डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव
डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव

डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव

sakal_logo
By

74930, 74929

रसिकांना मिळाली स्वराभिषेकाची आनंदानुभुती
डिग्रजकर संगीत महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ; डॉ. राजुरीकर, पं. सुहास व्यास यांचे गायन

कोल्हापूर, ता. ११ ः ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) आयोजित पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला. महोत्सवाला रसिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली असून, पहिल्या दिवशी डॉ. स्नेहा राजुरीकर आणि पं. सुहास व्यास यांच्या स्वराभिषेकाची आनंदानुभुती त्यांना मिळाली. प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल प्रांगण, राम गणेश गडकरी सभागृहात सलग तीन दिवस हा महोत्सव रंगणार आहे. दरम्यान, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, विद्यावाचस्पती विद्यानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
मैफलीच्या पूर्वार्धात डॉ. राजुरीकर यांनी ‘राग शुद्धकल्याण’मधील विलंबित एकतालातील ‘येरी माई पिया’ या बंदिशीने गायनाला प्रारंभ केला. त्यानंतर ‘निंदन आवत’ ही द्रुत बंदिश त्यांनी सादर केली. संत चोखामेळा यांचा ‘आम्हा न कळे ज्ञान’ हा अभंग त्यांनी सादर केला. उत्तरार्धात पं. सुहास व्यास यांच्या गायनाने मैफलीची उंची आणखी वाढली. ‘राग छायानट’मधील विलंबित एकतालातील ‘तन मन धन’ या बंदिशीने त्यांनी गायनाला प्रारंभ केला. त्यानंतर ‘मानेना जिया मोरे’, ‘बलमा तोरी प्रीत’ या द्रुत बंदिश त्यांनी सादर केल्या. त्यानंतर ‘राग मालव’मध्ये विलंबित तीन तालातील ‘मंद सुगंध’ ही बंदिश त्यांनी सादर केली. द्रुत तीन तालातील ‘तू है रंगीला मोरे’, ‘राग बसंती केदार’मधील ‘हो गुनी गावत’ ही विलंबित, तर ‘ले बुंधा बुंधा मढवा’ ही द्रुत बंदिशही त्यांनी सादर केली. संत चोखामेळा यांच्या ‘जोहार मायबाप जोहार’ या अभंगाने त्यांनी गायनाची सांगता केली. महेश देसाई (तबला), सारंग कुलकर्णी (संवादिनी) यांची साथसंगत होती.
दरम्यान, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ॲड. विवेक शुक्ल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीकांत लिमये यांनी आभार मानले. रामचंद्र टोपकर यांनी सूत्रसंचालन केले. पं. विनोद डिग्रजकर, गंधार डिग्रजकर, अशोक जोशी, श्रीकांत नांगनूरकर यावेळी उपस्थित होते.
.........
चौकट
महोत्सवात आज...
डॉ. सुधांशू व सारंग कुलकर्णी यांच्या संवादिनीची जुगलबंदी आणि पं. विनोद डिग्रजकर यांचे शास्त्रीय गायन.
(राम गणेश गडकरी सभागृह, सायंकाळी सहा वाजता).