नेत्यांच्या प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेत्यांच्या प्रतिक्रिया
नेत्यांच्या प्रतिक्रिया

नेत्यांच्या प्रतिक्रिया

sakal_logo
By

ईडी म्हणजे
एकनाथ-देवेंद्र सरकार

महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया


कोल्हापूर, ता. ११ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर पडलेल्या ईडीच्या धाडीचे पडसाद राज्यभर उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध करतानाच जो सरकारच्या विरोधात बोलतो त्याचा आवाज अशा पद्धतीने बंद केला जातो. ईडी म्हणजे एकनाथ-देवेंद्र सरकार असेच आहे. ते सरकारवर बोलल्याचा राग अशा पद्धतीने काढत असल्याचा आरोपही या नेत्यांनी केला.

कोट
सध्याच्या सरकारचे लक्ष आकाशाला भिडणाऱ्या महागाई किंवा बेरोजगारीकडे नाही; परंतु केवळ वेगवेगळ्या व्यक्तींना राजकीय हेतूने त्रास देण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्या ईडीच्या धाडीमागे राजकीय रंगाचा संशय आहे. राजकीय द्वेषातून यापूर्वी कधीही कार्यवाही झाली नाही. सरकारने ठरवल्यानंतर सरकार काहीही करू शकते. तुमचा आणि माझा महाराष्ट्र सावरायचा असेल तर शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही.
-अजित पवार, विरोधी पक्षनेते.

कोट
मुश्रीफ यांच्यावर यापूर्वी दोन वेळा कारवाई झाली; पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आताची कारवाई ही वेगळ्या कारणासाठी असावी, असा संशय आहे. सरकारला जे विरोध करतात, ठामपणे उभे राहतात, त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. अशा नेत्यांना सरकारी यंत्रणांचा वापर करून बदनाम करणे हेच या कारवाईमागचे कारण आहे.
-आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

कोट
तपासणी करणारी यंत्रणा योग्य पुराव्याशिवाय कोणावरही कारवाई करत नाही. कर नाही तर डर कशाला?. तुमच्याकडे योग्य ते पुरावे असतील तर ते तपासणी यंत्रणेकडे सादर करा, त्यावर संबंधित यंत्रणा योग्य तो निर्णय घेईल.
-चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

कोट
जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती दबावाचे राजकारण केले जात आहे. आमदार हसन मुश्रीफ हे संघर्ष करणारे नेते आहेत. ते लवकर या संकटातून बाहेर पडतील. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत.
-संजय राऊत, खासदार शिवसेना.

कोट
राज्यात ईडी म्हणजे एकनाथ-देवेंद्र यांचे सरकार आहे. जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जाते. एक गोष्ट प्रांजळपणे मला या सरकारला सांगायची आहे. ही अशी कटकारस्थाने करण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी, महागाई यावर लक्ष दिले तर मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचे भले होईल.
-सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी.

कोट
मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, बेरोजगारी संपवण्यासाठी कारखाना काढला. त्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले असताना त्यांना या प्रकरणात बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही कारवाई चुकीची असून, त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल.
-अरविंद सावंत, खासदार, शिवसेना ठाकरे गट.

कोट
मुश्रीफ यांच्यावर सुडबुद्धीने केलेली ही कारवाई निषेधार्ह आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून अशी खेळी करून केला जात आहे. मुश्रीफ यांच्यावरील कारवाई ही पूर्वनियोजित होती हे स्पष्ट आहे. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे आजची ही कारवाई उदाहरण आहे. आम्ही आमदार मुश्रीफ यांच्या पाठीशी आहोत.
-सतेज पाटील, आमदार, काँग्रेस.

कोट
ईडी कोणाच्याही घरी चहा, नाष्टा करायला जात नाही. त्यांच्याकडे मुश्रीफ यांच्या घरी जाण्यासाठी काही कारणे असतील. त्यामुळे ईडीने चौकशी सुरू केली असेल. काय झाले नसेल किंवा भ्रष्टाचार झाला नसेल तर एवढे घाबरण्याची, थयथयाट करण्याची गरज काय आहे? सत्तेत असताना भ्रष्टाचार करायचा आणि अशी कारवाई झाली की, तक्रार करायची हे राजकारण बरोबर नाही.
-आमदार नीतेश राणे, भाजप नेते.