
हाजगोळी बुद्रकमध्ये रंगला रिंगण सोहळा
72753
हाजगोळी बुद्रक (ता. आजरा) : येथे रंगलेला रिंगण सोहळा.
हाजगोळी बुद्रकमध्ये
रंगला रिंगण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
भादवण, ता. २ : हाजगोळी बुद्रुक (ता. आजरा) येथे अखंड हरिनाम सोहळ्यानिमित्त रिंगण झाले. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो विठ्ठल भक्तांनी उपस्थिती लावली होती.
येथे भावेश्वरी वारकरी सांप्रदायाने दरवर्षी प्रमाणे यंदाही रिंगण सोहळ्याचे आयोजन केले होते. दोन वर्ष कोरोनामुळे हा सोहळा झाला नाही. त्यामुळे यंदाच्या सोहळ्यासाठी उत्सुकता दाटली होती. गावात प्रत्येकाच्या दारात गुढी उभारली होती. घराघरांवर भगवा फडकत होता. रविवार (ता. १) पासून अखंड सोहळा सुरू आहे. विठ्ठळ मंदिरात काकड आरती व धार्मिक विधी होत आहेत. भजन, कीर्तन, पारायण, प्रवचन झाली आहेत. सजवलेल्या बैलगाडीमध्ये विठ्ठ्ल रखूमाईच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विविध गावांच्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या.
आळंदी येथील ज्ञानेश्वरी पालखीचे अश्व या सोहळ्यासाठी आणले होते. अंबुलकर महाराज यांनी रिंगण सोहळ्याचे महत्त्व सांगितले. सुरूवातीला महिलांनी डोक्यावर तुळशी कट्टा घेऊन रिंगण पूर्ण केले. बैलगाडी व भजनी मंडळांनी रिंगण पूर्ण केले. त्यानंतर अश्वांनी पाच फेऱ्या मारत रिंगण पूर्ण केले. आरती करून रिंगण सोहळ्याची समाप्ती झाली. या वेळी विठ्ठल नामाचा गजर सर्वत्र गर्जत होता. रिंगण सोहळ्यासाठी कोवाडे, पेद्रेवाडी, मलिग्रे, सरोळी, हाजगोळी खुर्द, भादवण, निंगुडगे, ऐनापूरचे वारकरी सहभागी झाले.