
सफाई कामगारांना समान वेतन द्यावे
जिल्हा परिषद ... लोगो
...
सफाई कामगारांना समान वेतनाची मागणी
प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी जे सफाई कामगार आहेत, त्यांना समान वेतन देण्याची मागणी होत होती. याबाबत औद्योगिक न्यायालयाने ५ ऑक्टोबर २०१२ रोजी अंतरिम आदेश दिला आहे. त्या आदेशाप्रमाणे समान कामाला समान वेतन द्यावे, अशी मागणी करवीर कामगार संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राकडे काम करणाऱ्या सफाई कामगारांना समान कामाला समान वेतन मिळावे, यासाठी औद्योगिक न्यायालयाकडे संघटनेमार्फत तक्रार केली आहे. न्यायालयाने सफाई कामगारांना समान कामाला समान वेतन द्यावे व नोकरीतून कमी करू नये म्हणून अंतरिम अर्ज मंजूर केला आहे. त्याअनुषंगाने अद्यापही समान कामाला समान वेतन दिले जात नाही. आरोग्य विभागाची ही कृती म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करावी, यासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, त्याला योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे सफाई कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या सफाई कामगारांची बिले नऊ महिने थकीत आहेत. याबाबत योग्य ती कारवाई न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन कॉ. बाळासाहेब पोवार, बाळासो कांबळे, उज्ज्वला शिंगे आदींनी दिले.