सीपीआर मध्ये गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर मध्ये गोंधळ
सीपीआर मध्ये गोंधळ

सीपीआर मध्ये गोंधळ

sakal_logo
By

‘गोकुळ’च्या माजी अध्यक्षांच्या
मुलाचा ‘सीपीआर’मध्ये राडा
---
मद्यधुंद अवस्थेत डॉक्टर, परिचारिकांशी हुज्जत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः वेळ पहाटे पाचची... ‘सीपीआर’च्या अपघात विभागात दोन तरुण आले. त्यातील एकाचा कुत्र्याने चावा घेतला होता. तो ‘गोकुळ’च्या माजी अध्यक्षांचा मुलगा आहे. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. डॉक्टरांनी त्यांची स्थिती पाहून त्यांना इंजेक्शन दिले. मात्र, तुम्ही आम्हाला कोणते इंजेक्शन देणार, त्याची बाटली द्या, असे सांगून ते डॉक्टर आणि परिचारिकांशी हुज्जत घालू लागले. अखेर त्यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. पण, नंतर तो तरुण तेथून निघून गेला. मात्र, तब्बल दोन तास हुज्जत घातल्याने त्याने येथील यंत्रणेला चांगलेच वेठीला धरले.
याबाबत ‘सीपीआर’मधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सीपीआर’च्या अपघात विभागात दिवस-रात्र रुग्ण व जखमी उपचारांना येत असतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी चार आंतरवासीता डॉक्टर, चार परिचारिका, चार वैद्यकीय कर्मचारी व एक वैद्यकीय अधिकारी असे पथक येथे कार्यरत असते. अशी वैद्यकीय यंत्रणा रात्री ड्यूटीवर होती. पहाटे पाचच्या सुमारास माजी अध्यक्षांचा मुलगा कुत्रे चावले आहे म्हणून उपचार घेण्यास आला. तेव्हा त्याने, ‘डॉक्टर कुठे आहेत, इंजेक्शन कसे देणार ते सांगा. मला तुम्ही इंजेक्शन देऊ नका. अमूक डॉक्टरला बोलवा,’ अशी बडबड सुरू केली. काही वेळात डॉक्टर तपासणी व उपचार सुरू करीत असूनही त्यावर हरकत घेतली. तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही त्याने गोंधळ घातला. नंतर ‘त्या’ माजी अध्यक्षांच्या मुलाची पत्नी तेथे आली. नाश्‍ता करून येतो, असे सांगून ते ‘सीपीआर’मधून बाहेर पडले, पण नंतर आलेच नाहीत.
----------------------

अपघात विभाग दहशतीखाली

सीपीआर रुग्णालयाच्या अपघात विभागात अनेकदा रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून गर्दी केली जाते. कोणाला बाहेर जा, असे सांगितले तर वादावादी सुरू होते. काही वेळा राजकीय नेत्यांची नावे सांगून अथवा फोन देत डॉक्टरांवर दबाव टाकला जातो. आरडाओरड केली जाते. ‘सीपीआर’चे सुरक्षारक्षक आहेत, मात्र त्यांना कारवाईचे अधिकार नाहीत. पोलिस चौकी आहे. मात्र, पोलिस किरकोळ प्रकरण म्हणून लक्ष घालणे टाळतात. परिणामी, अपघात विभागात ड्यूटी करणे दहशतीखाली काम करण्यासारखे असल्याचे मत वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केले.
----------------------------------