शाहू महाराज वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू महाराज वाढदिवस
शाहू महाराज वाढदिवस

शाहू महाराज वाढदिवस

sakal_logo
By

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या
वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृतमहोत्सव वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरा होत असून, उद्या (ता. ७) राजर्षी शाहू सलोखा फेरी काढण्यात येत आहे. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातून सकाळी दहा वाजता त्यास सुरुवात होईल. राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे त्याचे आयोजन केले आहे.
शिव-शाहूंचा वारसा व पुरोगामी विचारांचे पाईक असणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. उभा मारुती चौकातून निघणाऱ्या शाहू सलोखा फेरीचा बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर, दसरा चौक ते न्यू पॅलेस असा मार्ग असणार आहे. पॅलेसमध्ये जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येतील. तरी विविध समाज संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते, तालीम मंडळे, वसतिगृह पदाधिकारी व शाहूप्रेमींनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी केले आहे.
शहरातील मर्दानी खेळाच्या आखाड्यांतर्फे भवानी मंडप येथे सकाळी सात वाजता शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. लाठी, पट्टा, तलवार, फरी गदका, विटा, लिंबू काढणीची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. बिनखांबी गणेश मित्र मंडळातर्फे सकाळी साडेआठ वाजता अंधशाळेतील विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप केले जाईल. शाहू महाराज यांना रोप देऊन शुभेच्छा देण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप केले जाईल. राजर्षी शाहू खासबाग मैदानात सायंकाळी कुस्ती मैदानास प्रारंभ होणार आहे. सीपीआरमध्ये मोतिबिंदूच्या शंभर रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहेत.
--------------
चौकट

चौकाचौकांत शुभेच्छा फलक

शहरातील चौकाचौकांत शाहू महाराजांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. विविध संस्था संघटनांनी रक्तदान, फळे वाटप व अन्नदान उपक्रमांचे आयोजन केले आहे.