गांधी नगर बाजार पेठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधी नगर बाजार पेठ
गांधी नगर बाजार पेठ

गांधी नगर बाजार पेठ

sakal_logo
By

बिग स्टोरी…

फोटो नं. ७४९३६

कोटींचे व्यवहार, वाऱ्यावर कामगार
गांधीनगरातील चित्र; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज

शिवाजी यादवः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ११ ः स्वस्तात मस्त कापडाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहराशेजारील गांधीनगर बाजारपेठेत जवळपास अर्ध्या राज्यातील कापड दुकानातून कपडे विक्रीसाठी पाठवले जातात. महिन्याकाठी दहा-बारा कोटींची उलाढाल होते, अशा बाजारपेठेत जवळपास दीड हजारांवर दुकानात वीस हजारांवर कामगारांना रोजगार लाभला. पण येथे कामगार कायद्याची पायमल्ली करीत जवळपास ८० टक्क्यांहून अधिक कामगारांना पटावर घेण्यात अस्थापनाने हयगय केल्याचे दिसते, तर कामगार विभागाकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालण्याची गरज आहे.
शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील गांधीनगर बाजारपेठ राष्ट्रीय महामार्गापासून वळिवडे चिंचवाडच्या हद्दीपर्यंतही विस्तारली. कापड विक्रीची मुख्य दुकाने असली तरी गॅस शेगड्यापासून फर्निचर, ट्रान्सपोर्ट व्यवसायापर्यंतची शेकडो व्यवसाय आहेत. यातील ७० टक्के दुकानेही घाऊक विक्री करणारी आहेत. त्याची गोदाम आहेत. अशा ठिकाणी ५ ते ५० कामगार आहेत. बहुतेकांना तीन ते पंधरा हजार पर्यंतचे वेतन दिले जाते. दिवाळीत एक गणवेश, एक पगार, साबण, तेलाची बाटली, मिठाई बॉक्स एवढा बोनस दिला जातो. हा अपवाद वगळता कामगारांसाठी किमान वेतनापासून ते रजा सुटीचा लाभ, ओव्हर टाईम अशा सुविधा देण्याचे टाळले जाते.
काही दुकानमालकांनी कामगार कायद्याचा ससेमिरा नको म्हणून फक्त दोन- चार कामगारांना वेतनपटावर घेतल्याचे दिसते. कामगारांना सकाळी ९ ते ९.३० वाजेपर्यंत कामाला थांबवले जाते.
एका दुकानात पाचपेक्षा अधिक कामगार असतील त्यांनी कामगार विभागाकडे कामगारांची नोंद करणे आवश्यक असते. कामगार विभागाने सहा महिन्यातून एकदा दुकानाची तपासणी करावी, कामगार कल्याण विभागाच्या योजनेचा लाभ कामगारांना व त्यांच्या कुटूंबाना द्यावा. कामगारांना असा लाभ मिळू न देण्यात दुकानमालक व कामगार विभागाचे अधिकाऱ्यांनी चंग मांडल्याचे दिसते.
------------------------
कोट

कामगार कल्याण विभागातर्फे कामगारहिताच्या योजनांचा लाभ कामगारांना घेता येतो, त्यासाठी कामगार कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येते, त्याचा लाभ कामगारांनी घ्यावा. यासाठी अस्थापना मालकांनीही कामगारांना प्रोत्साहित करावे, कामगारांना कल्याण विभागाचे अधिकारीही मार्गदर्शन करतील.
- राजेंद्र शिंगाडे, कामगार कल्याण अधिकारी.

गांधीनगरातील दुकानातील ६० टक्के कामगारांना किमान वेतन नाही. वेतनवाढ मागतील तर कामगारांना कामावरून काढले जाते. येथे संघटनात्मक पातळीवरही दाद मागता येणे मुश्कील होते. महिलांना कमी पगार व अपुऱ्या सुविधांत राबवून घेतले जाते. कामगार विभागाने यात लक्ष घालावे.
- सुनील शिंदे, कामगार

कामगाराची ‘कामगार कल्याण’कडे नोंदणी झाली की पुढे त्याला अन्य आर्थिक लाभ द्यावे लागतील, असा काही अस्थापना मालकांचा समज आहे. त्यामुळेच कामगार कल्याणकडे नोंदणी करणे टाळले जाते.
- राजेंद्र निकम, कामगार कल्याण अधिकारी.

अस्थापनाची संख्या १ हजार ५००
कामगार संख्या २० हजार
नोंदणीकृत कामगार ३ हजार
किमान वेतन १३ हजार
प्रत्यक्ष वेतन मिळते ३ ते १० हजार