शेतकऱ्यांसाठी महिलांनी उभारली कंपनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांसाठी महिलांनी उभारली कंपनी
शेतकऱ्यांसाठी महिलांनी उभारली कंपनी

शेतकऱ्यांसाठी महिलांनी उभारली कंपनी

sakal_logo
By

52408


शेतकऱ्यांसाठी महिलांनी उभारली कंपनी
---
राज्यातील पहिलाच प्रयोग; शिरोळच्या निमशिरगावमधील महिलांचे पाऊल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : शेतकऱ्यांचा शेतीमाल बांधावरून उचलून तो थेट ग्राहकांपर्यंत पोचविणे, शेतकऱ्यांना अल्पदरात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देणे आणि बाजारपेठेत मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवून देणे, यासाठी कार्यरत असणारी महिला शेतकरी उत्पादक कंपनी कोल्हापुरात स्थापन झाली आहे. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील निमशिरगाव शेतकरी उत्पादक कंपनी ही राज्यातील पहिली महिला शेतकऱ्यांनी चालविलेली कंपनी ठरली आहे. या कंपनीच्या अध्यक्षा महिला असून, संचालकही महिलाच आहेत. शिवाय, या कंपनीत काम करणारा कर्मचारीवर्गही महिलाच असेल.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी चालणाऱ्या कंपन्यांना सोयी-सुविधा पुरवून अशा कंपन्या शेतकऱ्यांनी स्थापन कराव्यात, असे आवाहन केले. यातून देशभरात एक हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातही अशा कंपन्या शेतकऱ्यांनी स्थापन केल्या. निमशिरगावची कंपनीही अशीच स्थापन झाली. मात्र, काही कारणांमुळे ही कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती. अशा वेळी वारणा रिव्हर शेतकरी उत्पादक कंपनीने ही कंपनी आपल्या व्यवस्थापनाखाली आणली. ‘वारणा रिव्हर’च्या संचालिका सुरेखा पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी निमशिरगाव शेतकरी उत्पादक कंपनी ही महिलांनी चालवावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. आजपर्यंत या कंपनीचे ३१७ सभासद झाले असून, शेतकऱ्यांना अत्यल्प दरात बी-बियाणे उपलब्ध करून देणे, त्यांच्या मालाला बाजारपेठेपेक्षा अधिक भाव देणे, त्याबरोबर शेतकरी हिताचे उपक्रम राबविणे, असे कार्यक्रम या कंपनीद्वारे घेतले जाणार आहेत. दिवाळीत फराळाचे पदार्थही या कंपनीतर्फे बनविण्यात येणार असून, त्यातूनही महिलांना रोजगार देण्याचा उद्देश आहे. यासाठी त्यांना वारणा रिव्हर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रदीप साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमर गुरव आणि कृषी अधिकारी संजय सुतार यांचे सहकार्य मिळते आहे.
---------
संचालक मंडळ असे ः
सुरेखा पाटील (अध्यक्षा), संचालिका- सरिता साळुंखे, भाग्यश्री कोगनुळे, सोनाली वरपे, पद्मजा पाटील, उज्ज्वला पाटील, सिमलता पाटील, भारती पाटील, अश्विनी लोहार व पूनम पाटील.
------------
कोट
महिला शेतकऱ्यांची पहिली शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून आमच्या कंपनीची उभारणी होत आहे. शेतकऱ्यांबरोबर महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना जास्त नफा मिळावा, यासाठी ही कंपनी कार्यरत आहे.
- सुरेखा अनिल पाटील, अध्यक्षा, निमशिरगाव शेतकरी उत्पादक कंपनी
--------------
स्वतःची वाहतूक व्यवस्था
शेतकरी एखादे उत्पादन शेतीत घेतो. तो शेतीमाल बाजारपेठेत पोचेपर्यंत वाहतूक खर्च, हमाली खर्च, दलाली खर्च आणि तोलाई खर्च अशी आर्थिक झळ सोसल्यावर व्यापारी म्हणेल त्या किमतीत तो शेतीमाल विकावा लागतो. यातून त्यांना उत्पादन खर्च सोडून तुटपुंज्या नफ्यावरच समाधान मानावे लागते, हीच बाब ओळखून या शेतकरी उत्पादक कंपनीने स्वतःची वाहतूक व्यवस्था निर्माण केली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिक भाव मिळेल. या कंपनीतर्फे रोज दोन-तीन टन माल कोल्हापूरसह पुणे, मुंबई अशा ठिकाणीही पाठविला जाईल. यात भाजीपाला, कडधान्ये, धान्ये, खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे.