Kolhapur Crime News : गुंडाचा डोक्यात दगड घालून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Crime News
गुंडाचा डोक्यात दगड घालून खून

Kolhapur Crime News : गुंडाचा डोक्यात दगड घालून खून

कोल्हापूर : रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा आज रात्री अज्ञातांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय २४, रा. दौलतनगर) असे त्याचे नाव आहे. यादवनगनर कोटीतीर्थ परिसरात रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी राजारामपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून अन्य दोघांच्या शोधासाठी पथक रवाना झाल्याचे रशहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. श्री. चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी; चिन्या हळदकर याच्यावर दादागिरीसह वाहनांची मोडतोड असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता.

नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने गुन्हेगारांवर स्थानबद्धची कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती. त्यामध्ये चिन्याचेही नाव होते. राजारामपुरी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.
दरम्यान, यादवनगर परिसरात अज्ञातांनी चिन्याचा पाठलाग करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना चिन्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याच्या शेजारी रक्ताने माखलेला दगड आणि एक सुराही पडलेला होता. पोलिसांनी पंचनामा करून चिन्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवला. या घटनेची माहिती परिसरात पसरली, तशी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन हल्लेखोरांच्या तपासाच्या अनुषंगाने पथकाला सूचना दिल्या. त्याचबरोबर पथकांनी संबधितांचा शोध सुरू केला.

पूर्ववैमनस्यातून प्रकार?
पूर्ववैमनस्यातून तीन ते चार जणांनी चिन्याचा रात्री पाठलाग करून डोक्यात दगड घालून खून केला, अशी परिसरात चर्चा सुरू होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

सुरा कोणाचा?
घटनास्थळी रक्ताने माखलेल्या दगडांबरोबर एक सुराही मिळून आला. हा सुरा नेमका हल्लेखोरांचा की चिन्याचा याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.