शाहू छत्रपती सत्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू छत्रपती सत्‍कार
शाहू छत्रपती सत्‍कार

शाहू छत्रपती सत्‍कार

sakal_logo
By

पहिल्या आवृत्तीसाठी

73921
कोल्हापूर ः श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शनिवारी चांदीची गदा देऊन गौरव करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. या वेळी (डावीकडून) शहाजीराजे, व्ही. बी. पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, संभाजीराजे, प्रतापसिंह राणे, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, डॉ. डी. वाय. पाटील, दीपक केसरकर, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे, मालोजीराजे, यशराजे, आर. के. पोवार, आदिल फरास आदी. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)


शाहू महाराज राजवाड्यातील नव्हे, जनतेतील छत्रपती
---
शरद पवार यांचे गौरोवोद्‌गार; अमृतमहोत्सवी वाढदिनानिमित्त सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या कार्यातून जपला. त्यांनी विविध संस्थांचे नेतृत्व करून आपले कर्तृत्व दाखवून दिले. समाजावर संकट आले, त्या त्यावेळी शाहू महाराजांनी रस्त्यावर उतरून जनतेला आधार दिला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज राजवाड्यातील नव्हे, तर जनतेतील छत्रपती आहेत, असे गौरवोद्‌गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे काढले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. खासबाग मैदानावर हा भव्य सोहळा झाला. त्या वेळी मैदान भरून गेले होते.
श्री. पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार आणि चांदीची गदा देऊन श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा नागरी सत्कार करण्यात आला. श्री. पवार म्हणाले, ‘‘मुघल, रजपूत यांची ओळख त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावरून झाली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून झाली. त्यांनी रयतेचे राज्य स्थापन केले. ते भोसलेंचे राज्य नव्हते, तर स्वराज्य होते. सत्ता हाती आल्यावर ती सर्वसामान्यांसाठी वापरायची असते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समतेचे राज्य आणून हे दाखवून दिले. त्यांचा हा वारसा छत्रपती कुटुंबाने पुढे चालविला आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या ७५ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक चांगल्या गोष्टी केल्या. कुस्ती वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शैक्षणिक, सामाजिक संस्थांची स्थापना करून त्याचे नेतृत्व केले. यातून त्यांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले. त्यांनी नेहमीच समाजातील शेवटच्या घटकावर प्रेम केले. कोरोना, महापूर अशा संकाटांवेळी त्यांनी समाजाला धीर दिला. ज्या ज्यावेळी समाजावर संकट आले, त्या त्यावेळी शाहू महाराज राजवाड्यातून रस्त्यावर आले. ते राजवाड्यातील नव्हे, तर जनतेतील छत्रपती आहेत.’’
या वेळी माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा वाढदिवस हा लोकोत्‍सव झाला. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या विचारात अजिबात बदल नाही.’’ माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘खेळ आणि खेळाडूंवर प्रेम करणारे तसेच जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होणारे शाहू महाराज जनतेचे राजे आहेत. त्यांनी आयुष्यभर समतेचा विचार जपला.’’ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उच्चविद्याविभूषित असून, व्यासंगी आहेत. ते, कर्तृत्व आणि नम्रता यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.’’
सत्कारानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘वयाची ७५ वर्षे कशी सरली, हे कोल्हापुरात राहिल्याने कळालेच नाही. इतरांनी आग्रह केला म्हणून हा सोहळा होतोय. मला याची आवश्यकता नव्हती. दोन वर्षांनंतर खासबाग मैदान कुस्ती शौकिनांनी भरले आहे, हे पाहून आनंद वाटतो. याच मैदानावर साधारण १९६२ मध्ये गोगा व सादिकची कुस्‍ती झाली. हे दोन्‍हीही मल्‍ल पाकिस्‍तानचे. जवळपास तासभर कुस्‍ती चालली होती. गोगाने कुस्‍ती जिंकली, मात्र शौकिनांची मनं सादिकने जिंकली. कोल्‍हापुरात जेव्‍हा कुस्‍त्या रंगतात, तेव्‍हा ते मल्लांवर किती जिवापाड प्रेम करतात, हे सर्वांनी पाहिले. राजर्षी शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि शहाजीराजे या सर्वांनी कुस्तीला राजाश्रय दिला. आता कुस्तीत आपण थोडो मागे पडलो आहोत. ते गतवैभव पुन्हा मिळविले पाहिजे.’’
या वेळी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, संग्रामसिंह भोसले, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, व्ही. बी. पाटील, माजी आमदार मालोजीराजे, युवराज शहाजीराजे, युवराज यशराजराजे, ए. वाय. पाटील, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, ॲड. महादेव अडगुळे, आदिल फरास, सचिन चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.