच्या विकासाला ‘ब्रेक’
---
इंडियन एरोजचा गाशा गुंडाळण्याचा ‘एआयएफएफ’चा निर्णय
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : भारताला अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू देणारा संघ म्हणून ओळख असणारा इंडियन एरोज संघ बंद करण्याचा निर्णय झाला आहे. हा संघ इंडियन प्रीमियर लीग (आय लीग) प्रथम श्रेणीत खेळत होता. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) तांत्रिक समितीच्या या शिफारशीला कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. परिणामी, गुणवंत फुटबॉलपटूंच्या विकासाला ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत.
दहा वर्षांपूर्वी तत्कालीन भारताचे प्रशिक्षक बॉब हॉटन यांनी १९ आणि २३ वर्षांखालील अनेक खेळाडूंना सामन्यांचा अनुभव मिळत नसल्याने विकास खुंटल्याचे निदर्शनास आणले. तत्कालीन अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी द्वितीय श्रेणी आयलीगमध्ये पालियन एरोज म्हणून युवा खेळाडूंच्या संघाचा समावेश केला. प्रथम श्रेणीत मुंबईच्या ‘महिंद्रा’ने अंग काढून घेतल्याने या संघाला बढती मिळाली. तीन वर्षांनंतर पुरस्कर्त्याने माघार घेतल्याने संघ बंद झाला. पण, चार वर्षांनंतर पुन्हा १७ वर्षांखालील विश्वचषक संघातील खेळाडूंना एकत्रित ठेवण्यासाठी याची पुनर्बांधणी झाली.
त्याद्वारे गुणवंत युवा फुटबॉलपटूंना आय लीगच्या मातब्बर संघांशी मुकाबला करण्याची संधी मिळत होती. अव्वल प्रशिक्षक, अत्याधुनिक सुविधांमुळे खेळाडू परिपक्व होत होते. साहजिकच, वरिष्ठ संघासाठी ही उत्तम खेळाडू पुरविणारी पाइपलाईन ठरली. सर्वोच्च इंडियन सुपरलीग (आयएसएल)मध्येही या संघाचे खेळाडू आज मोठ्या संख्येने खेळत आहेत. जेजे, राल्टे, मलस्वामा, गुरुप्रीतसिंग संधू, मनदीपसिंग, विक्रमप्रतापसिंग, अन्वरअली, अनिकेत जाधव अशा अनेकांची जडणघडण या संघाने केली. एरोज बंद होण्याने राष्ट्रीय संघाला खेळाडूंचा पुरवठा करणारी साखळीच ठप्प होणार आहे. एएफसी संघाचा निकष अडचणीचा ठरत असल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले.

आश्चर्यकारक निर्णय
तांत्रिक समितीत एकूण नऊ सदस्य आहेत. दिग्गज आय. एम. विजयन (केरळ) या समितीचे प्रमुख आहेत. क्लामेक्स लॉरेन्स, अरुण मल्होत्रा, मनोरंजन भट्टाचार्य, हरिजिंदरसिंग, इगोसन लिंगडोह, पिंकी मगर आदी माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सदस्य आहेत. अशा सदस्यांच्या समितीकडून युवा खेळाडूंच्या विकासाला ‘ब्रेक’ लावणाऱ्या निर्णयाबाबत फुटबॉल वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

कोट..
१७ वर्षांखालील विश्वचषकानंतर अद्ययावत प्रशिक्षण आणि तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करण्याची संधी एरोजमुळेच मिळाली. त्यामुळेच परिपक्व झालो. प्रतिभावंतांचे हक्काचे व्यासपीठ असणारा संघ बंद झाल्यास खेळाडूंना नक्कीच फटका बसणार.’’
- अनिकेत जाधव, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99213 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..