युवा दिन विशेष

युवा दिन विशेष

लोगो - राष्‍ट्रीय युवा दिन विशेष

मेडिटेशन, माईंडफुलनेस अन् हॅपीनेस प्रोग्रॅम
युवकांत ट्रेंड; करिअर निश्चिती करून त्यादृष्टीने क्षमता वाढविण्याचीही धडपड
नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : स्पर्धात्मक जग, त्यामध्ये स्वतःला टिकविण्यासाठी करावी लागणारी धडपड, आवश्यक असणारा आत्मवश्‍वास, सोशल मीडियामुळे दुरावलेली एकाग्रता आणि संवाद कौशल्ये वाढविण्यासाठी युवकांचा मेडिटेशन, हॅपीनेस प्रोग्रॅम तसेच योगासने वर्गांकडे कल वाढला आहे. किशोरावस्थेतच करिअर निश्चिती करून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या क्षमता हव्यात, याचा विचार केला जातो आहे. त्यामध्ये मानसिक आरोग्य किती महत्त्‍वाचे आहे, हे समजून घेतले जातेय आणि त्यामुळे मेडिटेशन, सकारात्मक विचार, फिटनेस राखणे, प्रेरणादायी व्यक्तित्वांची व्याख्याने ऐकणे अशा गोष्टी युवक प्राधान्याने करत आहेत. युवकांमधील हा ट्रेंड जाणून घेताना तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मते.
--------------
सध्याची पिढी कुटुंबापासून दुरावत चालली आहे. अशा वेळी त्यांना सपोर्टची गरज आहे. हा सपोर्ट ते योगासनांमधून मिळणारा आनंद, मेडिटेशनमध्ये शोधत आहेत. अभ्यास करण्यासाठी लागणारी एकाग्रता मेडिटेशनच्या माध्यमातून आणखी दृढ होत असल्याचा अनुभव त्यांना येतो. त्यामुळे सुटीच्या कालावधीत योगासनांचे वर्ग, मेडिटेशनचे क्लासेसमध्ये युवकवर्ग सहभागी होतो. कॉलेज, शाळांच्या काळात याचे ऑनलाईन वर्गही आहेत. या वर्गात दोन ते चार तासांचा वेळ तरी ते नक्की घालवतात.
डॉ. मृणालिनी डावजेकर, ॲक्युपेशनल थेरपिस्ट
------------
योगासने, मेडिटेशन असे शब्द काही तरूणांना नकोसे वाटतात. मात्र त्यांना ते वेगळ्या भाषेत हवे असतात. म्हणजेच मेडिटेशन करायचे असते. मात्र ते इंग्लिशमध्ये प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन टेक्निक व्दारे आत्मसात करायचे असते. त्याप्रमाणे सिनेमातील हिरोप्रमाणे शरिरयष्टी बनवायची असते. त्यामुळे फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. आयर्न मॅनसारख्या स्पर्धेत सहभागी होऊन जिंकायचे असते, म्हणून मानसिक ध्यानधारणा, एकाग्रता आणि आत्मविश्‍वास वाढवायचा असतो, म्हणून योगा, मेडिटेशन, माईंडफुलनेस प्रोग्रॅम अशा क्लासेसकडे युवा वर्ग वळतो आहे.
- डॉ. कल्याणी कुलकर्णी, जुगाड कौन्सिलिंग सेंटर
----------
करिअरचा विकास साधण्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी युवक मोठ्या संख्येने युथ हॅपीनेस प्रोग्रॅममध्ये सहभागी होतात. १८ ते ३५ या वयोगटातील व्यक्तींसाठी हा प्रोग्रॅम आहे. चार ते सहा दिवसांच्या या क्लासमध्ये करिअरवृद्धीच्या दृष्टीने विचार करून काही क्षमता आत्मसात करतात. यामध्ये आत्मविश्‍वास कसा वाढवायचा, नेतृत्वगुण कसे विकसित करायचे, एकाग्रता कशी वाढवायची, संवाद कौशल्ये आत्मसात करण्याच्या विविध कौशल्ये या प्रोग्रॅममध्ये शिकवली जातात. हे शिकवणारा आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रत्येक बॅच हाऊसफुल्ल होते.
- सचिन मुधाळे, आर्ट ऑफ लिव्हिंग
----------
हल्ली सोशल मिडीयावर मोटिव्हेशन स्पिकर्सची वाढती संख्या आहे. यामधून सकारात्मक विचार मिळतात, म्हणून ते पाहण्याकडे युवक वर्ग आकर्षित होतो. मात्र प्रत्येकाच्या सांगण्यातून तरूणवर्ग गोंधळतो. त्यामुळे भविष्यातील उद्देश ठेवून सकारात्मक विचारांसाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. त्यासोबतच मेडिटेशन करतानाही भविष्यातील आपला हेतू, ध्येय काय ?, याचा विचार करून त्याकडे वळले पाहिजे. ट्रेंड म्हणून अनेक युवक मेडिटेशनकडे वळतात. मात्र त्यातून साध्य काही होत नाही.
- आम्रपाली रोहिदास, समुपदेशक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com