दररोज १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दररोज १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया
दररोज १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया

दररोज १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया

sakal_logo
By

74084
इचलकरंजी : रिसायकलिंग होणारा कचरा व आरडीएफ कचरा मशिनद्वारे वर्गीकरण करण्यात येत आहे.
------------
दररोज १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया
इचलकरंजीत ६० टक्के ओला; तर ४० टक्के सुका कचरा

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ८ : इचलकरंजी शहराला भेडसावणाऱ्या कचऱ्याची समस्या निरसन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दररोज १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणारा प्रकल्प सुरू झाल्याने दररोज साठणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येणार आहे.
शहरात ओला व सुका कचरा दररोज सुमारे १२० टन गोळा होतो. त्यामध्ये सुमारे ६० टक्के कचरा हा ओला, तर ४० टक्के सुका असतो. त्यामधील ३ टन प्लास्टिक कचरा रिसायकलिंग, तर ३० टन पुन्हा वापरात न येणारा (आरडीएफ) करण्यात येत आहे. ओल्या कचऱ्यापासून ३० टन कंपोस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भविष्यात शहरात कचऱ्याचा डोंगर कमी होताना दिसणार आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने येथे दाट वस्त्या दिसून येतात. शहराची लोकसंख्या ही ३ लाख ५० हजारांचा टप्पा ओलांडत आहे. त्यासोबत इतर कामानिमित्त बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्याही सुमारे २५ हजार आहे. या सर्वांमधून विविध प्रकारचा कचरा होत असतो. त्याचे प्रमाण मोठे असले तरी महापालिका प्रशासन घंटागाडीच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन करत असते. यामधून दररोज १२० टन कचरा जमा होतो. हा जमा झालेला कचरा सांगली नाका येथील मैल खड्ड्यामध्ये टाकण्यात येतो. दररोज इतक्या प्रमाणात कचरा जमा होत असल्याने येथे कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. तर कचरा सडून परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरत असते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कचरा डेपो स्थलांतरित करावा यासाठी तेथील नागरिकांकडून वरचेवर मोर्चे, निवेदन, आंदोलने होताना दिसतात, मात्र कचऱ्याची विल्हेव्हाट लावण्यासाठी महापालिकेकडे ठोस उपाययोजना नसल्याने हा प्रश्न अनुत्तरीतच होता.
शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मार्च २०२२ मध्ये आदर्श भारत प्रा.लि. कंपनीस ठेका दिला, मात्र त्यानंतर ही महापालिकेकडून आवश्यक अशा विजेची व्यवस्था केली नसल्याने हा प्रकल्प केवळ चार तास सुरू असतो, मात्र आठ दिवसांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, कचऱ्याची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावण्यात यश मिळत आहे. ओल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने व त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येत आहे; मात्र यासाठी हा कचरा ४५ दिवस साठवून ठेवणे आवश्यक आहे. सध्या जागेचा प्रश्न निर्माण होत असून, त्यासाठी शेड उभारणीचे काम सुरू आहे. सध्या हा प्रकल्प आठ तास सुरू असून, कचऱ्याचे प्रमाण वाढल्यास २४ तास सुरू ठेवण्याची तयारी संबंधित कंपनीने दर्शवली आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचे डोंगर कमी होताना दिसणार आहेत.
--------
आधी साचलेल्या कचऱ्याचे काय?
सध्या असलेल्या मैल खड्ड्याचा एरीया सुमारे सहा एकर आहे. यामधील बहुतांश भाग कचऱ्याच्या डोंगरांनी व्यापला आहे. हा आधी साचलेला कचरा बायोमायनिंग करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुमारे २२ कोटी खर्च असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधी साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार हे अनिश्चित आहे.
-----
कचऱ्याचे वर्गीकरण आवश्यक
शहरातून जमा होणाऱ्‍या कचऱ्‍यावर जलद प्रक्रिया होण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा असणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी कचरा जमा करताना कचऱ्याचे वर्गीकरण करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.