अंबाबाई मंदिर गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिर गैरसोय
अंबाबाई मंदिर गैरसोय

अंबाबाई मंदिर गैरसोय

sakal_logo
By

72516

दर्शनापेक्षा मनस्तापच जास्त
अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची भावना; स्वच्छतागृहापासून ते दर्शनरांगेपर्यंतच्या असुविधा चव्हाट्यावर

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः कोल्हापुरात कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राज्याच्या विविध भागांतून भाविक करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. लांबचा प्रवास करत अंबाबाईला डोळेभरून पाहता येईल, अशी त्यांच्या मनात आशा असते. मात्र येथे आल्यानंतर पार्किंग शोधण्यापासून सुरुवात करावी लागते. स्वच्छतागृह शोधून सापडत नाही. स्वच्छता तर नावालाही नाही. दर्शनरांगेत शिस्त दिसत नाही. लहान मुलांना चिडचिड होतेच. पण, त्यांना स्तनपान देण्यासाठी विशेष सुविधाही मंदिर परिसरात नाही. भाविकांना येथे दर्शनापेक्षा मनस्तापच जास्त होत असल्याचे वस्तुस्थिती ठळक होत आहे.


परभणी ते कोल्हापूर असा दिवसभराचा प्रवास करून आम्ही रात्री अकराच्या आसपास कोल्हापुरात पोचलो. भक्तनिवासाची चौकशी केली. ढीगभर एजंटानी गराडा घातला. अव्वाच्या सव्वा भाडे मागितले. पोलिसांकडे देवस्थानच्या भक्तनिवासाबद्दल विचारणा केली. पोलिसांनी काहीतरी पत्ता सांगितला. मात्र आम्ही गोल गोल फिरत राहिलो. रात्रीचे तीन वाजले तरीही रूम मिळेना. शेवटी शहराबाहेर जाऊन एका लॉजवर दोन हजार रुपयांची रूम मिळाली. पुन्हा सकाळी दर्शनासाठी अंबाबाई मंदिराकडे निघालो. सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत पार्किंग शोधले. बिंदू चौकातून चार वेळा माघारी पाठवले. शेवटी दसरा चौकात पोलिसांना विनंती करून गाडी पार्क केली आणि रिक्षाने भवानी मंडप येथे आलो. दोन तास दर्शन रांगेत थांबलो. आमच्या संस्कृतीत जोडीने दर्शन घेण्याची प्रथा आहे. मात्र, दर्शनरांगेमधूनच आम्ही वेगवेगळे झालो. आमच्यातील पुरुषांनी आधी दर्शन घेतले. नंतर आम्ही. एवढा त्रास सहन केल्यानंतर किमान एखादा क्षण तरी देवीचे दर्शन मिळेल, अशी आशा होती. मात्र क्षणातच आम्हाला पुढे ढकलले. दर्शन तर मनासारखे झालेच नाहीच. उलट मनस्ताप मात्र फार झाला, अशा शब्दांत कोल्हापुरात अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या एका महिलेने कोल्हापुरातील पर्यटकांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली.


