रिपोर्ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपोर्ताज
रिपोर्ताज

रिपोर्ताज

sakal_logo
By

रिपोर्ताज
उदयसिंग पाटील


L72612, L72614
‘इस्टेट’ करोडोंची, तरीही.....

एकाबाजूला महापालिकेचे शाहू क्लॉथ मार्केट हे व्यापारी संकुल तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी रोड. कापड, इलेक्ट्रिकलमधील मोठमोठ्या व्यावसायिकांच्या नावांनी ओळखला जाणारा परिसर. दररोज करोडोंची उलाढाल. ‘लक्ष्मी’चा अक्षरशः निवासच असलेल्या अशा लक्ष्मीपुरीसारख्या ‘हार्ट ऑफ सिटी’ तील ही जागा सोन्यापेक्षा कमी मोलाची नाही. कोंबडी बाजारमधील थोडीथोडकी नव्हे, तर करोडोंची किंमत असलेली तब्बल पाऊण एकर असलेली ही जागा कुठे वाहने उभी करून ठेवलेली, कुठे भंगार टाकलेले, बंद अवस्थेतील शेडवर उगवलेली झुडुपे यांनी झाकोळून गेली आहे. करोडोंच्या या इस्टेटीचे कुणाला काहीही पडलेले नाही...

म्हणे, कुणी इंटरेस्टेड नाही...
या परिसरातील जागा विक्रीची फक्त कानोकानी माहिती मिळताच खरेदीसाठी चढाओढ लागणारा हा परिसर. कामे करायची आहेत, पण उत्पन्नच नाही असे एकाबाजूला सांगायचे व दुसऱ्याबाजूला हातातील सोन्यासारखी जागा पाडून ठेवायची. यामुळे महापालिकेची इस्टेट भंगारात गेल्यासारखी स्थिती आहे. पाच वर्षांत व्यापारी संकुलाचा श्रीगणेशाही झालेला नाही. मध्यवस्तीतील परिसर रहिवासापेक्षा व्यावसायिकांचा, त्यांच्यावर अवलंबून कामगार, इतर छोट्या व्यावसायिकांचा. साहजिकच येथील जागेवर व्यावसायिकांची कायम नजर. कोंबडी बाजारामधील ११६३ चौरस मीटर जागेवरील व्यापारी संकुलासाठी अशी काय माशी शिंकली आहे कोण जाणे? म्हणे, या जागेसाठी कुणी इंटरेस्टेडच नाही.

दुकान उघडण्याआधीच ग्राहक
या परिसरात व्यावसायिकांनी दुकाने उघडण्याआधीच ग्राहकांची दारात गर्दी. परिसरात फेरफटका मारल्यानंतर एकही व्यावसायिक आढळला नाही की त्याला या परिसरात जागा मिळाल्यास इंटरेस्ट नाही म्हणणारा. येथील व्यावसायिकांसमोर एकच प्रश्‍न आहे की प्रकल्प पुढे का सरकत नाही. प्लास्टिक विक्रेते, वजनकाटे, सलूनवाले, टेलर, धार लावणारे असे छोटे व्यावसायिक या जागेवर होते. गाळे सीलबंद असले तरी पुढे काय होईल हे सांगता येत नाही म्हणून अनेकजण किमान वीजबिल भरत आहेत. दोन भागात विभागलेल्या एका भागात वाहनांचे पार्किंग झाले आहे. कुणीही वाहन लावून जातो. दुसऱ्या भागात भंगारवाल्याने जागा ताब्यात घेतल्यासारखेच झाले आहे. भंगार गोळा करून येणाऱ्या महिला त्या जागेत बसतात व त्या व्यावसायिकाला विकतात. सर्व जागा भंगारने भरलेली होती.

‘आमच्या पोटावर लाथ’
२०१७ मध्ये गाळे सीलबंद केल्यानंतर आज त्यांच्या शेडवर झुडुपे उगवली आहेत. परिसरात दहा बाय दहाचे शेड भाड्याने घ्यायचे झाल्यास किमान सात ते आठ हजारांहून अधीक भाडे द्यावे लागते. त्यामुळे ज्यांना शक्य नाही, ते सकाळी साहित्य घेऊन येतात, दिवसभर व्यवसाय करतात व परत साहित्य घेऊन जातात. त्यातील कुणी रस्त्यावर बसून तर काही रिक्षात बसून व्यवसाय करत होते. तिथे धार लावण्याचा व्यवसाय करणारा अझर शिकलगार रिक्षात बसला होता. त्याच्या बंद दुकानासमोर रिक्षात मशीन लावले होते. कात्रीला धार लावताना तुम्हाला गाळे मिळणार होते, काय झाले, असे विचारताच त्याने महापालिकेने पोटावर लाथ मारल्याची कडवट भावना व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘मुळात आम्हाला येथे विस्थापित म्हणून जागा दिली. आता या जागेवर संकुल उभारणार म्हणून पुन्हा हटवले. महापालिकेचा कारभार माहिती असल्याने संकुल केव्हा उभारणार, त्यात जागा केव्हा मिळणार याचा काहीच भरोसा नाही. तोपर्यंत रोजीरोटीचे काय? तोपर्यंत पर्यायी जागा द्या म्हटली तर त्यालाही राजी झाले नाहीत. आता कोण दुसरीकडे कामगार म्हणून कामाला जातो तर काहीजण धक्क्याने आजारी पडले.’’ बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत गाळे उघडून मिळावेत या व्यावसायिकांच्या मागणीची दखलच घेतलेली नाही.
....................

कुणी फिरकले नाही
लुगडी ओळीला १९७६ मध्ये व्यवसाय करणाऱ्यांना तिथून हटवून सध्याच्या कोंबडी बाजार प्रकल्पाच्या जागेवर विस्थापित केले होते. तिथे दहा बाय दहाच्या जागेत ४४ जण व्यवसाय करत होते. महापालिकेच्या सभागृहाने ठरवलेल्या संकुलासाठी कामाला सुरूवात केली २०१७ मध्ये. दरम्यान कोर्ट मॅटरही झाले. त्यानंतर प्रशासनाने गाळे सील केले. त्यात अनेक व्यावसायिकांचे साहित्य अडकले आहे. त्यानंतर महापालिकेचे कुणीही फिरकले नसल्याचे व्यावसायिक सांगतात.
...............

कोंबडी बाजार दृष्‍टिक्षेपात

जागा - ११६३ चौरस मीटर
गाळेधारकांची संख्या- ४४
गाळे सीलबंदचे वर्ष - २०१७
...........................

शहरातील अन्य प्रकल्प
- गुजरीतील पाटणकर विद्यालय जागेवर व्यापारी संकुल ‘अर्धवट''च.
- मध्यवर्ती बसस्थानकाजवळील बहुमजली पार्किंग कागदावरच.
- महाराणा प्रताप चौकातील ऊर्दू शाळेच्या जागेवर व्यापारी संकुलाची रुवातही नाही.