
हिंमत असेल तर टेंडर भरा; श्रीपतराव शिंदे
52497
श्रीपतराव शिंदे
हिंमत असेल तर टेंडर भरा!
श्रीपतराव शिंदे : डॉ. प्रकाश शहापूरकरांना दिले आव्हान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : राजकीय स्वार्थ व व्यक्तीद्वेषातून विरोधी संचालकांनी राजीनामा दिल्याने गोडसाखर कारखाना बंद पडला. एक संचालक डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मेळाव्यात कारखाना चालवण्याचे नियोजन तयार असल्याचे सांगून एकहाती सत्तेचे आवाहन केले. आता गोडसाखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याचे टेंडर निघालेच आहे. हिंमत असेल तर त्यांनी हे टेंडर भरावे, असे आव्हान माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी त्यांना दिले. जनता दल कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, ‘‘एकीकडे राज्य व देशभरात भाजपचे विरोधक असलेल्या पक्षाच्या संचालकांशी हातमिळवणी करून शेतकरी-कामगारांचे हित न पाहता कारखाना बंद पाडायचा आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना चालवण्याचे नियोजन तयार असल्याचे सांगून एकहाती सत्ता मागायची, ही त्यांची भाषा केवळ स्वार्थासाठी आहे. त्यांनीच भरती केलेल्या कामगारांमुळे कारखान्याच्या जमिनीचा लिलाव होण्याची वेळ आली. याउलट आमच्या काळात भरती झालेल्या ४२९ कामगारांनी कारखान्याच्या हितासाठी सात वर्षांच्या पगारावर पाणी सोडले. मोठा संघर्ष करून गतवर्षीचा हंगाम स्वबळावर सुरू केला. गाळप उसाचे संपूर्ण बिल दिले. कारखान्याला कोणताही तोटा झाला नाही. याउलट कारखाना बंद का पडला, त्यासाठी कटकारस्थान कोणी रचले, याचा शोध लावून सभासदच योग्य वेळी त्यांचा समाचार घेतील.
बाळासाहेब मोरे, भीमराव पाटील, बाळकृष्ण परीट, बाळेश नाईक, उदय कदम, शशिकांत चोथे, रमेश मगदूम, रमेश पाटील आदी उपस्थित होते.
चौकट...
...तर शंभर टक्के पाठिंबा
शिंदे म्हणाले, ‘‘ब्रिस्क कंपनीने मुदतीआधी करार संपुष्टात आणल्याने कारखान्याला तोटा झाला. देणी थकल्याने निवृत्त कामगारांची परिस्थिती हलाखीची आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची देणी देण्याची जबाबदारी ब्रिस्कवरच आहे. या आदेशाचा आधार घेऊन निवृत्त कामगारांनी ब्रिस्क कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा उभारावा व वसुलीची प्रक्रिया राबवावी. त्यासाठी जनता दलाचा कामगारांना शंभर टक्के पाठिंबा राहील.’’