कोट
72506
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला आलो. तिरुपती देवस्थानसारखी स्वच्छता नाहीच. पण, साध्या कचऱ्याचा उठावही परिसरात केलेला नाही. अनवाणी चालत असताना निदान पायी मार्ग तरी स्वच्छ असला पाहिजे
-विजय देवकर, औरंगाबाद
..............
कोट
72508
आमच्यासोबत लहान मुले, वयस्कर लोक आहेत. त्यांच्या दर्शनासाठी वेगळी सुविधा देवस्थानने द्यायला हवी होती. त्याच्या चौकशीसाठी मंदिर परिसरात तासाभराचा वेळ घालवला. पण, माहिती मिळाली नाही. शेवटी देवीचे मुखदर्शन घेतले.
- प्रदीप निचाणी, हुबळी, कर्नाटक
............
कोट
72509
माझ्यासोबत सात महिन्यांचे बाळ आहे. बाळाला दर्शनरांगेतून कसे न्यायचे हा प्रश्न आहे. दर्शनासाठी किमान दोन तास लागतील. मध्ये त्याला भूक लागली तर अंगावरील दूध कसे पाजायचे. मंदिर परिसरातही बाळाला पाजता आले नाही. तुळजाभवानी मंदिरात एका कोपऱ्यात दिसणार नाही अशा जागेत बाळाला दूध पाजले.
- पल्लवी देसाई, कर्नाटक
..........
कोट
72510
आम्ही १३ जणांच्या कुटुंबासह फक्त दर्शनासाठी आलो. स्वच्छतागृह शोधले. पण, मिळाले नाही. महिलांनी तर जाण्यासाठीही नकार दिला.
- गोविंद कांबळे, बेळगाव
..........
कोट
72511
भाविकांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. आज दुपारी खूप वेळ फिरलो, चौकशी केली. मात्र स्वच्छतागृह सापडली नाहीत. शेवटी हात, पाय न धुताच देवीचे मुखदर्शन घेतले.
- अक्षता पाटील, शिरोळ
...............
कोट
72512
कऱ्हाडहून दुपारी कोल्हापुरात पोचलो. रांग मोठी होती, दर्शनासाठी वेळ लागणार म्हणून मुखदर्शन घेतले. आमच्यातील काही महिलांना स्वच्छतागृहात जायचे होते. पण स्वच्छतागृह नाही, असे समजले. अंबाबाई प्रसाद अन्नछत्रात दिला जातो, याची माहिती होती. मात्र त्याबद्दल येथे चौकशी करूनही माहिती मिळाली नाही.
-अजित सुतार, कऱ्हाड
............
कोट
72514
नाशिक, मुंबईहून आम्ही कुटुंबासह दर्शनासाठी आलो आहे. आमच्यासोबत लहान मुले आहेत. त्यांना स्वच्छतागृहात जायचे होते. मात्र स्वच्छतागृह भेटले नाही. शेवटी एका गाडीच्या मागे त्यांना मोकळे केले.
- योगेश जाधव, नाशिक
...............
कोट
२५ वर्षांपूर्वी आम्ही कोल्हापुरात आलो होतो. त्यावेळी खूप प्रसन्न वाटले होते. आज मात्र निराशा झाली. दोन तास रांगेत होतो. मात्र एक मिनिटही दर्शन घेता आले नाही. व्हीआयपी दर्शन घेता येत असेल तर जाहीर करा. काही जणांना दर्शनरांगेच्या मधूनच आत सोडले जाते, हे बरोबर नाही. नवस फेडायला आलेल्या जोडप्यांना एकत्र दर्शनाची सुविधा दिली पाहिजे.
- एक पर्यटक, पैठण, औरंगाबाद
.............
कोट
मुख्य दर्शनरांगेत गर्दी होती म्हणून मुखदर्शनाचा पर्याय निवडला. मात्र तेथेही ढकलाढकली सहन करावी लागली. शेवटी हात जोडले आणि बाहेर आले.
-गायत्री चौधरी, सांगली
..............
कोट
पार्किंगपासून मंदिरापर्यंत जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत होते. कचराकुंडी कोठेही दिसली नाही. प्लास्टिकच्या बाटल्याच नजरेत आल्या. मंदिर परिसराचे पावित्र्य राखत किमान स्वच्छता तरी ठेवली पाहिजे.
- योगेश आवटे, पुणे
.....................
ठळक चौकट
खुलेआम व्हीआयपी दर्शन
रविवार आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने रविवारी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. दर्शनरांगेचा मंडपही भाविकांनी फुलून गेला. मुखदर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. मात्र, या गर्दीतही व्हीआयपी दर्शन खुलेआम दिले जात होते. दर दहाव्या मिनिटाला दहा-पंधरा जणांना शनिमंदिरा शेजारील दरवाजांतून पास दाखवताच एंट्री दिली जात होती.